रविवार, १० डिसेंबर, २०२३
*बालपणीच्या आठवणी* *युसुफ (सग्गे) आईसक्रीमवाला* 13 मार्च 2022.भर दूपारची वेळ......ऊन मी म्हणत होते.....उन्हाच्या कडाक्याने अंगाची लाही लाही झालेली. अन मग कानावर आरोळी येते.आईसफ्रुट...... गॅरेगॅर .......गेली 30 ते 40 वर्षे ही आरोळी अजुनही कानावर पडते आहे; पण एक शब्द बदलला गॅरेगॅर ऐवजी आईसफ्रुट.....मी सरपण घेऊन दूपारी शेताकडुन येणा-या ट्रॅक्टरची वाट पहात सार्वजनिक पाणवठ्याजवळ थांबलो होतो.आयाबाया पाणी भरत होत्या.लोकांची शेताकडे जाण्याची लगबग सुरु होती.मोटारसायकली वेगात धावत होत्या.तेवढ्यात युसुफ आईसफ्रुटवाल्याची स्वारी आली.एका जुन्या लुनावर आईसफ्रुटचा फायबर बॉक्स बसवलेला होता.मी म्हणालो, " कसे आहात मामु?तुम्ही इथं थांबा.पाणवठा आहे लोकं इथं येतात." मला युसुफ म्हणाला, "काय चाललय सर?" युसुफ मामु 20 कि. मी.अंतरा वरील निलंगा शहरातुन गेली 30 ते 40 वर्ष लामजना गावात येऊन आईसफ्रुट विकतो आहे.वयाच्या 18 व्या वर्षापासुन मी हे काम करतो असल्याचे त्याने सांगितले. लामजना गावातील सर्वजण त्यांना सग्गे म्हणुन हाक मारतात.तेवढ्यात एक गि-हाईक आलं.युसुफ म्हणाला," कोणतं देऊ? 10 चं कि 5 चं."युसुफ माझ्याकडे वळुन म्हणाला," सर पाच -दहा पैश्यापासुन मी आईसफ्रुट विकतो आहे."माझ्या डोळ्यासमोरचं या लामजना गावचं पुनर्वसन झाल्याचं त्यानं सांगितलं. भूकंपापुर्वी व भूकंपानंतर बरीचं वर्ष युसुफ सायकलवर,आईसफ्रुट घेऊन यायचा.निलंगा पासुन 20 कि.मी. अंतरावरुन येऊन लामजना गावात दिवस भर फिरुन आईसफ्रुट विकायचा. तोंडात आवडती सुपारी धरायचा.दोन चार गि-हाईकं झाली. पाणवठ्यावर पाणी पिऊन युसुफ थोडा वेळ थांबला गप्पा मारत मारत तो पुढे निघाला.तेवढ्यात ओळखीच्या व्यक्तीने युसुफला नमस्कार केला.आईसफ्रुट खायचय का? म्हणुन विचारत, विचारत त्याने लाल रंगाचं आईसफ्रुट त्याच्या हातावर ठेवलं.तो माणुस कमालीचा खुप आनंदीत झाला. युसुफच्या चेह-यावर समाधानाची लकेर उमटली.मी लहान असताना युसुफ शाळेसमोर येऊन थांबायचा.कॅरीयरला एक लाकडी बॉक्स अडकवलेला असायचा.त्यावर लोखंडी पत्र्याचे आवरण होते. कधी-कधी तो बर्फाचा भला मोठा चौकोनी ठोकळा कलतानी पोत्यात बांधुन आणायचा.पांढरा बर्फ रंध्याने खिसायचा; त्यावर लाल,केशरी,पिवळा,हिरवा गोड रंग ओतायचा.त्याचा तो सप्तरंगी गोळा खाताना खुप मजा वाटायची.गॅरेगॅर शेवटपर्यंत खाणं एक चॅलेंज असायचं ; कारण मध्येचं तो गोळा जमीनीवर पडायचा.खाणा-याचा चेहरा बघण्यासारखा व्हायचा.काही तरी हरवलं आहे असा. भंगार जमा करण्यासाठी दोन कलतानी पोते सायकलच्या कॅरीयरला अडकवलेले असत.हे सर्व गबाळ घेऊन तो गावभर फिरायचा.माझ्या हातातील बर्फाचा गोळा मध्येचं निसटुन जमीनीवर पडायचा हातात फक्त काडी उरायची.जवळ उभारलेली मुले खो-खो हसायची.जिभ गुलाबी व्हायची.शाळेत असताना बर्फाचे गोळे खाणा-या मुलांच्या जीभांची तपासणी करुन बिडवे सर खुप मारत असत कारण त्यामुळे आजार होतात असं सर सांगायचे.असलं तत्त्वज्ञान गळी उतरणं मुलांच्या बाबतीत तर खुप अवघड असे.आता युसुफचं वय 55 ते 60 च्या दरम्यान आहे.डोक्यावर एका विशिष्ट पद्धतीने तो रुमाल बांधतो.कित्येक वर्षांपासुन त्यांच्या डोक्यावरील रुमाल बांधण्याची स्टाईल अजुन तरी बदललेली नाही.युसुफ मामुला ऊन कसं लागत नाही; याचं मला खुप नवल वाटे.युसुफचे कपडे खुप साधे लांब बाह्याचा शर्ट तशीच लांब पॅंट.सकाळी 10 पासुन 5 वाजेपर्यंत युसुफ गावभर फिरायचा अजुनही फिरतो.उन्हाच्या आडोशाला बसलेली माणसं,मुले युसुफला पाहुन खुप आनंदित व्हायची.मुले व मुली कांहीतरी भंगार वस्तु घेऊन युसुफकडे धाव घेतात.मग युसुफ मामु गि-हाईकाच्या पसंतीचं आईसफ्रुट हातात अलगद टेकवतो. गि-हाईकाकडे तो लक्षपुर्वक आस्थेने पहातो.काय हवे? काय नको? याचा अंदाज बांधतो.युसुफ दररोजच्या गि-हाईकांची त्यांच्या घराजवळ जाऊन वाट पहातो.दररोजच्या गि-हाईकाची भेट घेणं युसुफला आवडतं.तो समोरच्या व्यक्तीची ख्याली खुशाली सहज विचारतो. माणसांची त्याला खुप आपुलकी.इतक्या दुरुन येऊन हा माणुस कष्ट करुन पोट भरतो याचे मला नवल वाटे.मला नम्र,शांत,प्रेमळ, स्वाभिमानी,कष्टाळु,प्रामाणिक युसुफ मामुचा खुप अभिमान वाटतो.शर्टाच्या खिशात तो चिल्लर पैसे ठेवतो.त्या चिल्लरचा आवाज कानावर पडतो.थोड्या चुरगळलेल्या दहा-दहाच्या नोटा तो पँटच्या उजव्या खिशात ठेवतो.शंभरची एखादी दूसरी नोट वेगळ्या पॉकेटमध्ये ठेवतो.सरळ स्वभावी युसुफ मामुला सर्वजण सग्गे म्हणतात.सग्गे म्हणजे सोयरा.सर्वांना हा निलंग्याहून येणारा सग्गा माणुस सोय-यासारखा जवळचा वाटतो.गावात दरवर्षी जुन्या गावाजवळील दर्ग्यात यात्रा भरते.या ठिकाणीही युसुफ मामु हजर असतो. तसेच लामजनापाटी वरील असलेल्या दत्तमंदिराजवळ यात्रेला गेलो असता युसुफ मामु तिथं कुस्तीच्या फडाजवळ थांबल्याचे आठवते.मला जाताना युसुफ मामु म्हणाला,"सर, काम थांबवावं म्हणत होतो." त्याच्या चेह-यावर थकव्याचे, रिटायरचे भाव दिसले."पण काम नाही केलो तर पोट कसं भरणार सर?"त्याच्या या शब्दाने मी भानावर आलो.पोटात कालवा कालव झाली.बालपणीच्या गोड आठवणीत मी रमुन गेलो होतो.पोटाची भूख खुप भयंकर असते याची मला युसुफ मामुकडे पाहुन जाणीव झाली.युसुफ मामु बद्दल माझ्या मनात खुप आदराचा भाव निर्माण झाला.या कर्मयोग्याला मी मनोमन प्रणाम केला. ईमानदारीला जीवनात किती महत्त्व आहे याचं अप्रतिम उदाहरण म्हणुन युसुफ मामु कडे आपुलकीने पाहु लागलो.परमेश्वर अशा माणसांना काम करण्याची विलक्षण शक्ती देतो .भर उन्हात आईसफ्रुट विकणे यावरुन मामुच्या प्रतिकार शक्तीची कमाल वाटते.एवढं वय होऊन सुद्धा युसुफ मामुच्या प्रकृती,शरीरयष्टी यात कसलाचं बदल नाही.माझ्या समोरील दुनियेत मी खुप बदल पाहिला. निवडुंग वृक्ष जसा बारमाही हरित असतो.फुला-फळांनी बहरलेला असतो.अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही तो जीवन जगतो.जीवनावरचे त्याचे प्रेम विलक्षण असते.काटेरी असुन सुद्धा मनात गोडवा भरलेला असतो.युसुफ मामुचं जीवनही असचं.आभाळाची आम्ही लेकरं काळी माती आई.दूधात साखर विरघळावी तसा हा माणुस इथल्या माणसात रमुन गेलेला.अति कमवण्याची हाव नाही की धडपड नाही.जीवन साधेपणाने, कष्टाने जगावे हा जीवनाचा साधा मंत्र युसुफ मामु सर्वांना देतो.सतत कष्ट करणा-या कष्टकरी व प्रामाणिक माणसांच्या चरणाजवळ मला जीवनाचे सत्य सापडते. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथेचं कर माझे जुळती.माझे व कित्येकांचे बालपण अशा लोकांमुळे अर्थपुर्ण झाले.जीवनाचे विविध अर्थ समजले.या प्रामाणिक कर्मयोग्याला साष्टांग नमस्कार.🙏🏻 *श्यामसुरेश गुमानगिरी गिरी माध्यमिक शिक्षक जिल्हा परिषद प्रशाला अंबुलगा ( बु.) तालुका निलंगा जिल्हा लातूर पिन 413521 भ्रमणध्वनी - 9923060128*
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा