बुधवार, ७ एप्रिल, २०२१
बालपणीच्या आठवणी
*बालपणीचा खारेमुरे वाला*
*शब्दांकन*
*श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता.औसा*
टण....टण....टण...जि.प.
प्रशाला लामजना शाळेची घंटा वाजली.
"चला बे लवकर ! चला पळा! निकम गुरुजी आल्यात बे!! आताचं सर चौकातून शाळेकडे गेल्यात. उशीर झाल्यावर लई मारत्यात रे!.....मित्राचा हा आवाज ऐकून मी शाळेकडे धावत - पळत सुटलो. शाळेत गेल्यावर पांढ-या शुभ्र कपड्यातले लक्ष्मण लांडगे मामा शाळेचा परिसर स्वच्छ करत होते हे दिसुन आले.ते मोगरगा गावचे आहेत.काही मुले निलगिरीच्या झाडांना पाणी घालत होती.मैदानावर काही मुले गोट्या खेळत होती.काही मुले आभाळात चेंडु उंच फेकून अचूकपणे झेलण्याचा प्रयत्न करीत होती.
"बंद करा बे, बिडवे गुरुजी व निकम सर येऊलालेत.तुमची पाठ लई सुळसुळ करलालीय का रे?गोट्या खेळणा-या मुलांकडे मी वळुन म्हणालो,"थांबा ,मीचं तुमचं नाव सर ला सांगतो".मला मारण्यासाठी दोन- तीन पोरं धावुन आली तसा मी तिथुन वेगाने पळत सुटलो.
चिंचेच्या झाडाखाली काही मुले क्रिकेट खेळत होती तर काही मुले निलगिरीच्या सावलीत पुस्तकं वाचत होती.मैदानावर मुले तुरळक होती.परंतु त्यांचा खेळण्यातला उल्हास मात्र मनाला प्रसन्न करणारा होता.9:45 वा. मैदान मुलांनी गच्च भरुन जात असे.
"जगताप सरांनी सांगितलेले गणितं केलासं का रे ? आज गाढे सर इतिहासाचे प्रश्न विचारणार आहेत.वाघोलीकर सर इंग्रजीचे शब्द विचारणार आहेत व वर्कबुक बघणार आहेत.टेंकाळे सर प्रयोग वही तपासणार आहेत.सदाफुले सरांनी हिंदी चा पाठ वाचायला सांगितला आहे.दहावीच्या मुलांची चर्चा ऐकून मी अवाक् झालो.दहावीला लई अभ्यास करावा लागतो हे चित्र डोळ्यासमोर येऊ लागले .मुले ऐकमेकांना हळूहळू बोलत होती.काही जण निबंध जास्त लिहिले का हे दाखवत होती.उन्हाळ्याच्या सुट्टीत झालेल्या वासंतिक वर्गातील गंमतीजमती मुले सांगु लागली.
तेवढ्यात दूसरी घंटा झाली.घंटीच्या लयबद्ध तालावर काही मुले नाचू लागली.थोड्या वेळाने सर्व वर्गाच्या आपोआप रांगा तयार.विद्यार्थी वयात असताना ऑर्डर द्यायचे काम माझ्याकडे होते.मी सावधान म्हणताचं जन गण मन या राष्ट्रगीताचे सूर संपुर्ण मैदानभर घुमायला लागले.मग एका सुरात प्रतिज्ञा झाली.आम्ही फक्त मराठी भाषेतचं दररोज प्रतिज्ञा म्हणत असु.यानंतर मधुकरराव जोशी गुरुजींनी 'खरा तो एकचि धर्म 'या प्रार्थना गीताने वातावरण प्रसन्न केले.‘कध्यास एक साधका अंतरात ठेव तू,जाण यत्न देव तू', या सामुदायिक गिताने मैदान दुमदुमुन गेले.सर्व मुले एका आवाजात दररोज गीत गात असत.सकाळचा परिपाठ संपला.उशीरा आलेल्या मुलांना शिक्षा झाली.मुले वर्गात गेली.पहिला तास,दूसरा तास,तिसरा तास संपला.मी माझ्या मिचमिच्या ( डीजीटल वॉच) घड्याळात पाहिलो.12:05 झालेले चला रे इंट्रोल ( इंटरव्हल) झाला.लांडगे मामांनी ब्रेकचा टोला दिला.वर्गावर्गातून मुले मैदानावर येत होती.