रविवार, ११ एप्रिल, २०२१

बालपणीच्या आठवणी

*डॉक्टर वाघ काका* *शब्दांकन* *श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता.औसा जि.लातूर* " ओ, डॉक्टर काका !" मी थोड्याशा क्षीण आवाजात हाक मारली. " कोण आहे रे तिकडे? " असा खणखणीत आवाज माझ्या कानावर पडला. " डॉक्टर काका , मी श्याम आहे ,येऊ का आत ? "मी दारात उभा थोडासा जोरात बोललो." कुत्रं अंगावर येतय का तुमचं" , चावलं तर? मला त्याची लई भीती वाटते. माझा आवाज ऐकून कुत्रा जोरजोरात भुंकू लागला. डॉक्टरांनी "चुप कर" असं म्हणताच तो गप्प झाला. डॉक्टरांनी आपल्या डोक्यावरील चष्मा काढुन डोळ्यावर चढवला "अरे श्याम तू आहेस का? ये की आत , मोतीला मी बांधुन ठेवलोय. असा दूरुनचं काय ओरडतो आहेस? " डॉक्टर काका बोलले.त्यांचा चष्मा पाहुन मला हिंदी तील " मामा की ऐनक" पाठाची आठवण झाली. पांढ-या शुभ्र फुल्ल बाह्याचे पातळ बनियन व पांढ-या रंगाची पँट हा डॉक्टर काकांचा बारमाही वेष. ते गांधीजींसारखा चष्मा घालत.वयोमानामुळे त्यांच्या डोक्यावर एकही केस शिल्लक नव्हता.डॉक्टरांच्या मॅडम आम्ही त्यांना नन्नी म्हणत असु मी गेलो त्या सकाळी नास्ता बनवत होत्या.फोडणीचा दरवळ सर्वत्र पसरला होता.डॉक्टर वाघ यांच्या हातांना धन्वंतरीचा स्पर्श होता.रावण पुत्राच्या हातुन लक्ष्मणाला शक्ती लागली तेंव्हा उचलबांगडी करुन ( पकडुन )आणलेल्या डॉक्टरांपेक्षा मला डॉक्टर वाघ काका खुप अभ्यासु वाटत.अत्यंत दूर्धर आजारावर डॉक्टर वाघ काका रामबाण औषध देत. रुग्ण बरा झाल्यावर डॉक्टरांची आवर्जुन भेट घेत असे. लामजना पंचक्रोशीत काविळ, गोवर, टायफाईड , कॉलरा,मलेरिया,धनुर्वात यासारख्या कित्येक आजाराचे निदान व उपचार करण्यात डॉक्टरांचा हातखंडा होता.ते रुग्णाकडुन अत्यंत कमी पैसे घेत.ब-याच वेळेला अर्धी गोळी देत.आवश्यक असेल तर इंजेक्शन देत.परंतु रुग्ण पथ्य पाळत नसेल वेळेवर औषध घेत नसेल तर खुप राग राग करत.त्यांच्या क्लिनिक मध्ये कमालीची स्वच्छता असे.त्यांचे सर्व साहित्य एका लाकडी कपाटात अत्यंत टापटीप रितीने मांडुन ठेवलेले असायचे.रुग्ण सेवेत डॉक्टरांची संपुर्ण हयात गेली. वयाची साठी ओलांडून सुद्धा डॉक्टरांचा आवाज अत्यंत खणखणीत होता.घरासमोर अडकवलेल्या पिंज-यातुन एक पोपट येणा-याला " या बसा. राम राम" असं म्हणत असे.त्याचे ते मधुर बोल ऐकून रुग्णाला क्षणभर खुप चांगलं वाटत असे.डॉक्टर काका मूक पशुंबरोबर सहज संवाद साधत.ते सहज प्रतिसाद देत.डॉक्टर काकांचं ते ऐकत.हे पाहून मला खूप नवल वाटे.डॉक्टर काकांच्या पुर्वजांनी वाघ पाळला असावा म्हणुन त्यांचे आडनाव वाघ असावे.असा मी विचार करत असे. मी डॉक्टर काकांना हळू आवाजात म्हणालो, " डॉक्टर काका तुमचा मिठु कसा काय राम राम करतो, बोलतो?हे संगळं त्याला कसं येतं? त्यांनी मला सांगितलं, " हे बघ श्याम, तो मिठु रात्री माझ्या उशाजवळ असतो. रात्री मी त्याच्याशी खुप गप्पा मारतो. ऐकून ऐकून हळूहळू तो बोलायला शिकला. त्यांच्या जवळ जाताचं डॉक्टरांनी माझ्या पाठीवरुन मायेने हात फिरवला व माझे चिमुकले हात हातात घेतले.त्यांच्या हाताला एकदम चटका बसला. अरे,तुझ्या अंगात तर किती ताप आहे? " हो, डॉक्टर काका दोन- तीन दिवस झाले,खुप ताप येतोय.गोळी पण घेतलो.काही फरक पडत नाही." " सध्या घरी कोण आहे का? जा त्यांना सोबत घेऊन ये. अजुन कोणीतरी आलं. डॉक्टरांनी हिटर लावुन त्यात इंजेक्शनच्या सुया उकळायला टाकल्या होत्या.त्यांचा सुइं सुइं आवाज येत होता.मध्येचं गाईचे हंबरणे व वासराचा आवाज ऐकू येई. त्यांनी एक गाय पाळली होती.खुप दूरवरुन तिला आणलं होतं. पूजा मांडून गाईचं स्वागत अतिथी सारखं केलं होतं .मूक पशूंचा ते जीव लावून सांभाळ करत.सकाळी डॉक्टर काकांच्या वाड्यात गेल्यावर खुप प्रसन्न वाटे. पारिजातकांचा सुगंध सर्वत्र दरवळत असे. डॉक्टरांच्या वाड्यात वेळ कसा जातो ते मला समजत नसे.भूकंपानंतर त्यांनी मला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या खुप गोष्टी सांगितल्या. डॉक्टर काकांना युद्धकथा, शौर्यकथा खुप आवडत.ते नित्य नियमाने पेपर वाचत. रेडिओवरच्या बातम्या ऐकत.त्यांना साहित्याची पण आवड होती.ते कधीतरी घरा बाहेर पडत.त्यांच्या घरी रुग्ण अधुन मधुन येत.त्यांच्या बाहेर फिरण्याला मर्यादा येत असे. मी घरी जाऊन आईला सोबत घेऊन आलो. डॉक्टरांनी मला तपासले. जीभ दाखव असं म्हणाले. "टायफडवर जाण्याची जास्त शक्यता दिसत आहे", डॉक्टर चष्मा हटवत बोलले. हिटरमध्ये उकळत असणा-या इंजेक्शनच्या सुयांचा आवाज ऐकुन माझ्या पोटात गोळा आला.त्यांनी काही गोळ्या दिल्या व पथ्यपाणी करायला सांगितलं.पंधरा दिवसानंतर पुन्हा मी नॉर्मल झालो.काही कालावधी नंतर मला गोवर व कांजिण्या झाल्या.डॉक्टर वाघ काकांनी केलेल्या ट्रिटमेंटमुळे मी लवकर बरा झालो .काहीही म्हणा डॉक्टरांच्या उपचारात एक अलौकिक जादू होती.त्यांचे निदान व त्यावरील उपचार अचूक असल्यामुळे रुग्ण हमखास बरा होणारचं प्रत्येकाला खात्री असायची.पथ्य पाणी न करणा-या रुग्णांचा समाचार घेत.समजावुन सांगत.आवाक्याबाहेरचा रुग्ण ते दूसरीकडे लातूरला वगैरे रेफर करत.सल्ला अचूक देत. डॉक्टर काकांचे मोजकेचं मित्र होते.ते त्यांना घरी बोलावत.नन्नी विविध पदार्थ तयार करुन आतिथ्य करत.त्या अत्यंत नम्र, प्रेमळ होत्या.त्यांचा चेहरा अत्यंत प्रसन्न व हसरा दिसे. डॉक्टरांची शिस्त कमालीची होती.त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान सखोल होते.डॉक्टरांनी रुग्णसेवा चांगली केली .एका दुर्धर आजाराचा त्यांनी स्वत: अत्यंत खंबीरपणे सामना केला.पण कधीही भासू दिले नाही. अत्यंत कठोर, खंबीर, कणखर,रागीट वाटणारे डॉक्टर वाघ काका मनाने खुप चांगले व प्रेमळ होते.अनेक लोकांना डॉक्टरांनी वेळ प्रसंगी धावून मदत केली.डॉक्टर काका सध्या जगात नाहीत. त्यांचे पुण्यस्मरण नेहमी होते.पारिजातकाच्या फुलांतील गंधाप्रमाणे दरवळावे व आसमंतात मिटुन जावे असे डॉक्टर जीवन जगले. *बालपणीच्या आठवणी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा