गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

तेजाची आरती.. मातीत गाढ झोपलेले बी पावसाच्या मायेच्या स्पर्शाने जागे झाले.... दोन पानाच्या पाकळ्यांनी टाळ्या वाजवु लागले... गवत फुलांनी त्याच्याशी गट्टी केली.व गवतात तो हरवुन गेला... धरतीला इवल्या हातांनी बिलगुन त्यांने गगन पित्याकडे पाहिले... त्याच्या किलकिल्या डोळ्यातील स्वप्न पाहुन त्याला वरुणाने हाक मारली... पावसाच्या टपो-या थेंबांनी त्याचे इवले गाल हसरे झाले... भन्नाट रान वा-याशी ते रात्रीच्या मंद प्रकाशात तेजाची आरती गाऊ लागले... रानभर उगवलेल्या हजारो रानपणत्यांनी त्याच्या सुरात सुर मिसळला... टिपूर चांदण्याच्या प्रकाशात चमकणारा अबोल कदंब डोळ्यांनी खुणवु लागला... अरे, तुम्ही गगनपुत्र पण सुर्योपासक.केवड्याने कदंबाच्या या वचनाने मान डोलावली... तिमिरातुनी तेजाच्या प्रवासाला तारे निघालेले पाहुन अबोली म्हणाली, चरैवती चरैवती...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा