बुधवार, ७ एप्रिल, २०२१
बालपणाीच्या आठवणी
*गोट्यांचा डाव*
*शब्दांकन*
*श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता.औसा*
"आबे ,बघा बे! माझा शेर भरला की गोट्यांनी गच्च "
खुळखुळ.
"हाय का कुणाच्यात दम? ,येताव का माझ्या संग गोट्या खेळायला.?"
खुळखुळ.
आमच्या वाड्यातील तात्यांचा नातू दत्त्या मोठ्या तो-यात बेडकावानी छाती फुगवुन बोलला. गर्वाने त्याचा चेहरा फुलुन गेला.
आमच्या गावात नावाला " या " जोडण्याची एक निराळी पद्धत होती जी सर्वत्र असते.मित्रांच्या नावाला "या" जोडण्याच्या सुपीक कल्पनेचे मूळ अतिप्रेमात असावे असं मला नेहमी वाटायचं.त्याचा तो आवाज ऐकुन त्याचे बालसंवगडी , काल्या,वाल्या,ना-या,गज्या,मुन्या,कैल्या नेहमीप्रमाणे धावत - पळत आले.
डोक्यातून निघालेला घामाचा लोंढा दत्तुने डाव्या शर्टाच्या बाहीने पुसला. डोळे मिचकावुन व किलकिले करुन त्याने माझे आव्हान कोण स्विकारतो का?असा सवालबद्ध चेहरा करुन युद्धातील सैनिकाप्रमाणे इकडे-तिकडे पाहू लागला.दूपारी दीड नंतर नित्यनेमाने शाळा बुडवून आमच्या गल्लीत मुलांचा मोठ्ठा गोंधळ उडायचा.आम्हाला मात्र गोट्या खेळण्याची घरुन परवानगी नसे.गोट्या खेळल्यामुळे माणुस बिघडतो हे नेहमी सांगितलं जायचं. उपदेशाचे डोस सरकारी डोसाप्रमाणे दिले जाई.गोट्या राष्ट्रीय खेळाच्या यादीत नसलेल्या खेळापासुन मी थोडासा वंचित राहिलो. मुलांचा गोंधळ पाहुन काही माणसं गोट्या खेळणा-या मुलांच्या अंगावर धावुन जात.
"आरं जावा की घरात बसा की जरा थंड.उन मन उन झालय आण तुमचा नुस्ता धिंगाणा. "
दूपारी जेवणानंतर गल्लीतील माणसांचा जरा डोळा लागला तर कार्टे मोठ्याने आरडाओरडा करत असत . अंगावर धावुन आलेल्या माणसाच्या मारापासुन वाचवण्यासाठी ही गोट्या खेळणारी मंडळी मग तिथुन धूम ठोकत.आपलं ठिकाण तात्पुरतं बदलत. एकतर नेहमीच्या गोटे गल्लीत नाहीतर तेल्याच्या पिठाच्या गिरणी समोर नेहमीच्या जागेवर मुलांचा खेळ सायंकाळ होईपर्यंत चाले.पिठाची गिरणी सकाळपासुन सुरुचं असायची.पंचक्रोशीतील भरपूर लोकांची गिरणीत गर्दी होत असे.म्हातारीचा तोंडाचा पट्टा चालावा तसा गिरणीतून आवाज येई.गिरणीच्या आवाजात मुलांचा गोंधळ मिसळुन जाई.तेल घाण्याचा पट्टा जोरात चाले.परगावाहून घणा गाळण्यासाठी आलेल्या बैलगाडी खाली बसुन मुले प्रेक्षक बनुन गोट्याचा डाव मजेने पहात असतं.काही मुलं गाडीला वानरासारखं लोंबकळत असत.दहा- वीस मुलं बैलगाडीत जाऊन बसत मग बैलगाडी ओझं वाढत जाऊन अचानक उनाळ होई.मुले बैलगाडीतुन उड्या ठोकत.बैलगाडीच्या खाली सावलीची जागा त्यांना सिनेमाथियटर प्रमाणे बाल्कनीची वाटे.तिथं थोडी सावली असे.मुलं गर्दी करुन बसत.मध्येचं पाण्याचा टॅंकर आला की मुलांचा खेळखंडोबा होई.पाण्याचा टँकर गेला की पुन्हा नव्याने डाव रंगत असे.काही वेळा एकमेकांना ते शिव्याही देत भांडणं, मारामारी पण करत.कधी - कधी जोरदार रडण्याचा आवाजही कानावर येई.दूपारच्या जेवणाच्या सुट्टीत आईचा डोळा चुकवुन मी मुलांचा खेळ पहायला जात असे.गोट्या खेळणा-या एकाच्याही पायात चप्पल नसे.भर उन्हात फुफुर्ट्यात त्यांचा खेळ चाले.गोट्याचा डाव ऐन रंगात आला की कोणीतरी "आण्णा आले रे " म्हणुन जोरात ओरडायचा. मुलं कावरीबावरी होऊन आण्णा ज्या रस्त्याने येत तिकडं मुलं पहात असत. आण्णा दिसताचं धूम ठोकत. मुलांच्या मनात आण्णाची इतकी दहशत होती की समोर साक्षात यमराज आल्याचा त्यांना भास होई.आण्णाचे दात पडल्यामुळे तोंडाचं पार बोळकं झालेलं दिसायचं. धोतर सावरत आण्णा मुलांचा पाठलाग करीत. पोरं गोट्या तिथचं टाकुन वाट सापडल तिकडं पोबारा करत. समदी मुलं इकडं- तिकडं लपून बसत.बैलगाडी खाली बसलेली मुलं आण्णा लांब असतानाचं गोट्या मांडलेल्या डावावर तुटून पडत व गोट्या सावडुन तिथून पोबारा करीत."तुमच्या बायलीला थांबा जरा.पुन्हा हिकडं या मग दावतो तुम्हाला. "असं म्हणुन आण्णा बैलगाडीच्या खालुन गोट्या सावडण्यासाठी आलेल्या मुलांचा पाठलाग करत.राहिलेल्या सर्व गोट्या सावडुन आण्णा तिथुन निघत.आण्णांचा हा दशावतार पाहुन मुलांची दोन दिवस घाबरगुंडी उडे. थोडे दिवस वेळ गल्लीत मसणवाट्यासारखी शांतता पसरे पण हे गिरणी बंद असल्यावर लई जाणवत असे. एरवी हे सर्व नेहमीचं होतं. कधी-कधी रंगलेल्या डावात वाडीकर आण्णा धोतरासकट मांडी घालुन बसत मग मुलांची पाचावर धारण बसे.ते गुपचूप मुलांच्या पाठीमागे येऊन थांबत.त्यांची ती भलीमोठी सावली मुलांना गिळुन टाकत असे. यापुढे मुलांनी आण्णांचा जाण्या येण्याचा टाईम टेबलचं पाठ केला.चार गोट्या देऊन एका मुलाला आण्णाकडे लक्ष ठेवण्याची नामी शक्कल त्यांनी शोधुन काढली.
तेवढ्यात दत्त्याकडं पाहुन माडीवरुन रम्या गर्जला,
"ये थांब की रे मी यीवलालाव ; तुझ्यासंगं म्या एकटाचं बस्स. पुरुन उरताव तुला बे. मी ग्रबु पट्ट्या खाली आलोचं की आता "
माडीवरुन खाली डोकावत रम्या जोरात बोलला.दत्त्याचे आव्हान त्याने सहज, अलगद स्विकारले.दत्त्या त्याची वाट पाहु लागला.
गोट्यांनी भरलेला शेर वाजवत तो माडीवरुन खाली आला.आपल्या हातातील गोट्यांनी भरलेला शेर त्याने विजयी मुद्रेने सर्वांना दाखवला.दत्त्याजवळ असा शेर ( धान्य मोजण्याचे माप).वगैरे नव्हता.त्याच्या पँटचे दोन्ही खिसे व शर्टचा मोठा खिसा गोट्यांनी सदैव गच्च भरलेला दिसे.तो चालतांना गोट्यांचे तालबद संगीत ऐकू येई.कोणताही डाव दत्त्या सहज जिंके.गावातील गोट्या चॅंपीयन कडुन त्याने महत्त्वाचे डाव व मंत्र शिकुन घेतले होते.रम्या शेरातील गोट्या वाजवत खाली आला हे दत्त्याने पाहिले .एका मुलाला त्याने गोट्या सांभाळायची जबाबदारी दिली.
"शादी की गलपाणी? रम्या म्हणाला.
दत्त्याने "शादी" म्हणुन आपला आवडता डाव निवडला.
आपली मांडी थोपटुन "तुला आता खेळ दाखवितो बघ असं तो पुटपुटला.तसा पॅंटमधुन धुराळा उडाला.
" काय नेमं हायतं बे यांचे , केवड्याबी लांबुन नेम धरत्यात दोघं ,कवाचं नेम चुकत न्हाय त्यांचा."
खेळ पहाणारी पोरं चर्चा करु लागली.रम्यानं खेळ असा दाखवला की दत्त्या चारी मुंड्या चित झाला.गोट्याच्या खेळात दत्त्या एवढा रमुन गेला की,तेवढ्यात कोणीतरी त्याच्या डोक्यात खडा मारला हे ही त्याच्या लक्षात आले नसावे .थोडी जखम झाली.दत्त्याने त्याकडे साफ दुर्लक्ष केले.सात- आठ दिवस गेले.त्याच्या डोक्यातील टेंगुळ सदृश्य सुजलेल्या भागाकडे वाड्यातील किरायाने राहणा-या मावशीचे लक्ष गेले.तो खेळताना डोकं सतत खाजवु लागला.काय झालयं म्हणुन बघितलं तर डोक्यातुन एक अळी वळवळत खाली आली.नीटं पाहिलं तर डोक्यात जखम झालेली. सात-आठ आळ्या जखमेतुन निघाल्या मग त्याला गल्लीतील दवाखान्यात नेण्यात आले लहान मोठ्या चाळीस आळ्या डॉक्टरांनी काढल्या .डॉक्टरांनी मग शिव्या दिल्या.दवाखान्यात काय झालय हे पहायला बघ्यांची गर्दी वाढु लागली. लेकरं सांभाळता येत नसतील तर संन्यासी होऊन मठात बसण्याचा डॉक्टरांनी मोफत उपदेश केला.मलमपट्टी जोरदार झाली.काळ्या कुट्ट चेह-यावर पांढरी पट्टी दिसु लागली. इंजेक्शन ,गोळ्या देण्यात आल्या. बघ्यांनी दत्त्याच्या घरच्यांची फजिती केली.त्यांचा चेहरा ओशाळला.खेड्यात पालकांचा वेळ काबाडकष्ट करण्यात जातो.पालक मुलांच्या शिक्षणाची कधीतरी चौकशी करत.दिवसातुन दोन- तीन वेळा हळदेचा बखमा त्याच्या डोक्यात भरला जाऊ लागला.दोन - तीन दिवस गेले.जखम तशीचं घेऊन तो गोट्या खेळायला नव्या उत्साहाने पळ काढु लागला. गोट्या खेळताना दत्त्याचे डोके पिवळसर दिसू लागले.पांढरी पट्टी गळुन पडली.त्याच्या डोक्याकडे पाहताना मला बाभळीच्या झाडावर बसुन डोकं पिवळं करणा-या चिमण्यांची आठवण झाली.
रम्याकडुन हार स्विकारुन बाजीगरचा फिल्मसारखा तो डायलॉग मारु लागला. आपली गल्ली सोडुन दुस-या गल्लीतील पोरांसोबत तो गोट्या खेळु लागला.संध्याकाळी तो आपल्या विजयाची कहाणी सर्वांना सांगु लागला. मला समजतं तसं अपघाताने सुद्धा त्याची पुस्तकांची गाठ- भेठ कधीही होत नसे.गोट्या या एका खेळापुढे बाकी सर्व गोष्टी त्याला बिनकामाच्या वाटत.थोड्याचं दिवसात रामायण - महाभारत यासारख्या मालिकांचा त्याच्यावर परिणाम झाला.लिंबाच्या फोकाचा त्याने धनुष्य तयार केला.ज्वारीच्या गंडकाळ्यांचा बाण बनवला .गावात फिरणा-या डुक्करांवर त्याचं लक्ष गेलं.त्यांना तो राक्षस समजु लागला.आपल्या मित्रकंपनीला घेऊन तो त्यांचा पाठलाग करु लागला.या नवीन खेळात त्याचे मन फार काही रमले नाही.काही दिवसानंतर आपले पुराने साथी एकत्र करुन तो पुन्हा नव्याने डाव मांडु लागला.निलंग्याहून येणारा गॅरेगार वाला तिथं उभा राहुन यांचे खेळ बघु लागला.मनोरंजनाबरोबर त्याचे गि-हाईकही होऊ लागले.पोरं गॅरेगॅर साठी गल्लीत पतरस,लोखंड शोधु लागले.ते मिळताचं विजयी मुद्रेनं ते गॅरेगॅर वाल्याला देऊन बर्फाच्या तुकड्यावर ताव मारु लागले.गॅरेगॅर च्या रंगांने त्यांच्या जीभा रंगु लागल्या.तेचं रंग मला उन्हात चमकणा-या गोट्यात दिसु लागले.
*बालपणीच्या आठवणी*
®©
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा