रविवार, १० डिसेंबर, २०२३
*तुका आकाशाएवढा* माझ्या प्रिय बांधवांनो आणि भगीनींनो,आज माझं मन खुप भरुन आलय; कारण काय तर जगदगुरु संत तुकोबांवर मी सर्वप्रथम लिहितोय.20 मार्चला तुकाराम बीज आहे. जगद्गुरु तुकोबांचे स्मरण करतोय.संत तुकोबांवर लिहिण्याचे धाडस करतोय.लेखनात काही चूक-भूल झाली तर वाचकांनी थोर मनाने क्षमा करावी ही प्रार्थना.एक काळ असा होता जो जगद्गुरु तुकारामांच्या अभंगांनी संपुर्णपणे भक्तिमय झालेला काळ होता. महाराष्ट्रात घरोघरी, किर्तनात, प्रवचनात तुकोबांच्या अभंगांनी भक्तिचा मळा फुलवला होता.तुकोबा लोकशिक्षक होते.चालतं-बोलतं विद्यापीठ होते.त्या काळी वारकरी प्रेमाने विठु माऊलीला भजनात आळवत होता.सुंदर ते ध्यान गात होते.विवेकाचा दीप व भक्तीचा मोगरा मनामनात फुललेला व मानवतेचा दरवळ जनाजनात पसरलेला होता.*ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस* संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी *विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या अभंगाप्रमाणे सर्वांना, भागवत धर्म सांगितला. संत तुकारामांनी भागवत धर्माच्या मंदिरावर भक्तीरुपी कळस चढविला. अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर या अभंगाप्रमाणे तुकारामांच्या काळात सर्वत्र भक्तीचा महापूर लोटलेला होता.वारकरी धर्मभेद,पंथभेद,जातीभेद मानत नव्हते.खेळ मांडीयेला वाळवंटी ठायी, नाचती वैष्णव भाई रे । एकोप्याने पंढरीची वारी करत होते.जगद्गुरु तुकोबांनी सदाचार संपन्न जीवनाचा पुरस्कार केला.तुकोबांना सर्वत्र परमेश्वराचं रुप दिसत होतं.त्यांनी भूतदया व समतेचा प्रचार केला. तुकारामांचे गाव देहू.त्यांचे वडील किराणा दुकानदार व्यापारी होते.घरी किराणा मालाचे दुकान होते. शेतीभाती होती.काळ बदलला.काही काळानंतर विठ्ठल भक्त तुकारामांचे मन कशातचं रमले नाही.जीवनातील अनेक वाईट घटना,घरातील आप्तजनांचे,स्वकीयांचे अचानक झालेल्या मृत्युमुळे ते सतत एकांतात रहात असत .सतत परमेश्वराच्या नामस्मरणात दंग रहात असत.परमेश्वराचे नामस्मरण करताना त्यांना कशाचेचं भान रहात नसे.त्यांना विठ्ठल भेटीची प्रचंड ओढ लागलेली होती.ते पुण्याजवळ असणा-या भामनाथाच्या डोंगरावर जाऊन रात्रंदिवस विठ्ठलाचे नाम स्मरण करत असतं.तुकोबांना जीवनात अनेक संकटे आली.अनंत अडचणींचा सामना करावा लागला.तरीही त्यांच्या ईशभक्तीत कमी आली नाही.कर्मकांडापेक्षा भक्ती कशी श्रेष्ठ याचा ते उपदेश करीत होते.तुकोबा अभंग रचत,लिहित.काही लोकांना त्यांचे प्रगल्भ विचार आवडलेले नाहीत.त्यांची धर्मपत्नी आवली सुद्धा तुकोबांवर राग दाखवत,नाराज असे.तुकोबांच्या भोवताली काही वाईट लोक होते. दूष्ट विचार धारेच्या लोकांना त्यांची किर्ती आवडली नाही.त्यांनी तुकोबांची अभंगगाथा इंद्रायणी नदीत बुडविली ; परंतु लोकांना तुकोबांचे अभंग तोंडपाठ होते.त्यांची अभंगवाणी लोकांच्या मुखात शाश्वत राहिली.तुकोबा हे महाकवी होते.आपला जीवन संघर्ष त्यांनी अभंगवाणीत चित्रीत केला.स्री- शुद्रांना त्यांनी उद्धाराचा मार्ग दाखविला.महाराष्ट्रातील जनतेला तुकोबांमुळे भक्तीचे महत्त्व अधोरेखीत झाले.खरा धर्म समजला.जे का रंजले गांजले,तयासी म्हणे जो आपुलें तोचि साधु ओळखावा,देव तेथेंची जाणावा. तुकोबांनी या अभंगात रंजल्या-गांजल्यांना आपलंसं करण्याचा मंत्र दिला; त्याचंबरोबर खरं साधुत्व ओळखण्याची सर्वांना दृष्टी दिली. रंजल्या-गांजल्यांना आपलसं करण्या-यातचं देव जाणावा हे सांगितलं.देव जाणण्यासाठी कर्मकांडाला फाटा देऊन जनसेवा हीच ईश्वरसेवा* अशी समग्र दृष्टी दिली.सज्जनांचे चित्त हे नवनीतासारखे आतुन व बाहेरुन मृदू असते.असे हे सज्जन साधु हेचं परमेश्वराचे प्रतिरुप आहेत दाखवुन दिलं. भूतदया हा परमोधर्म असुन त्याचा प्रचार व प्रसार करुन जीवन जगणारे साधु हेचं परमेश्वराचे सच्चे भक्त आहेत.अशा सज्जनांचा सतत सहवास मिळावा म्हणुन ते परमेश्वराला प्रार्थना करतात. तसेच दुर्जनांना विवेक दृष्टी मिळावी यासाठीही ते विनवणी करतात.पुढे ज्ञानदेवांचा विचार वारसा तुकोबांनी प्रत्यक्ष कृतीतुन जनतेत रुजवला.तुकोबांचे साहित्य हे विवेकशील चिंतनातुन व सत्य जीवनाच्या अनुभवातुन समाजासमोर आलेले बावनकशी सोनं आहे. तुकोबांमुळे समाजाला सत्य धर्माचे दर्शन झालेले आहे.सार ते घ्यावे असार ते सोडुन द्यावे.असत्य, टाकाऊ काय आहे? हे ओळखण्यास तुकोबांनी शिकवले. तुकोबांमुळे लोकांना असत्य व सत्य ओळखण्याची दृष्टी निर्माण झाली.तुकोबांनी इंद्रायणी नदीत आपल्या वडीलकीचे परंपरेने पुढे आलेले सावकारकीचे कर्जाचे, हिशोबाचे गाठोडे बुडवून शोषण मुक्त समाजाचे दर्शन तुकोबांनी प्रत्यक्ष उदाहरणातुन सहजपणे समाजासमोर आपल्या आचरणातुन मांडले आहे.समाजातील विकृतीवर तुकोबांनी विचाररुपी काठीचा प्रहार करुन बिघडलेल्या व वाट सोडुन वागणा-या लोकांचे प्रबोधन केले आहे. *तुकाराम बीज* वारक-यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे तुकाराम बीज.याचं दिवशी देहू गावातून जगद्गुरु तुकोबा वैकुंठाला गेले. आम्ही जातो आपुल्या गावा ।
आमचा राम राम घ्यावा ॥१॥ आजवर होतो तुमच्या ठायी।आता कृपा असु द्यावी ।।२।।
तुमची आमची हेचि भेटी ।
येथुनियां जन्मतुटी ॥३॥
आतां असों द्यावी दया ।
तुमच्या लागतसें पायां ॥४॥
येतां निजधामीं कोणी ।
विठ्ठलविठ्ठल बोला वाणी॥५॥
रामकृष्ण मुखी बोला ।
तुका जातो वैकुंठाला ॥६।। तुकाराम बीज वारक-यांच्या मनात विठ्ठल भक्तीचे बीजा रोपण करते.विठ्ठल-विठ्ठल प्रेमाने बोला.राम-कृष्ण-हरि मंत्र जपा.सर्व प्राणी मात्रांवर दया करा.आपले जीवन हे सार्थकी लावा.मोहाच्या जाळ्यात अडकु नका. सदाचार हाच मानवाला चांगुलपणाकडे घेऊन जातो. परमेश्वरावरील नितांत प्रेमाचे ,भक्तीचे अंतिम टोक म्हणजे मुक्ती.परमेश्वरावर श्रद्धा ठेवा.अंधश्रद्धा ठेवू नका. तुकोबांनी भक्तीचे अंतिम टोक गाठले.सर्व विकारांपासुन मुक्ती मिळवली.त्यांची संसाररुपी भवसागरात कसलीचं इच्छा उरली नाही.तुकोबांनी मुक्ती मिळवली.आपल्याला जशी मुक्ती मिळाली तशी इतरांना लाभावी म्हणुन जगद्गुरु तुकोबा अभंगवाणीतुन उपदेश करतात.दूधात साखर विरघळावी तसे तुकोबा ईशतत्वात विलिन झाले. संत बहिणाबाई म्हणतात- ‘ज्ञानदेवे रचिला पाया । उभारीले देवालया ।।१।। नामा तयाचा किंकर । जेणे केला हा विस्तार ।।२।। नाथ दिला भागवत । तेचि मुख्य आधार ।।३।। तुका झालासे कळस । भजन करा सावकाश’ ।।४।। कुंभार जसा मडके थापटतो व आतुन हाताचा आधार देतो.याचप्रमाणे तुकोबांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा,ढोंगीपणा यावर कठोर प्रहार केला.लोकांना प्रेमाने समजावुन सांगितले. अंगा लावूनिया राख डोळे झाकुनी करती पाप। तुका म्हणे जळो तयाची संगती।। ढोंगी लोकांच्या संगती न राहण्याचा सल्ला तुकोबांनी दिला.खरा विवेक व वैज्ञानिक दृष्टीकोन तुकोबांनी समाजात रुजविला. तुकोबांचा एक-एक अभंग म्हणजे अमृताची वाणी.तुकोबांनी किर्तनरुपी भक्ती मार्गाचा उपयोग करुन घरांघरात भागवत धर्माचा प्रसार केला.तुकोबांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे । वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती ।।या सारख्या अभंगातुन पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.भोंदू बाबांच्या ढोंगीपणावर शब्दरुपी आसुड ओढले.नवस सायास करु नका हे सांगितले.तत्कालिन भरकटलेल्या समाजाला तुकोबांनी ज्ञानाची विशाल दृष्टी दिली.तुकारामांपुढे पृथ्वीवरील सर्व चराचर नतमस्तक झाले.तुकोबांनी साध्या,सोप्या भाषेतुन, अभंगवाणीतुन लोक जागृतीची चळवळ उभी केली.अंध:कारातुन प्रकाशाकडे जाण्याची पायवाट दाखविली.
अणुरेणियां थोकडा ।
तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुन सांडिलें कलेवर ।
भव भ्रमाचा आकार ॥२॥
सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटीं ॥३॥
तुका म्हणे आतां ।
उरलो उपकारापुरता ॥४॥ माझ्या अल्पबुद्धीला जे काही चांगले सुचले ते वाचकांसमोर मांडलो आहे.तुकाराम बीज 20 मार्चला आहे.जवळच्या मंदिरात तुकाराम बीज सोहळा पहा.तुकोबांना आठवा. रामकृष्णहरि म्हणा.प्रेमाने भजन करा.विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आपलाचं *श्यामसुरेश गुमानगिरी गिरी माध्यमिक शिक्षक जिल्हा परिषद प्रशाला अंबुलगा ( बु.) तालुका निलंगा जिल्हा लातूर भ्रमणध्वनि 9923060128*
*श्री.कमलाकर रामराव सावंत केंद्रप्रमुख साहेब यांच्या सेवानिवृत्ती निमित्त लेख* 12 फेब्रुवारी 1964 साली सावंत सरांचा जन्म झाला .किल्लारी सरांचे मूळगाव.28 फेब्रुवारी 2022 रोजी सर नियत वयोमानानुसार 58 व्या वर्षी केंद्रप्रमुख पदावरुन सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने गौरव पर लेख लिहिण्याचा मला मोह आवरत नाही.सावंत सर म्हटलं की डोळ्यासमोर सदैव हसतमुख ,प्रसन्न, सहज भाव असणारी मुर्ती दिसते. जवळपास साडे पाच ते सहा फुट उंच व्यक्तिमत्त्व. सावंत सर हाफ सफारी ड्रेस मध्ये खुप छान दिसतात.सरांची कित्येक वर्षापासुन केशरचनेत किरकोळ सुद्धा बदल नाही.सरांकडे सहज पाहिलो तर टापटीपपणा व स्वच्छता ठळक जाणवते.शाळेत किंवा कार्यालयात जाताना त्यांच्या उजव्या खांद्यावर सीसीआरटी ची बॅग हमखास दिसते.लातूर जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना सरांमुळे दिल्लीतील *सीसीआरटी प्रशिक्षण संस्थेची* ओळख झाली.शासनाच्या खर्चाने अनेक गुरुजींना दिल्ली दर्शनाचा, मोफत पर्यटनाचा,प्रवासाचा आनंद घेता आला.केंद्र स्तरावर दिल्ली दरबारी सीसीआरटी प्रशिक्षणात लातूर हा संख्येने सर्वात जास्त प्रशिक्षीत जिल्हा आहे .सरांचा यात सिंहाचा वाटा.सीसीआरटी प्रशिक्षणाचे चे सर्व रेकॉर्ड सरांकडे आजही पहायला मिळते.एखादा शासकीय कागद कसा सांभाळावा हे सरांकडुन शिकायला मिळते.पहिली वर्गातील छोट्या मुलांपासुन ते दहावीपर्यंतच्या मुलांसाठी काय-काय करता येईल याकडे सरांचे अधिक लक्ष असे.सर सतत बिझी दिसतात.औसा तालुक्यातील लामजना हायस्कुलला सर चित्रकला विषय शिकवत.सर भिंतीवर अतिशय प्रमाणबद्ध असा भारताचा नकाशा काढत.लामजना हायस्कुल मध्ये अजुनही तो नकाशा आहे.सर नकाशात बारकावे दाखवत.सर सहज विनोद निर्माण करुन हसवत.सर पत्रकार पण होते.*नाग देवता हळूहळू खाली सरकतेय* हा त्यांचा लेख खरोसा लेणीवर प्रकाश टाकणारा दैनिक लोकमत मध्ये लिहीलेला अजुनही आठवतो.सर *फोटोग्राफी* पण करतात.आनंदाच्या क्षणांना कॅमेरॅत टिपुन पुन्हा-पुन्हा त्या क्षणांना पहावं व थोडसं हसावं ,रडावं व अंतर्मुख व्हावं हा सरांचा दृष्टीकोन.जो कित्येकांना उशीरा लक्षात येतो. सर हजरजवाबी व चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व आहेत.सरांचं वक्तृत्व मला खुप आवडतं.त्यांचे शब्द मोत्यासारखे अतिशय सुरेख, लयदार, दमदार ,मिश्किल. ओघवतं भाषण करणारे सर श्रोत्यांची मने सहज जिंकुन त्यांच्या ह्दयात घर करत.सर बोलताना कधीचं अडखळत नाहीत.चेह-यावर आत्मविश्वास व सत्य ओसांडुन वाहते.समोरच्या व्यक्तीला सर आदराने व प्रेमाने बोलतात. कोणतंही नियोजन असो व कार्यक्रम असो त्यात कलात्मकता व सौंदर्य कमी वेळात आणण्यात सरांचा हातखंडा.सरांकडे रचनेमुळे होणारी जबरदस्त सौंदर्य दृष्टी आहे.वक्तशीरपणा व शिस्तीमुळे सर लक्षात राहतात.भारतीय संस्कृती तर सरांचा प्राण त्याला सामाजिकतेची व शैक्षणिकतेची जोड.मला आठवतं सरांनी अनेक मुलांच्या खात्यावर 500-1000 रु.जमा करुन मदत करण्याचा उपक्रम हाती घेतला होता.गरीब होतकरु मुलांची बँकेत खाते काढली होती.त्यांच्या मदती साठी ते मोठ्या शहरात चित्रप्रदर्शन भरवुन निधी मिळवत असत.आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हे मुल्य सरांमध्ये सातत्याने दिसते.इथल्या मातीवर,माणसांवर सर मनापासुन प्रेम करतात.तुम्ही कोणीही, केंव्हाही व कधीही हाक मारा सर मदतीसाठी सतत तत्पर असतात.कितीही बिझी असु द्या सर तुमच्या फोनला उत्तर देतातचं. एखाद्याने चांगली कृती केली तर सर त्याच्या पाठीवर कौतुकाची शाबासकीची थाप मारायला कधीचं विसरत नाहीत.आदरणीय सीईओ अभिनव गोयल साहेब यांचा BALA उपक्रम अतिशय स्तुत्य व अभिनंदनीय उपक्रम आहे.लातूर जिल्ह्यात अनेक गुरुजींनी बाला उपक्रमात स्वत:ला झोकुन दिलेलं आहे.सावंत सर आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक आहेत.सर शाळांना भेटी देऊन या उपक्रमाचा आढावा घेतात.सरांना सतत नाविण्याची ओढ आहे. समोरच्याचे मनभरुन व पोटभरुन कौतुक करावे ते सावंत सरांनीचं.कामाची यशस्वी पुर्तता करणा-याला प्रमाणपत्र देताना सरांच्या चेह-यावर अलौकिक आनंद झळकतो.मला आठवतं सरांनी एकदा एका सीसीआरटीच्या जिल्हा कार्यशाळेत दूस-या भाषेतील बहुतेक आसामी गाणे म्हटले होते.मला ते गाणे इतके आवडले की मी सीसीआरटीची चार प्रशिक्षणे पुर्ण केलो.सर एक चांगले मार्गदर्शक आहेत. सरांना कोणताही प्रश्न विचारा सर सकारात्मक उत्तर देतात, मार्गदर्शन करतात. मला वाटतं कित्येक गुरुजींना सावंत सरांनी अनेक कामात दिलेला तांत्रिक सल्ला नक्कीचं उपयोगी पडला असेल.सर समोरील व्यक्तीचा उत्साह प्रचंड वाढवतात.काम करण्यासाठी प्रेरणा देतात.Very Good म्हणतात.उगीचचं मनात वाटणारी कोणत्याही कामाची क्लिष्टता व अवघडपणा सहज बोलण्याने कमी करतात. समोरचा माणुस तणावमुक्त होऊन आनंदाने काम स्विकारुन पुर्ण करतो.चुका मान्य करुन कामाला लागतो.सरांकडे आढळणारा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे गुणग्राहकता. समोरच्या व्यक्तिच्या, विद्यार्थ्यांच्या, गुरुजींच्या ठिकाणी असणा-या गुणांना ते पारखतात,ओळखतात व त्याचा उपयोग शाळेला, समाजाला कसा होईल हे पाहतात.मला वाटतं,सावंत सर म्हणजे चालतं ,फिरतं *एक विद्यापीठ* आहेत.सरांनी आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी *प्रवीणजी गेडाम* साहेबांच्या सोबत राहुन लातूर जिल्ह्यातील हागणदारी मुक्त गावासाठी व स्वच्छ गाव होण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. आदरणीय शिक्षण सचिव *नंदकुमार साहेबांनी सावंत सरांची देशातील 40 उत्कृष्ट शिक्षकांमध्ये निवड केली. ज्यांनी आनंददायी शिक्षणावर नाविण्यपुर्ण उपक्रम केले होते त्यांना 14 नोव्हेंबर 1993 साली दिल्लीमध्ये बोलावुन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.2018 मध्ये श्री.श्री.श्री. रविशंकर यांनी साम टि.व्ही.वर नदी जलपुनर्भरणाचे,खोलीकरणाचे लाईव्ह सादरीकरण केल्या बद्दल सरांचा जाहिर सत्कार केला होता.डॉ. पुरुषोत्तम भापकर आयुक्त औरंगाबाद यांनी दयानंद सभागृह लातूर येथे *गुणवत्तेचे शिल्लेदार* म्हणुन दिनांक 12/02/2017 रोजी सरांचा सत्कार केला व आपल्या पुस्तकात पान नंबर 111 वर त्याचा उल्लेख केला आहे.*आदरणीय सिईओ दिनकर जगदाळे साहेब व सन्माननीय एस.पी.सिंग साहेबांनी* सरांच्या कार्याचा गौरव केला.सर अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत.सरांमध्ये मला एक *थोर कर्मयोगी* दिसतो .त्यांचं लक्ष अत्युत्कृष्ट कर्म पुर्ततेवर होतं फळाची अपेक्षा करायची गरज नाही काम उत्कृष्ट करा हा सरांचा जीवनमंत्र.सरांचे हस्ताक्षरही अतिशय सुरेख आहे.सरांचे निसर्गावर अतिशय प्रेम आहे.छोट्या कुंड्यात रोप लावुन सर त्यांना जीवासारखे जपतात.सरांना चित्रकलेबरोबरचं अनेक कला हस्तगत आहेत.मला वाटतं सरांनी हजारो किलोमीटरचा प्रवास केला आहे.कितीही प्रवास केला तरी दुस-या दिवशी सर मूळ कामाला तत्पर असतात.*सीसीआरटीचे ते DRP जिल्हा साधनव्यक्ती* म्हणुन काम करतात. कोणत्याही कामाचा गर्व नको किंवा श्रेयही नको असं सर सांगतात.सरांमध्ये दूरदृष्टी दिसतेे.मूल शाळेत यावे, शिकावे,टिकावे,यासाठी काय-काय करता येईल याचे अनेक उपक्रम सर सांगतात.नांदुर्गा केंद्रात असतांना सरांनी सातवी व चौथीच्या शिष्यवृत्ती वर्गासाठी *टिम टिचींगचा* प्रयोग केला होता व अनेक मुले शिष्यवृत्तीधारक झाली होती.त्याची पोहोचपावती म्हणुन सरांनी डॉ.विठ्ठल लहाने यांच्या हस्ते गुरुजींचा सत्कार केला होता.उपक्रम शिलता व प्रयोग शिलता सरांच्या नसानसात भिनलेली आहे.सर शाकाहारी व संपुर्ण निर्व्यसनी आहेत.त्यांना कधीही आजारी पडलेलं मी पाहिलं नाही.सरांची आजही प्रकृती चांगली आहे.सेवा निवृत्तीची काहीही व कोणतीही चिन्हे सरांवर दिसत नाहीत.सावंत सर शरीराने व मनाने अजुनही तरुण आहेत.सावंत सर परीस आहेत.सर जिथे हात लावतील ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही.सावंत सरांना शिक्षण संचालकांपासुन ते शिक्षणाधिकारी पदापर्यंतचे अनेक अधिकारी ओळखतात.सीसीआरटीचे डायरेक्टर सरांना फोन करतात.सार्वजनिक जीवनात सरांचा लोकसंग्रह प्रचंड मोठा आहे.एका हाकेवर अनेकांना एकत्र आणण्याची ताकद सरांमध्ये आहे.शिक्षकी पेशा मनापासुन स्विकारुन त्यावर ह्रदयापासुन सर प्रेम करतात.शिक्षकांनी जीवनात अधिक उंची गाठावी असं सर सांगतात.सरांना मी कधीही निराश झालेलं पाहिलं नाही.सरांना कामाचा आळस कसा नाही❓हा सतत प्रश्न मला पडत असे.अजातशत्रु व्यक्तिमत्त्व म्हणजे सावंत सर.त्यांच्या नावातील कमळ फुलाची राष्ट्रीयता मला सरांच्या कामात दिसते.सावंत सर दोन -चार केंद्रांची केंद्रप्रमुखांची जबाबदारी सहज एकटे सांभाळतात.*केंद्र प्रमुख कसे असावेत❓तर ते सावंत सरांसारखे आदर्श असावेत* सर केंद्रस्तरावर अनेक बैठका,केंद्रसम्मेंलने, शिक्षणपरिषदा घेऊन शिक्षकांना प्रशिक्षणं देतात.सरांना जसं अनेक रंगाचे रंगज्ञान आहे तसं सर माणसातले रंगही ओळखतात.सरांची स्मरणशक्तीही अफाट आहे.सर 28 फेब्रुवारी रोजी तांत्रिकदृष्ट्या शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त होत आहे.नक्कीचं त्यांची सेवा निवृत्ती इतरांपेक्षा वेगळी आहे.यापेक्षा दुप्पट उत्साहाने सर वृक्षांसारखं, नदीसारखं सतत कार्यरत राहतील. त्यांच्या सहवासाने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रु तरळतील.सरांचे कुटुंबाकडेही लक्ष आहे.मला व सर्वांना प्रिय असणारे सावंत साहेब *ख-या अर्थाने नेशन बिल्डर आहेत.* सरांना व त्यांच्या कार्याला मनापासुन प्रणाम करतो. माझ्या मनापासुनच्या प्रेममय शुभकामना हार्दिक सदिच्छा सरांसोबत सतत आहेत.सर मला कधीही हाक मारा. *गिरी श्यामसुरेश गुमानगिरी* माध्यमिक शिक्षक जिल्हा परिषद प्रशाला अंबुलगा(बु.)ता.निलंगा जि.लातूर 9923060128
*बालपणीच्या आठवणी* *युसुफ (सग्गे) आईसक्रीमवाला* 13 मार्च 2022.भर दूपारची वेळ......ऊन मी म्हणत होते.....उन्हाच्या कडाक्याने अंगाची लाही लाही झालेली. अन मग कानावर आरोळी येते.आईसफ्रुट...... गॅरेगॅर .......गेली 30 ते 40 वर्षे ही आरोळी अजुनही कानावर पडते आहे; पण एक शब्द बदलला गॅरेगॅर ऐवजी आईसफ्रुट.....मी सरपण घेऊन दूपारी शेताकडुन येणा-या ट्रॅक्टरची वाट पहात सार्वजनिक पाणवठ्याजवळ थांबलो होतो.आयाबाया पाणी भरत होत्या.लोकांची शेताकडे जाण्याची लगबग सुरु होती.मोटारसायकली वेगात धावत होत्या.तेवढ्यात युसुफ आईसफ्रुटवाल्याची स्वारी आली.एका जुन्या लुनावर आईसफ्रुटचा फायबर बॉक्स बसवलेला होता.मी म्हणालो, " कसे आहात मामु?तुम्ही इथं थांबा.पाणवठा आहे लोकं इथं येतात." मला युसुफ म्हणाला, "काय चाललय सर?" युसुफ मामु 20 कि. मी.अंतरा वरील निलंगा शहरातुन गेली 30 ते 40 वर्ष लामजना गावात येऊन आईसफ्रुट विकतो आहे.वयाच्या 18 व्या वर्षापासुन मी हे काम करतो असल्याचे त्याने सांगितले. लामजना गावातील सर्वजण त्यांना सग्गे म्हणुन हाक मारतात.तेवढ्यात एक गि-हाईक आलं.युसुफ म्हणाला," कोणतं देऊ? 10 चं कि 5 चं."युसुफ माझ्याकडे वळुन म्हणाला," सर पाच -दहा पैश्यापासुन मी आईसफ्रुट विकतो आहे."माझ्या डोळ्यासमोरचं या लामजना गावचं पुनर्वसन झाल्याचं त्यानं सांगितलं. भूकंपापुर्वी व भूकंपानंतर बरीचं वर्ष युसुफ सायकलवर,आईसफ्रुट घेऊन यायचा.निलंगा पासुन 20 कि.मी. अंतरावरुन येऊन लामजना गावात दिवस भर फिरुन आईसफ्रुट विकायचा. तोंडात आवडती सुपारी धरायचा.दोन चार गि-हाईकं झाली. पाणवठ्यावर पाणी पिऊन युसुफ थोडा वेळ थांबला गप्पा मारत मारत तो पुढे निघाला.तेवढ्यात ओळखीच्या व्यक्तीने युसुफला नमस्कार केला.आईसफ्रुट खायचय का? म्हणुन विचारत, विचारत त्याने लाल रंगाचं आईसफ्रुट त्याच्या हातावर ठेवलं.तो माणुस कमालीचा खुप आनंदीत झाला. युसुफच्या चेह-यावर समाधानाची लकेर उमटली.मी लहान असताना युसुफ शाळेसमोर येऊन थांबायचा.कॅरीयरला एक लाकडी बॉक्स अडकवलेला असायचा.त्यावर लोखंडी पत्र्याचे आवरण होते. कधी-कधी तो बर्फाचा भला मोठा चौकोनी ठोकळा कलतानी पोत्यात बांधुन आणायचा.पांढरा बर्फ रंध्याने खिसायचा; त्यावर लाल,केशरी,पिवळा,हिरवा गोड रंग ओतायचा.त्याचा तो सप्तरंगी गोळा खाताना खुप मजा वाटायची.गॅरेगॅर शेवटपर्यंत खाणं एक चॅलेंज असायचं ; कारण मध्येचं तो गोळा जमीनीवर पडायचा.खाणा-याचा चेहरा बघण्यासारखा व्हायचा.काही तरी हरवलं आहे असा. भंगार जमा करण्यासाठी दोन कलतानी पोते सायकलच्या कॅरीयरला अडकवलेले असत.हे सर्व गबाळ घेऊन तो गावभर फिरायचा.माझ्या हातातील बर्फाचा गोळा मध्येचं निसटुन जमीनीवर पडायचा हातात फक्त काडी उरायची.जवळ उभारलेली मुले खो-खो हसायची.जिभ गुलाबी व्हायची.शाळेत असताना बर्फाचे गोळे खाणा-या मुलांच्या जीभांची तपासणी करुन बिडवे सर खुप मारत असत कारण त्यामुळे आजार होतात असं सर सांगायचे.असलं तत्त्वज्ञान गळी उतरणं मुलांच्या बाबतीत तर खुप अवघड असे.आता युसुफचं वय 55 ते 60 च्या दरम्यान आहे.डोक्यावर एका विशिष्ट पद्धतीने तो रुमाल बांधतो.कित्येक वर्षांपासुन त्यांच्या डोक्यावरील रुमाल बांधण्याची स्टाईल अजुन तरी बदललेली नाही.युसुफ मामुला ऊन कसं लागत नाही; याचं मला खुप नवल वाटे.युसुफचे कपडे खुप साधे लांब बाह्याचा शर्ट तशीच लांब पॅंट.सकाळी 10 पासुन 5 वाजेपर्यंत युसुफ गावभर फिरायचा अजुनही फिरतो.उन्हाच्या आडोशाला बसलेली माणसं,मुले युसुफला पाहुन खुप आनंदित व्हायची.मुले व मुली कांहीतरी भंगार वस्तु घेऊन युसुफकडे धाव घेतात.मग युसुफ मामु गि-हाईकाच्या पसंतीचं आईसफ्रुट हातात अलगद टेकवतो. गि-हाईकाकडे तो लक्षपुर्वक आस्थेने पहातो.काय हवे? काय नको? याचा अंदाज बांधतो.युसुफ दररोजच्या गि-हाईकांची त्यांच्या घराजवळ जाऊन वाट पहातो.दररोजच्या गि-हाईकाची भेट घेणं युसुफला आवडतं.तो समोरच्या व्यक्तीची ख्याली खुशाली सहज विचारतो. माणसांची त्याला खुप आपुलकी.इतक्या दुरुन येऊन हा माणुस कष्ट करुन पोट भरतो याचे मला नवल वाटे.मला नम्र,शांत,प्रेमळ, स्वाभिमानी,कष्टाळु,प्रामाणिक युसुफ मामुचा खुप अभिमान वाटतो.शर्टाच्या खिशात तो चिल्लर पैसे ठेवतो.त्या चिल्लरचा आवाज कानावर पडतो.थोड्या चुरगळलेल्या दहा-दहाच्या नोटा तो पँटच्या उजव्या खिशात ठेवतो.शंभरची एखादी दूसरी नोट वेगळ्या पॉकेटमध्ये ठेवतो.सरळ स्वभावी युसुफ मामुला सर्वजण सग्गे म्हणतात.सग्गे म्हणजे सोयरा.सर्वांना हा निलंग्याहून येणारा सग्गा माणुस सोय-यासारखा जवळचा वाटतो.गावात दरवर्षी जुन्या गावाजवळील दर्ग्यात यात्रा भरते.या ठिकाणीही युसुफ मामु हजर असतो. तसेच लामजनापाटी वरील असलेल्या दत्तमंदिराजवळ यात्रेला गेलो असता युसुफ मामु तिथं कुस्तीच्या फडाजवळ थांबल्याचे आठवते.मला जाताना युसुफ मामु म्हणाला,"सर, काम थांबवावं म्हणत होतो." त्याच्या चेह-यावर थकव्याचे, रिटायरचे भाव दिसले."पण काम नाही केलो तर पोट कसं भरणार सर?"त्याच्या या शब्दाने मी भानावर आलो.पोटात कालवा कालव झाली.बालपणीच्या गोड आठवणीत मी रमुन गेलो होतो.पोटाची भूख खुप भयंकर असते याची मला युसुफ मामुकडे पाहुन जाणीव झाली.युसुफ मामु बद्दल माझ्या मनात खुप आदराचा भाव निर्माण झाला.या कर्मयोग्याला मी मनोमन प्रणाम केला. ईमानदारीला जीवनात किती महत्त्व आहे याचं अप्रतिम उदाहरण म्हणुन युसुफ मामु कडे आपुलकीने पाहु लागलो.परमेश्वर अशा माणसांना काम करण्याची विलक्षण शक्ती देतो .भर उन्हात आईसफ्रुट विकणे यावरुन मामुच्या प्रतिकार शक्तीची कमाल वाटते.एवढं वय होऊन सुद्धा युसुफ मामुच्या प्रकृती,शरीरयष्टी यात कसलाचं बदल नाही.माझ्या समोरील दुनियेत मी खुप बदल पाहिला. निवडुंग वृक्ष जसा बारमाही हरित असतो.फुला-फळांनी बहरलेला असतो.अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही तो जीवन जगतो.जीवनावरचे त्याचे प्रेम विलक्षण असते.काटेरी असुन सुद्धा मनात गोडवा भरलेला असतो.युसुफ मामुचं जीवनही असचं.आभाळाची आम्ही लेकरं काळी माती आई.दूधात साखर विरघळावी तसा हा माणुस इथल्या माणसात रमुन गेलेला.अति कमवण्याची हाव नाही की धडपड नाही.जीवन साधेपणाने, कष्टाने जगावे हा जीवनाचा साधा मंत्र युसुफ मामु सर्वांना देतो.सतत कष्ट करणा-या कष्टकरी व प्रामाणिक माणसांच्या चरणाजवळ मला जीवनाचे सत्य सापडते. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथेचं कर माझे जुळती.माझे व कित्येकांचे बालपण अशा लोकांमुळे अर्थपुर्ण झाले.जीवनाचे विविध अर्थ समजले.या प्रामाणिक कर्मयोग्याला साष्टांग नमस्कार.🙏🏻 *श्यामसुरेश गुमानगिरी गिरी माध्यमिक शिक्षक जिल्हा परिषद प्रशाला अंबुलगा ( बु.) तालुका निलंगा जिल्हा लातूर पिन 413521 भ्रमणध्वनी - 9923060128*
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)