रविवार, १० डिसेंबर, २०२३

*तुका आकाशाएवढा* माझ्या प्रिय बांधवांनो आणि भगीनींनो,आज माझं मन खुप भरुन आलय; कारण काय तर जगदगुरु संत तुकोबांवर मी सर्वप्रथम लिहितोय.20 मार्चला तुकाराम बीज आहे. जगद्गुरु तुकोबांचे स्मरण करतोय.संत तुकोबांवर लिहिण्याचे धाडस करतोय.लेखनात काही चूक-भूल झाली तर वाचकांनी थोर मनाने क्षमा करावी ही प्रार्थना.एक काळ असा होता जो जगद्गुरु तुकारामांच्या अभंगांनी संपुर्णपणे भक्तिमय झालेला काळ होता. महाराष्ट्रात घरोघरी, किर्तनात, प्रवचनात तुकोबांच्या अभंगांनी भक्तिचा मळा फुलवला होता.तुकोबा लोकशिक्षक होते.चालतं-बोलतं विद्यापीठ होते.त्या काळी वारकरी प्रेमाने विठु माऊलीला भजनात आळवत होता.सुंदर ते ध्यान गात होते.विवेकाचा दीप व भक्तीचा मोगरा मनामनात फुललेला व मानवतेचा दरवळ जनाजनात पसरलेला होता.*ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस* संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी *विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या अभंगाप्रमाणे सर्वांना, भागवत धर्म सांगितला. संत तुकारामांनी भागवत धर्माच्या मंदिरावर भक्तीरुपी कळस चढविला. अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर या अभंगाप्रमाणे तुकारामांच्या काळात सर्वत्र भक्तीचा महापूर लोटलेला होता.वारकरी धर्मभेद,पंथभेद,जातीभेद मानत नव्हते.खेळ मांडीयेला वाळवंटी ठायी, नाचती वैष्णव भाई रे । एकोप्याने पंढरीची वारी करत होते.जगद्गुरु तुकोबांनी सदाचार संपन्न जीवनाचा पुरस्कार केला.तुकोबांना सर्वत्र परमेश्वराचं रुप दिसत होतं.त्यांनी भूतदया व समतेचा प्रचार केला. तुकारामांचे गाव देहू.त्यांचे वडील किराणा दुकानदार व्यापारी होते.घरी किराणा मालाचे दुकान होते. शेतीभाती होती.काळ बदलला.काही काळानंतर विठ्ठल भक्त तुकारामांचे मन कशातचं रमले नाही.जीवनातील अनेक वाईट घटना,घरातील आप्तजनांचे,स्वकीयांचे अचानक झालेल्या मृत्युमुळे ते सतत एकांतात रहात असत .सतत परमेश्वराच्या नामस्मरणात दंग रहात असत.परमेश्वराचे नामस्मरण करताना त्यांना कशाचेचं भान रहात नसे.त्यांना विठ्ठल भेटीची प्रचंड ओढ लागलेली होती.ते पुण्याजवळ असणा-या भामनाथाच्या डोंगरावर जाऊन रात्रंदिवस विठ्ठलाचे नाम स्मरण करत असतं.तुकोबांना जीवनात अनेक संकटे आली.अनंत अडचणींचा सामना करावा लागला.तरीही त्यांच्या ईशभक्तीत कमी आली नाही.कर्मकांडापेक्षा भक्ती कशी श्रेष्ठ याचा ते उपदेश करीत होते.तुकोबा अभंग रचत,लिहित.काही लोकांना त्यांचे प्रगल्भ विचार आवडलेले नाहीत.त्यांची धर्मपत्नी आवली सुद्धा तुकोबांवर राग दाखवत,नाराज असे.तुकोबांच्या भोवताली काही वाईट लोक होते. दूष्ट विचार धारेच्या लोकांना त्यांची किर्ती आवडली नाही.त्यांनी तुकोबांची अभंगगाथा इंद्रायणी नदीत बुडविली ; परंतु लोकांना तुकोबांचे अभंग तोंडपाठ होते.त्यांची अभंगवाणी लोकांच्या मुखात शाश्वत राहिली.तुकोबा हे महाकवी होते.आपला जीवन संघर्ष त्यांनी अभंगवाणीत चित्रीत केला.स्री- शुद्रांना त्यांनी उद्धाराचा मार्ग दाखविला.महाराष्ट्रातील जनतेला तुकोबांमुळे भक्तीचे महत्त्व अधोरेखीत झाले.खरा धर्म समजला.जे का रंजले गांजले,तयासी म्हणे जो आपुलें तोचि साधु ओळखावा,देव तेथेंची जाणावा. तुकोबांनी या अभंगात रंजल्या-गांजल्यांना आपलंसं करण्याचा मंत्र दिला; त्याचंबरोबर खरं साधुत्व ओळखण्याची सर्वांना दृष्टी दिली. रंजल्या-गांजल्यांना आपलसं करण्या-यातचं देव जाणावा हे सांगितलं.देव जाणण्यासाठी कर्मकांडाला फाटा देऊन जनसेवा हीच ईश्वरसेवा* अशी समग्र दृष्टी दिली.सज्जनांचे चित्त हे नवनीतासारखे आतुन व बाहेरुन मृदू असते.असे हे सज्जन साधु हेचं परमेश्वराचे प्रतिरुप आहेत दाखवुन दिलं. भूतदया हा परमोधर्म असुन त्याचा प्रचार व प्रसार करुन जीवन जगणारे साधु हेचं परमेश्वराचे सच्चे भक्त आहेत.अशा सज्जनांचा सतत सहवास मिळावा म्हणुन ते परमेश्वराला प्रार्थना करतात. तसेच दुर्जनांना विवेक दृष्टी मिळावी यासाठीही ते विनवणी करतात.पुढे ज्ञानदेवांचा विचार वारसा तुकोबांनी प्रत्यक्ष कृतीतुन जनतेत रुजवला.तुकोबांचे साहित्य हे विवेकशील चिंतनातुन व सत्य जीवनाच्या अनुभवातुन समाजासमोर आलेले बावनकशी सोनं आहे. तुकोबांमुळे समाजाला सत्य धर्माचे दर्शन झालेले आहे.सार ते घ्यावे असार ते सोडुन द्यावे.असत्य, टाकाऊ काय आहे? हे ओळखण्यास तुकोबांनी शिकवले. तुकोबांमुळे लोकांना असत्य व सत्य ओळखण्याची दृष्टी निर्माण झाली.तुकोबांनी इंद्रायणी नदीत आपल्या वडीलकीचे परंपरेने पुढे आलेले सावकारकीचे कर्जाचे, हिशोबाचे गाठोडे बुडवून शोषण मुक्त समाजाचे दर्शन तुकोबांनी प्रत्यक्ष उदाहरणातुन सहजपणे समाजासमोर आपल्या आचरणातुन मांडले आहे.समाजातील विकृतीवर तुकोबांनी विचाररुपी काठीचा प्रहार करुन बिघडलेल्या व वाट सोडुन वागणा-या लोकांचे प्रबोधन केले आहे. *तुकाराम बीज* वारक-यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे तुकाराम बीज.याचं दिवशी देहू गावातून जगद्गुरु तुकोबा वैकुंठाला गेले. आम्ही जातो आपुल्या गावा । आमचा राम राम घ्यावा ॥१॥ आजवर होतो तुमच्या ठायी।आता कृपा असु द्यावी ।।२।। तुमची आमची हेचि भेटी । येथुनियां जन्मतुटी ॥३॥ आतां असों द्यावी दया । तुमच्या लागतसें पायां ॥४॥ येतां निजधामीं कोणी । विठ्ठलविठ्ठल बोला वाणी॥५॥ रामकृष्ण मुखी बोला । तुका जातो वैकुंठाला ॥६।। तुकाराम बीज वारक-यांच्या मनात विठ्ठल भक्तीचे बीजा रोपण करते.विठ्ठल-विठ्ठल प्रेमाने बोला.राम-कृष्ण-हरि मंत्र जपा.सर्व प्राणी मात्रांवर दया करा.आपले जीवन हे सार्थकी लावा.मोहाच्या जाळ्यात अडकु नका. सदाचार हाच मानवाला चांगुलपणाकडे घेऊन जातो. परमेश्वरावरील नितांत प्रेमाचे ,भक्तीचे अंतिम टोक म्हणजे मुक्ती.परमेश्वरावर श्रद्धा ठेवा.अंधश्रद्धा ठेवू नका. तुकोबांनी भक्तीचे अंतिम टोक गाठले.सर्व विकारांपासुन मुक्ती मिळवली.त्यांची संसाररुपी भवसागरात कसलीचं इच्छा उरली नाही.तुकोबांनी मुक्ती मिळवली.आपल्याला जशी मुक्ती मिळाली तशी इतरांना लाभावी म्हणुन जगद्गुरु तुकोबा अभंगवाणीतुन उपदेश करतात.दूधात साखर विरघळावी तसे तुकोबा ईशतत्वात विलिन झाले. संत बहिणाबाई म्हणतात- ‘ज्ञानदेवे रचिला पाया । उभारीले देवालया ।।१।। नामा तयाचा किंकर । जेणे केला हा विस्तार ।।२।। नाथ दिला भागवत । तेचि मुख्य आधार ।।३।। तुका झालासे कळस । भजन करा सावकाश’ ।।४।। कुंभार जसा मडके थापटतो व आतुन हाताचा आधार देतो.याचप्रमाणे तुकोबांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा,ढोंगीपणा यावर कठोर प्रहार केला.लोकांना प्रेमाने समजावुन सांगितले. अंगा लावूनिया राख डोळे झाकुनी करती पाप। तुका म्हणे जळो तयाची संगती।। ढोंगी लोकांच्या संगती न राहण्याचा सल्ला तुकोबांनी दिला.खरा विवेक व वैज्ञानिक दृष्टीकोन तुकोबांनी समाजात रुजविला. तुकोबांचा एक-एक अभंग म्हणजे अमृताची वाणी.तुकोबांनी किर्तनरुपी भक्ती मार्गाचा उपयोग करुन घरांघरात भागवत धर्माचा प्रसार केला.तुकोबांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे । वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती ।।या सारख्या अभंगातुन पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.भोंदू बाबांच्या ढोंगीपणावर शब्दरुपी आसुड ओढले.नवस सायास करु नका हे सांगितले.तत्कालिन भरकटलेल्या समाजाला तुकोबांनी ज्ञानाची विशाल दृष्टी दिली.तुकारामांपुढे पृथ्वीवरील सर्व चराचर नतमस्तक झाले.तुकोबांनी साध्या,सोप्या भाषेतुन, अभंगवाणीतुन लोक जागृतीची चळवळ उभी केली.अंध:कारातुन प्रकाशाकडे जाण्याची पायवाट दाखविली. अणुरेणियां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥ गिळुन सांडिलें कलेवर । भव भ्रमाचा आकार ॥२॥ सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥३॥ तुका म्हणे आतां । उरलो उपकारापुरता ॥४॥ माझ्या अल्पबुद्धीला जे काही चांगले सुचले ते वाचकांसमोर मांडलो आहे.तुकाराम बीज 20 मार्चला आहे.जवळच्या मंदिरात तुकाराम बीज सोहळा पहा.तुकोबांना आठवा. रामकृष्णहरि म्हणा.प्रेमाने भजन करा.विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आपलाचं *श्यामसुरेश गुमानगिरी गिरी माध्यमिक शिक्षक जिल्हा परिषद प्रशाला अंबुलगा ( बु.) तालुका निलंगा जिल्हा लातूर भ्रमणध्वनि 9923060128*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा