शनिवार, १० एप्रिल, २०२१

बालपणीच्या आठवणी

*रात्र अभ्यासिका* *शब्दांकन* *श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता. औसा* लांडगे मामांनी घड्याळात न पाहताचं टंग टंग टंग टंग घंटा वाजवली.बरोबर साडेचार वाजले होते.शाळा सुटली. घंटेच्या लयबद्द आवाजावर पोरं डान्स करत घराकडे पळत सुटली. लांडगे मामाला टोल टाकताना घड्याळाची कधीही गरज भासत नसे. शाळेत सर्व गुरुजींच्या हातात घड्याळ हायतं मी कशाला घेऊ ? हा लक्ष्मण लांडगे मामांचा " घड्याळ का विकत घेत नाहीत." या सवालावर जवाब असायचा.शाळा सुटली पाटी फुटली चला पटकन घरी.आरडाओरडा करत मुले घराकडे निघाली. "माझा तर लई अभ्यास हाय बाबा." पोत्याची पिशवी सावरत गण्याने घराकडे धूम ठोकली. त्याच्या पिशवीचा एक बंद तुटला होता.तुटलेला बंद तोंडात पकडुन गण्या घराकडे जाऊ लागला.सर्कशीतला जोकरासारखे तो हातवारे करु लागला.मी त्या वेळी सातवीत होतो.चौथी व सातवीला बोर्डाची परीक्षा होती.शाळेतील बोर्डाचा ( फलक) व बोर्ड परीक्षेचा काहीतरी संबंध असलाचं पाहिजे याचा मी विचार करीत असे.खाताच्या पोत्याची किंवा महाबीज बियाची पिशवी दफ्तराची पिशवी म्हणुन बरेचं जण वापरत.जीन्सची पँट कोणीचं घालत नसे.टी शर्ट तर कुणालाचं माहित नव्हता. रेडीमेड दफ्तराचा तर पत्ताचं नव्हता.प्रत्येक मुलाचं दफ्तर म्हणजे जादूगारासारख्या पिशवीसारखा असे.अनेक वस्तू त्यात लपवुन ठेवलेल्या असत.प्रत्येकाच्या दफ्तरात पकान्या गोट्या तर हमखास सापडत. जून उजाडला की टेलरकडे मुलांची दफ्तराची पिशवी शिवण्याकरीता गर्दी होई. त्याचंबरोबर शालेय गणवेश ही शिवुन घेतला जात असे.खाकीरंगाची हाफ चड्डी व तसाच हाफ शर्ट सातवी आठवी पर्यंत मुलं घालत असत.खो-खो,कबड्डी,सुरपारंब्या,लगोरचे,कोया,गोट्या,भोवरे,चिर- घोडी असे अनेक खेळ मुले मैदानावर खेळत असत. रस्त्याने उड्या मारत जाणारा गण्या आभाळात बगळ्यांची माळ पाहुन हरखुन गेला.संत्याने " बगळे - बगळे चुन्ना चघळे" हे गाणं गाऊन आपल्या बोटांवरील नखात बगळ्यांचे पांढरे ठिपके दाखवले.परीसरातील प्राणी,झाडे,ओढे,शेती याच्याशी मुले घट्टपणे बांधली गेली होती.शाळा हे मुलांचे सर्वात आवडते ठिकाण होते.रविवारी सुद्धा दफ्तर घेऊन झाडांच्या गर्दीत बसुन मुले अभ्यास करत असत. दहावी बोर्ड परीक्षेला त्या काळात आजच्यापेक्षा सुद्धा खुप महत्त्व होते.दररोज रात्री आठ वाजता दहावीची मुले रात्र अभ्यासिकेला शाळेत जात.शाळेत एका खोलीत लाईटची व्यवस्था केली होती.शाळेच्या भिंतीत तयार केलेल्या एका अलमारीत ती मुले अंथरुण -पांघरुन ठेवत असत.देवु,महेबुब,आरेफ, राजु,ओम, दहा बारा जण जेवण करुन शाळेकडे गडबडीने निघाली. वाटेत त्यांना सुधाकर भेटला दफ्तर घेऊन सर्वजण लगबगीने चालु लागले. जुन्या पिढीतली मुले शाळेत मिळुन अभ्यास करत.मुख्याध्यापक सर रात्र अभ्यासिका चालवत असत.काही शिक्षकांची दररोजची ड्युटी त्यांनी या कामी लावली होती.मुले कधी वेळेवर कधी उशीरा पोहचत.जेवण अधिक झाल्यामुळे काही मुले अभ्यास करताना डुलकी काढत व पेंगत असत. एकदा एक तानु नावाचा मुलगा रात्री शाळेत अभ्यासाला उशीरा गेला.त्याला काही अडचणीमुळे उशीर झाला होता.अभ्यासीकेत खुप उशीरा येणा-या मुलाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले जात असे.त्याचे मित्र स्वागताच्या तयारीत होते.एकाच्या हातात रया गेलेला फडा होता ,एकाच्या हातात उशी व एकजण हातात खपट घेऊन उभा होता.एक जण लाईटच्या बटणा जवळ थांबला होता.काही मुलांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती.सर्वजण काहीतरी मोहीम फत्ते होईल का? याचा अंदाज करत होते.मध्येचं सर आले तर सर्वांनाचं सरांकडुन चांगला मार पडणार होता.मी खिडकीजवळ उभा राहुन अभ्यास कसा करतात हे पहात होतो.तो मुलगा आला.काही कळण्याच्या आत एकाने लाईट बंद केली.सर्वजण त्या मुलावर मारण्यासाठी तुटून पडले.सापडल त्या वस्तुने त्याचा समाचार घेऊ लागले.परंतु आरडा ओरडा अजिबात नव्हता.एका मिनिटाने परत लाईट सुरु झाली.सर्वजण आपापल्या जागेवर चिडीचुप बसले.थोड्या वेळाने सर्वजण खो- खो हसु लागले.हा नवीन अभ्यास पाहुन मी अचंबित झालो.अभ्यासिकेला उशीरा येणा-यांचा मुले वेगवेगळ्या पद्धतीने समाचार घेत असत.हे प्रकार वारंवार घडत.गंमत करुन हसणे मुलांना आवडायचे.टिंगल टवाळी बरोबरचं ही मुले अभ्यासातही हुशार होती.भल्या पहाटे उठुन व्यायाम करत असत.हिंदी व मराठी विषयातील 100 निबंध या मुलांनी लिहुन काढले होते.ब-याचं मुलांचे अक्षरही अप्रतिम,वळणदार होते.शाळेतील विविध स्पर्धात ही मुले भाग घेत असत.भाषणही अप्रतिम करत असत.त्यांचे अनुकरण करुन मी भाषण करायला शिकलो. रात्री बारा एक पर्यंत ही मुले अभ्यास करीत असत. शाळेतील दोन लाकडी बाकं एकत्र करुन मुले त्यावर झोपत असत.एके दिवशी त्याचं मुलाला बाकड्यावर झोपी गेल्याचे काही मुलांनी पाहिले. त्याचे हातपाय टारगट मुलांनी बाकड्याला सुतळीने बांधले व भूत आलय-या बाबो.असा त्यांनी गोंधळ केला.तो मुलगा खुपचं घाबरला होता.परंतु आपले मित्रांनीचं असं केलय हे लक्षात आल्यावर हसु लागला.तिघांच्या असभ्य वर्तनाबद्दल मुख्याध्यापक सरांनी त्यांच्या पेट्या, सतरंज्या डोक्यावर देऊन मैदानाला एक फेरी मारुन घरी हाकलुन देण्याची कारवाई केली होती.बाकीच्या मुलांचे धाबे दणाणुन गेले. मगर सर गावात आले आणि सर्वजण व्यायामाला लागलो.मी पहाटे लवकर उठुन शाळेत व्यायाम करायला जात असे. ब-याच मुलांना हे जमेनासे झाले.कारण व्यायाम ही संकल्पना आमच्या दृष्टीने नवीन होती.कोणीतरी शाळेत भूत असल्याचे सांगितले.मोठ्या चिंचेजवळ भूत रात्री फिरते असे कानावर आले.कोणीतरी लांडगे मामाचे भूत असल्याचे सांगितले.मग माझ्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.मी पहाटे चार वाजता निघालो.पहातो तर भल्या पहाटे अंधारात पांढरे कपडे घातलेली व्यक्ती फिरत होती.ती बरोबर चिंचेच्या झाडाजवळ होती.माझी घाबरगुंडी उडाली.तरी सुद्धा मी जवळ गेलो.मी म्हटलो कोण आहे? ती व्यक्ती काहीच बोलली नाही.मी आणखी जवळ गेलो.मी म्हणालो,"कोण लांडगे मामा का?" ती व्यक्ती म्हणाली ,"हो मीच!"मी म्हणालो ,"इथं लांडगे मामाचं भूत फिरतय मला बघायचं आहे." त्यावर लांडगे मामा म्हणाले," बघा हो ते दहावीचे पोरं मला भूत म्हणलाल्यात ,गावात काय बी सांगत फिरत्यात."मला मात्र हसु आवरलं नाही. रात्र अभ्यासिकेला जाणारी मुले पहाटे उठुन निलगिरीच्या 150 ते 200 झाडांना पाणी घालत.मैदानाची साफसफाई करत.ही मुले पुढे खुप मोठी झाली.मला अजुनही त्यांचे निर्मळ,निरागस,हसरे,खेळकर, विनोदी चेहरे आठवतात. *बालपणाच्या आठवणी*

1 टिप्पणी: