रविवार, ९ सप्टेंबर, २०१८
अंधश्रद्धेचा विळखा
शाळा सुटल्यानंतर काही शाळकरी मुले मैदानावर खेळत होती.मी गावाकडे निघालो होतो.मैदानावर एक अनोळखी मुलगा हातात गुलेर घेऊन आला होता.मी त्याला विचारलो की तू कोणत्या वर्गात शिकतोस? तुझं गाव कोणतं? त्याने मी नववी वर्गात शिकतो व परगावचा असुन आजीकडे आलो आहे. तिला लकवा मारलं आहे. तिला बरं करण्यासाठी म्हणुन आजोळी आलो आहे.मी विचारलो तुझ्या हातात गुलेर कशासाठी आणलास? तो म्हणाला, पारवा मारण्यासाठी आणलोय .त्याचं पंख आजीच्या हातावरुन फिरवलं की तिचा आजार कमी होईल.आजीचं फिरणं बंद झालं आहे सर.त्याच्या या उत्तरानं मी अवाक झालो.मी त्याच्या खांद्यावर हात ठेवताचं एक दूसरा मुलगा म्हणाला,सर त्याला शिवु नका.घरी गेल्यावर गाईचे गवतर( गोमुत्र) शिंपडावे लागते.मी त्या मुलाला विचारलो,तुला मी शिवलो तर काय होईल ? तो मुलगा म्हणाला सर शिवाशिव चालत नाही.आजीचे हातपाय हळूहळू वाकडे होतील तिला पुन्हा कधीच चालता येणार नाही.आता मात्र मी या उत्तराने चमकलोच.
त्या मुलाची मी समजुत घातली .आज विज्ञान इतके प्रगत असताना आपण काय करत आहोत? डॉक्टरांच्या औषधाने तुझ्या आजीचा आजार कमी होईल.यासाठी पक्षी मारण्याची गरज नाही.पारव्याचा पण परिवार असतो.आपण एक पक्षी मारला तर त्याच्या परिवारातील इतर पक्ष्यांना वाईट वाटणार नाही का? त्यांना रडु येणार नाही का?असं म्हणताचं त्या मुलाच्या चेह-यावरील भाव बदलत होते.तो विचार करु लागला होता.त्याच्या मनावर या गोष्टींचा किती खोल पगडा बसला आहे.गेल्या कित्येक महिन्यापासुन तो आजीला बरं करण्यासाठी शाळा सोडुन आला होता.त्याच्या चेह- यावरील चिंता वाचत होतो.अंधश्रद्धेची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत.
पारवा पक्षी मारुन उपचार केल्यावर लकवा ( अर्धांगवायु) रोग बरा होतो हा भाग माझ्यासाठी नवीन होता.
माझ्या मनात अनेक प्रश्नांनी थैमान घातला .विचार करत करत मी गावाकडे चाललो की अजुनही समाजाच्या मनात अंधश्रद्धा किती खोल घर करुन बसल्या आहेत? शिक्षण नसल्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन नाही.योग्य उपचार नसल्यामुळे रुग्णांची मानसिक व शारीरिक कुचंबना होत आहे. चुकीचे उपचार केल्याने वेळ निघुन जात आहे.परिणामी रुग्णांचा आजार वाढत जात आहे.अंधश्रद्धेच्या विळख्यातुन लोकांची सुटका करण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
गिरी श्यामसुरेश गुमानगिर
माध्यमिक शिक्षक
जि.प.प्रशाला अंबुलगा( बु.)
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)