मला तो 10 मिनिटाचा इंटरव्हल ( ब्रेक) खुपचं आवडायचा कारण या वेळात खुप काही करण्याचा मुले प्रयत्न करत.काही मुले मैदानावर खेळायला धावत तर काही मुले पाण्याच्या हौदाकडे पळत सुटत.सकाळी उपाशी आलेली मुले घरचा रस्ता पकडत.काही जण दूपारी शाळेत येत नसत.बालवयात आम्हाला पाण्याचा फिल्टर माहित नव्हता की वॉटर बॉटल .वॉटर बॉटल फक्त प्रवासात ठेवत असत.शाळेतील पाणी भरलेल्या टिपाकडे काही मुले धाव घेत.काही मुले खाऊ खाण्यासाठी खारेमुरे वाल्याकडे धाव घेत.काही मुलांना पांढरी बंबई मिठाऊ खुप आवडे.आम्ही त्या मिठाईला म्हातारीचे केस म्हणत असु.काही जण चिंचेच्या झाडावर चढुन चिंचा खात .काही जणांचा पिकलेले बदाम वर्गात पिशवीत ठेवुन लपुनछपुन विकण्याचा बिझनेस चाले.दूपारी 12:00 वाजता शाळेच्या मुख्य रस्त्यावरील प्रवेशद्वारावर एक खारेमुरेवाला नित्यनेमाने येई.आमच्या शाळेला कंपाऊंड वॉल नव्हते.शाळेत येण्यासाठी ब-याचं वाटा होत्या.खारेमुरेवाला शाळेच्या हद्दीत कधी येत नसे.त्याच्या अंगावर पांढरा शर्ट व पांढरीचं पँट. त्याने डोक्यावर टोपी घातल्याचे आठवत नाही.त्याने एक रुमाल गळ्यात बांधलेला असे.रुमाल हिरवा किंवा निळा असे.या रुमालात मळ दिसुन येत नाही असा एक नवीन शोध काही मुलांनी लावल्याचा आठवतो.त्याचा तो चार चाकी जुना गाडा होता.त्याला सायकलचे चाक बसवलेले होते.त्याने त्या लाकडी गाड्याला बसवलेल्या सायकलच्या टायरमध्ये कधीचं हवा भरल्याचे आठवत नाही.हवा नसल्यामुळे रिंगा व तारा वाकड्या झाल्या होत्या.पुढच्या दोन टायरांना वळवण्यासाठी त्याने एक पट्टीचे स्टेअरींग केलेले होते.पट्टी डावीकडे ढकलताचं त्याचा गाडा उजवीकडे वळत असे.अगदी आरामात खारेमुरे वाला येत असे.एका छोट्या मटक्याला तार बांधुन त्यात त्याने लाकडाचे तुकडे ठेवुन पेटवत असे.त्याच्या गाड्याजवळ गेलं की धूर डोळ्यात जात असे.मुलांना गरमागरम खारेमुरे देण्याचा तो सतत प्रयत्न करत असे.खारेमुरे देतांना त्यावरील टरफल तो काढत नसे.त्या छोट्या मटक्याला त्याने छिद्रे पाडली होती.त्यातुन धूर निघताना मला विडी फुंकणा-या माणसाची आठवण येई.शाळेवरुन जाणारे पांढरे ढग त्याच्या धुरामुळे काळे होत असावेत असं वाटे.त्याने आपल्या गाड्यावर लाकडी फळ्या अंथरल्या होत्या.तो दोन- तीन तास उन्हात, वा-यात थांबलेला दिसे. गि-हाईकाची तो चिंता करीत नसे.शाळेपासुन काही हाकेच्या अंतरावर त्याचे चार पत्र्याचे घर होते.घराच्या भिंती मातीने सारवलेल्या. घराच्या समोर गवताचे छप्पर होते.तेथे खुप थंडगार वाटत असे.काही काळानंतर त्यांचा अपघात झाला एक - दोन वर्षे तो दिसला नाही.कोणी म्हणे गळ्याला पोळलय त्यांच्या. काही जण म्हणाले गळ्याचे ऑपरेशन झाले.गळ्याच्या संपुर्ण भागावर शिवल्यासारखे दिसे.मुले त्यांना नंतर " वेल्डर" म्हणु लागली.कारण त्यांना खारेमुरे वाल्याचा गळा लोखंडी वेल्डींग केल्यासारखा वाटत असावा.
मोठी मुले त्याच्या गाड्यावर बसुन खारेमुरे खाण्याचा प्रयत्न करीत."आबे उतरा बे खाली,ए शाण्या उतरतुस का? मोडुन टाकताव का रे? पोट भरुन खाऊ द्या की आम्हाला.गरीबाला जगु द्या की ." असं तो काकुळतीला येऊन म्हणायचा. एका पांढ-या ट्रेमध्ये त्याने किलो दोन किलो खारेमुरे भरलेले असायचे.गाड्याच्या मधोमध तो ठेवत असे.काही मुले एखादा खारमुरा उचलुन टेस्ट बघण्याचा अफलातुन प्रयत्न करीत.त्याला तसे करणे आवडत नसे.त्याचा माल संपल्याचा कधी दिसला नाही.सोबत तो गाड्याखाली पिशवी भरुन स्टॉक ठेवत असे.तो कडक वाळु तापवुन त्यात खारेमुरे भाजायचा.एकही खारमुरा करपणार नाही याची काळजी घ्यायचा.मिठाचं प्रमाण पण तंतोतंत.एका विशिष्ट आकाराचे मेडीयम आकाराचे शेंगदाणे तो वापरायचा.खारेमुरे विकण्यासाठी त्याच्याकडे दोन छोटे मोज पात्र होते.एक अल्युमिनियम पासुन बनवलेला होता तर दूसरा प्लॅस्टिकचा .सतत वापर केल्यामुळे त्यांचा अर्धा भाग काळसर दिसायचा. त्याने बनवलेल्या खारेमु-यांना एक विशेष प्रकारची चव होती.ते खारे शेंगदाणे तोंडात पडताचं खाणारा अहाहा! किंवा वा! छान! !नक्कीचं म्हणत असणार.खमंग,चविष्ट,
अत्त्युत्तम भाजलेले,खारेमुरे खाण्यासाठी मुलांची झुंबड उडायची .पैसे नसणारी मुले खिशात हात घालुन पहात थांबत.मुलांची गर्दी संपताचं मुली पण उत्साहाने गाड्याभोवती थांबत.10 मिनिटं त्याच्या गाड्याभोवती भलतीचं गर्दी असे.दूपारी दिड पर्यंत तो तिथचं थांबत असे.तीन नंतर तो शाळेत कधीचं दिसत नसे.
फेब्रुवारी नंतर त्याला गॅरेगॅर वाल्याची साथ मिळे.तो गारेगार वाला निलंग्याहून सायकलवरुन येत असे.अजुनही तो भर उन्हाळ्यात येतो.तो डोक्याला एका विशिष्ट पद्धतीने रुमाल बांधत असे.डोक्यावर केस उघडे व दोन कान रुमालाने बंद.त्याला पाहुन खारेमुरेवाला नाक डोळे मुरडत असे.कारण त्याचं गि-हाईक त्याने पळवलेलं असे.कधी बोरं तर कधी जांबं विकणारे येत.परंतु खारेमुरे वाला नित्यनेमाने यायचा.त्याच्या डोक्यावर सावली पण कमी असे ती पण फारचं कमी कारण चिंचेसारख्या गर्द झाडाखाली तो थांबत नसे.त्याच्या डोक्यावर कमी सावली देणारे झाड आपले हात पसरुन उभं असे.आपल्या हातावरील घड्याळात तो वेळ बघत असे.मला तो काही तरी पार्टटाईम जॉब काम वगैरे करत असेल याचा भास होई.त्याचे ते चावीचे घड्याळ हातातील मनगटावर चमकत असे.कुल्फीवाला मात्र गावात फेरी मारुन कुल्फी विकत असे.मुलांच्या रंगलेल्या अति गर्द गुलाबी,लाल,जांभळ्या जिभेवरुन गारेगार खाल्लं की नाही हे समजत असे.वर्गात काही जणांनी गारेगार खाल्ल्याबद्दल मार खाल्ल्याचा आठवते.खारेमुरे वाल्याचा नियमितपणा,मोजकं बोलण्याची पद्धत,हळूचं खारेमुरे मोजण्याची पद्धत,माप भरल्यावर ट्रेमध्ये भरलेला माप सांडणार नाही याची त्याने घेतलेली काळजी.हळूचं दोन तीन खारेमुरे पुड्यात टाकण्याची रीत,त्याचे बोलके डोळे,एका डोळ्यात कालांतराने पांढरा ठिपका हळूहळू दिसू लागला,स्वाभिमानी वृत्ती,कष्ट करण्याची तयारी पाहुन मला खुप नवल वाटे.बोरं,जांभळं,कारं,जांबं,निवडुंगं,रानमेवा खाणा-या मुलांचा खारेमुरेवाला लाडका होता. मी शाळा शिकुन दयानंद महाविद्यालय लातूर येथे गेलो मला तीथं तसाचं खारेमुरेवाला भेटला.त्याचा वेश ही तसाचं.पण डोक्यावर पांढरी टोपी होती.त्याच्याही खारेमु-यात मला तीचं चव दिसली.लामजना पाटीवर बस आली की खारेमुरे म्हणणारा माणुस हमखास येणारचं.काळ बदलला खारेमुरे वाले पण बदलले.पण बालपणी खारेमुरे वाल्यांनी जिभेला एक विशिष्ट चव दिली ती आज खुप शोधुनही सापडत नाही.खुप खारेमुरे वारे भेटले पण तो शाळेसमोरील खारेमुरे वाल्यांने जगण्याची एक शिस्त दाखवली.
*बालपणाच्या आठवणी*
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा