गुरुवार, ८ एप्रिल, २०२१
बालपणीच्या आठवणी
*नागनाथ मास्तर*
*शब्दांकन*
*श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता.औसा*
"ओ मास्तर सूर नीट लावा की पेटीचा?"
विडी फुंकणा-या मास्तरकडे गंप्या वैतागुन म्हणाला. गावात सार्वजनिक ठिकाणी नाटक दाखवण्याची प्रथा होती.नाटक म्हटलं की गावक-यांचा उत्साह भरभरुन वाहे. नाटकाची तालीम ऐन रंगात आली होती. खांद्यावरील लाल गमचा सावरत मास्तर धुराचे गोल काढु लागले.आभाळातील पांढ-या ढगांचे या धुराशी काहीतरी कनेक्शन असावे असा विचार मी करु लागलो.एका गावात निदान शंभर तरी माणसं विड्या ओढतात. मग जगात किती? पांढरे ढग यामुळे विडीच्या धुरामुळे बनले असावेत असा मी अंदाज काढला.खिडकीतुन काही हौशी मंडळी नाटकाची तालीम डोळे भरुन पाहु लागली .काही मंडळी हातात स्क्रीप्ट घेऊन डायलॉग पाठ करु लागली.त्यांची ती पोपटपंची पाहून मला डॉ.वाघ यांचा पाळलेला पोपट आठवु लागला.
" आरं गंप्या,जरा बुद्धिला टॉनिक, म्या काही सराईत बिड्या फुंकु नाही हो ,गेली तीस वर्षं मी पेटी वाजवतोय. माझ्या विडीबद्दल कोणी ब्र काढलं नाही."
नाकातुन धूर काढत नागनाथ मास्तर म्हणाले.गावातील धार्मिक ग्रंथाचे पोथी वाचक नागनाथ मास्तर पंचक्रोशीत रामायण वाचक म्हणुन प्रसिद्ध होते. भजनातील गायक म्हणुन लोकप्रिय होते.
कठीण कठीण कठीण किती??? पुरुष ह्दय बाई...
हे तालमीत नवीनचं पद गाऊन त्यांनी पेटी चेक केली.सुरांची जुळवाजुळव केली. मास्तरांची बोटे पेटीवर सहज खेळु लागली, नाचू लागली .बोटांचा पदविन्यास पाहुन मी आश्चर्यचकित होऊन पाहु लागलो. मास्तरांनी डोळे मिटुन सुरेल स्वरांची लकेर घेत गंप्याकडे पाहिले मग म्हणाले ,
" गंप्या ,कालचं गाणं सुरु कर." तो नाटकातील गाणे मोठमोठ्याने आळवु लागला.मास्तरांनी सूर जुळवले.सिरसले गुरुजी तबल्याची साथ करत.तबलजींनी मान डोलावुन धान तिरकीट तान तिरकीट करत ताल धरला.तबल्याच्या साथीने सर्व कलाकारात उत्साहाचे भरते आले.मी सर्वांच्या चेह-यावरचे क्षणाक्षणाला बदलणारे भाव वाचु लागलो.
संगीताची प्रचंड आवड असलेले नागनाथ मास्तर म्हणजे एक अवलिया सुरांचे जादूगारचं होते. ते पेटी वाजवत.पेटी वाजवणारा पेटी मास्तर.म्हणुन गावातील बरेचं लोक त्यांना मास्तर म्हणत.डोक्यावर पांढरी टोपी,अंगात पांढरा सदरा वजा गुडघ्यापर्यंत लांब गुरु शर्ट,निळ घातलेले स्वच्छ धोतर, उजव्या खांद्यावर लोंबणारा गमजा असे .नागनाथ मास्तर पितळेच्या तांब्यात पेटलेला कोळसा टाकुन कपड्यांना प्रेस करत. त्यांच्या पेटीला तालाची साथ करणारे सिरसले गुरुजी बोडकं दिसत.धोतराच्या ऐवजी पांढरी पॅंट घालत.मला त्यांची हेअर स्टाईल हिंदी सिनेमातील नट व गायक किशोर कुमार,अशोक कुमार यांच्यासारखी वाटे.चेहराही तसा गोलकार दिसे.सिरसले गुरुजी आले की मला साक्षात बालगंधर्व आल्याचा भास होई.नागनाथ मास्तर पायात जुन्या वळणाच्या बांधीव वहाणा घालत.सिरसले गुरुजींना मात्र बुट आवडे.
नागनाथ मास्तरांच्या वहाणा कधीचं चोरीला जात नसत कारण त्यांच्या जुन्या वळणाच्या बांधीव वहाणा कोणाच्याही पायात येत नसत.खास ऑर्डर देऊन ते बनवुन घेत.त्या टिकाव्यात म्हणुन घाण्याचे तेल लावत.आपल्या पायातील वहाणा बाबत नागनाथ मास्तर बिनघोरी असत.त्या चोरीला जातील याची त्यांना कधीही थोडी सुद्धा चिंता वा फिकीर नसे.इतरांना पण चांगल्या नवीन वहाणा घालुन लग्न समारंभास न जाण्याचा सल्ला नागनाथ मास्तर आवर्जुन देत.नागनाथ मास्तरांना गावोगावी लोक पोथी वाचण्यासाठी बोलावत.त्यांचा सत्कार करत.मिळालेला सत्कार गमच्छ्यात बांधुन पाठीवर टाकुन मोहिम फत्ते केल्याच्या अविर्भावात नागनाथ मास्तर गावात अवतरीत होत.
एका गावात नागनाथ मास्तर साधु महाराजांचा वेष घेऊन गेले.गळ्यात माळा,हातात कमंडलु घेतले.सायकल गावाबाहेर एका झाडाखाली सोडली.नागनाथ मास्तरांनी त्या गावातील एका मंदिरात डोळे मिटुन समाधी लावली. गावात एक थोर संन्यासी महाराज आले आहेत ही बातमी वा-यासारखी पसरली.पंचारती घेऊन लोक येऊ लागले.सर्व लोक साधु महाराजांची स्तुती करु लागले.ते खुप ज्ञानी आहेत; आशीर्वाद देतात आपलं चांगलं होईल म्हणुन पाया पडु लागले. चरणावर लोटांगण घालू लागले. बघता - बघता लोकांची तोबा गर्दी जमु लागली.लोक चरणावर दक्षिणा ठेवु लागले. नागनाथ मास्तर डोळे मिटुन बसलेले पाहुन त्यांच्या चेह-याकडे गर्दीतील एक माणुस न्याहाळू लागला.त्या माणसाने हे तर नागनाथ मास्तर म्हणुन अचूक ओळखले.तो गर्दीतुन वाट काढत लगबगीने पुढं आला.
"काय हो मास्तर कसं काय दौरा? कवा आलात? म्हणुन त्याने मास्तरांना हटकले.
आपले डोळे किलकिले करुन मास्तरांनी त्याच्याकडे तिरछ्या नजरेने पाहिले. त्यांच्या पोटात कालवाकालव झाली.आपलं आता काही खरं नाही.आता आपले बिंग फुटणार हे समजताचं.मास्तर गडबडले.त्यांची बोलती बंद झाली.तत पप होऊ लागलं.
"शिव.शिव.शिव.देवाचे बोलावणे आले.मला आता या क्षणी जावेचं लागणार ",असं म्हणुन नागनाथ मास्तरांनी तिथुन धूम ठोकली.आमचं काय चुकलं हो? असं म्हणुन लोकं गयावया करु लागली.त्या माणसाला काहीबाही म्हणू लागली.काही गावकरी त्यांच्या मागं धावू लागले .गावकूसाबाहेर लावलेली सायकल घेऊन नागनाथ मास्तरांनी कसे- बसे आपलं गाव गाठले.
गावातील लग्नसमारंभात मास्तर आवर्जुन हजेरी लावत. तबकातील बिड्याचा गठ्ठा, पानसुपारी,सिगारेटची पाकीटं, चुन्याची डब्बी,पानं यावर यथेच्छ ताव मारीत. आठ दिवसांची सोय केलो असं ते आपल्या जीवलग मित्राला हसत- हसत सांगत.त्यांच्या हातात सदैव एक पेपर दिसे. मास्तरांनी आपल्या उभ्या आयुष्यात पेपर कधीही विकत घेतला नाही.आजचा पेपर उद्या शिळा होतो.लोक रद्दी समजुन टाकुन देतात.पेपर टाकुन देण्यापेक्षा पुन्हा वाचलेला कवाबी चांगलाचं असा त्यांचा वृत्तपत्रविषयक दैनिक सिद्धांत होता.पेपर विकत घेऊन वाचण्यात काही मजा नाही असा त्यांचा पक्का निर्धार होता. ज्यांच्या घरी पेपर नित्यनियमाने येई त्यांचे घर मास्तर सकाळी लवकर गाठत.जुने पेपर हक्काने मागुन घेत.कोणी त्यांना नाही म्हणत .मिळवलेला पेपर ते बगलत मारत.हवालदार जसा बगलत हंटर ठेवतो या रुबाबात पेपर घेऊन गावभर मिरवत.दूपार झाली की मास्तर म्हैस घेऊन रानात जात.सोबत पेपर हमखास असे.जगात काय घडून गेले? या शिळ्या बातम्या नागनाथ मास्तर वाचत व रात्री गावभर सांगत.पेपरमधील ओळ न ओळ, शब्द न शब्द वाचुन काढत.गोठ्यात पेपर कोंबुन ठेवत.सा-या गोठ्यात जिकडे पहावे तिकडे त्यांनी पेपर कोंबुन ठेवलेले असत. त्यांची जेवण करण्याची पारंपारिक पद्धत होती.नागनाथ मास्तर ताट जमीनीवर ठेऊन जेवण करत नसत.पाट टाकुन पाटावर बसत.समोर अडंगी ठेवत अडंगीवर मोठे ताट ठेवुन जेवण करत. ताक,कढी, वरण,भात, भाकरी ,खीर,लोणचे हे नागनाथ मास्तरांचे आवडते जेवण.कढीवर जोरदार फुरका मारत.जमीनीवर ताट ठेवुन जेवणे हलकं आहे असं सांगत.पुर्वजांचा दाखला देत.
नागनाथ मास्तरांचा एक जिगरी दोस्त म्हणजे जवळपास त्यांच्याच वयाचा गावातील शिवा दाजी.गावात सर्वजण त्यांना दाजी म्हणत.लक्ष्मण शक्तीची पोथी वाचावी तर नागनाथ मास्तरांनी व अर्थ सांगावा तर शिवा दाजी यांनी.शाळेत मी कधीही गेलो नाही तरीही वाचन करु शकतो हे शिवा दाजी गर्वाने सांगत.रामायण - महाभारत- शिवलिलामृत, भागवत हे ग्रंथ शिवा- दाजींना तोंडपाठ होते.नागनाथ मास्तर भजनातही हजेरी लावत.गावातील मोठ्या घरी शिवा दाजी पोथीचा अर्थ सांगत. अखंड हरिनाम सप्त्यात नागनाथ मास्तर पेटी वाजवण्याची सेवा देत. हरिपाठालाही हजर रहात.तर शिवा दाजी विणा वाजवत किंवा टाळकरी होत.
नागनाथ मास्तर कोणाला फोन लावायचा असेल तर स्वच्छ अंघोळ करुन टेलीफोन असणा-या सुशिक्षीत माणसांच्या घरी सकाळी- सकाळी हजेरी लावत .अहो माझा एवढा एक फोन लावा हक्काने म्हणत.टेलिफोनमधले फ्री कॉल सरकारने माझ्यासाठीचं ठेवलेत असं सांगत. खिशातुन डायरी काढुन फोन नंबर सांगत.मी कधीही पेन विकत घेतलेला नाही हे ही मोठ्या अभिमानाने सांगत व हळुचं जरा पेन बघु अस म्हणत.
एके दिवशी मी स्टेशनरी दूकानात गेलो होतो.तेथे नागनाथ मास्तर दिसले.त्यांनी दूकानदाराला प्रश्न केला, "ओ दुकानदार झंडु बाम आहे का? आज डोकं दुखत आहे " दूकानदार म्हणाला," नाही.माल संपलाय."
"दुसरं काही आहे का? " नागनाथ मास्तरांनी प्रश्न केला.
"व्हिक्स" चालतयं का? दुकानदार बोलला." " बघु कसलाय? असा प्रश्न मास्तरांनी केला.दूकानदाराने व्हिक्सची डबी मास्तरांच्या हातात दिली .तीचे टोपण उघडुन मास्तराने वास घेतला.डाव्या हातात डबी धरली.उजव्या हाताच्या पहिल्या बोटाने व्हिक्सच्या डबीचा मास्तरांनी तळ गाठला व व्हिक्स डोक्यावर चोळु लागले.
"यात काही दम नाही व वास तर जरा सुद्धा नाही " मास्तर म्हणाले.दुकानदाराला भलताचं राग आला.मास्तरांनी व्हिक्सचे सील तोडलेले पाहुन त्याच्या तळपायाची आग मस्तकाला पोहंचली. तो तावातावाने म्हणाला, " बघु ती डबी,उतरा खाली".नागनाथ मास्तर गडबडीने उतरले व डोकं चोळीत तिथून ते निघून गेले.
"घेणं ना देणं, वाजवा रे, वाजवा" असं तो दुकानदार म्हणु लागला."सकाळी - सकाळी भारी गि-हाईक भेटलं.आताचं उदबत्ती लावलाव तर..." मला हसू फुटलं.मी म्हणालो, " असा कसा माल संपला?" तो म्हणाला," माल आहे पण? जाऊ द्या तुम्हाला समजायचं नाही मास्तर. "
मला मास्तर म्हणताचं मी दूकानदाराकडे तोंड आ वासुन पाहु लागलो.नागनाथ मास्तरांच्या धुरातील स्वर मला दिसू लागले.
*बालपणीच्या आठवणी*
®©
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा