शुक्रवार, १ मार्च, २०१९
मराठी माती
माझ्या मराठी मातीचा,
टिळा ललाटी लावतो |
सह्याद्रिचा माझा राजा,
अभिमानाने डोलतो || 1 ||
माझ्या मराठी भाषेचा,
लई न्यारा हो सुवास |
भीमा,गोदेचा पाट,
वाहि अमृताची रास || 2 ||
पंढरीत विटेवरी देव,
पांडुरंग रुक्मिणी |
तुळजापुरात बसली,
आई जगदंबा भवानी || 3 ||
वेरुळ अजिंठ्या लेण्यात,
मराठी चित्रात नांदते |
ज्ञानोबाच्या ओव्यातुन,
मळा भक्तीचा फुलविते || 4 ||
माझ्या शिवबाची तलवार,
तुकयाची अभंगगाथा |
मुजरा मानाचा करुन,
चरणी टेकवितो माथा || 5 ||
माझी मराठी माणसं,
किती शेतात राबती |
घण कष्टाचे सोसुन,
मळा सुंदर फुलविती || 6 ||
म मराठीची पताका,
करी खांद्यावर घेऊ |
उंच निळ्या आभाळात,
मोकळ्या गळ्याने गाऊ ||7||
माझ्या मराठीची गोडी,
आहे अमृताहूनी न्यारी |
दिंडी, पताका घेऊन,
करु साहित्याची वारी || 8||
श्री गिरी श्यामसुरेश गुमानगिरी
माध्यमिक शिक्षक
लातूर
9923060128
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)