माय मराठी
शनिवार, २७ एप्रिल, २०२४
जिल्हा परिषद प्रशाला लामजना मराठवाड्यातील एक नावाजलेली शाळा. अनेक गुणवंत, ज्ञानी, कर्मयोगी गुरुजी या प्रशालेला लाभले.त्यांच्या मार्गदर्शनामुळे उच्च पदस्थ ते चांगले नागरिक घडले.30 सप्टेंबर 1993 भूकंपाच्या साली मी नववी वर्गात शिकत होतो. त्या काळातचं काही वर्षे अगोदर परिट सरांचे (मडोळे गुरुजींचं) शाळेत आगमन झालं. सर्व जण त्यांना प्रेमाने परिट सर म्हणत असत. वाघोलीकर सर प्रेमाने त्यांना 'बाबुराव' या नावाने हाक मारत असत. पांढरा शुभ्र नेहरु शर्ट, पांढरी पॅंट व डोक्यावर गांधी टोपी, चेहरा सदैव प्रसन्न व हसरा. परिट सर मला सानेगुरुजींसारखे दिसत. जिल्हा परिषद प्रशाला लामजना येथे सकाळी परिपाठ सुरु झाला की, प्रार्थनेचे सूर मैदानात घुमत असत.प्रार्थनेची ऑर्डर दिली जायची परिट सर खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे ही साने गुरुजींची प्रार्थना चढ्या आवाजात तालासुरात गात असत. त्यांच्या सुरेल आवाजाने वातावरण सारं बदलुन जात असे. सर मुलांना नियमित पसायदान म्हणायला सांगत असत.भींतीवर संपूर्ण पसायदान त्यांनी पेंटरकडुन लेखन करुन घेतलं होतं. वर्गभरल्याबरोबर दररोज मुलांना ते पसायदान वाचायला सांगत. नित्य परवचा. सरांचा आवाज अतिशय गोड तसाचं मोठा व स्पष्ट सर्व शाळेत घुमत असे. गुडसुरचे मधुकर दत्तात्रय जोशी गुरुजी शाळेत आले. जोशी सर, असावे घरकुल आपुले छान हे गीत गात असत.त्यांचाही आवाज अत्यंत मधुर . खरोश्याचे स्वामी सर कुसुमाग्रजांची कविता व शारदास्तवन गात असत.आधुनिक काळात शाळाशाळात ब्लुटुथ कनेक्टेड डिव्हाईस आले गायन दुर्मीळ झाले असे म्हणावे लागेल. स्वामी सर पेटी वाजवत. पेटीचे सूर वातावरणात दरवळत असत.वातावरण एकदम बदलुन जात असे. एकदा प्रसिद्ध लेखक यदुनाथ थत्ते लामजना प्रशालेत आले होते. शाळा सुटताना दररोज , ध्यास एक साधका, अंतरात ठेव तू जाण यत्न देव तू हे सामूहिक गीत नेहमी गाईले जायचे.सांगवीचे मुळजे सर क्रीडा तासिकेनंतर गीतगायनासाठी मुलांना रांगेत बसवत. टेंकाळे सर विज्ञानाचे नियमित प्रयोग दाखवत तर वडवळे सर सकाळपासुन मुलांना गणिताचे मार्गदर्शन करत असत. बिडवे सर मुलांना शिस्त शिकवत असत. परिट सर प्राथमिकच्या 1 ते 4 वर्गातील मुलांना नियमितपणे शिकवत. ते मुलांचे नियमित प्रकट वाचन घेत असत.वर्गात खेळ घेत असत.गाणे तालावर गात असताना आनंदाने मुलांना खांद्यावर घेऊन नाचत असत. 30 सप्टेंबर 1993 साली आलेल्या भूकंपाने होत्याचे नव्हते झाले.परिट सरांनी लोकांना भूकंपातून सावरण्यासाठी मदत केली. सर्वांचे मनोबल वाढवले. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो या गीतातून ते मुलांना देशभक्तीची प्रेरणा देत असत. परिट सरांचे गाव म्हणजे लामजना गावापासुन 10 कि.मी. अंतरावर असणारे किल्लारी गाव. व्यापा-यांचे अत्यंत सधन व श्रीमंत गाव. व्यापार व शेती भरभराटीला आलेली. किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्यामुळे भरभराटीला आलेले गाव. किल्लारी गावातून परिट सर बसने नियमितपणे शाळेत येत असत. त्यांना आजारी पडलेले कधीही पाहिलेलो नाही. सर नियमितपणे योगा करत असत. सेवानिवृत्तीनंतर त्यांचा उत्साह थोडासुद्धा मावळलेला नाही. ते सेवानिवृत्त झाल्यासारखे कधीचं वाटले नाहीत.ते लोकशिक्षक होते. परिट सर नियमितपणे शेताकडे जात असत.त्यांचा एक मुलगा श्री. निलमकुमार सुद्धा शिक्षक आहेत. सर अत्यंत मोकळ्या मनाचे, प्रामाणिक सेवावृत्ती असणारे गुरुजी होते. सरांची भेट झाली तर अत्यंत प्रसन्न मनाने हस-या चेह-याने बोलत असत. समोरच्या व्यक्तीला मान देत असत. कसं काय बरं चाललय का? सर्वांची आस्थेने चौकशी करत असत. अबोल माणसाला एका क्षणात बोलकं करण्याची सरांमध्ये क्षमता होती. परिट सरांचे अनेक विद्यार्थी जिल्हा परिषदेत शिक्षक पदावर अत्युत्कृष्ट कार्य करीत आहेत. सरांचे जीवन म्हणजे चालते बोलते एक विद्यापीठ विचारपीठचं म्हणा ना! संस्कारांचा व अमुल्य अशा विचारांचा एक महान ठेवा म्हणजे परिट सर. निराश झालेल्या माणसाला सकारात्मक विचार करायला सरांनी शिकवलं.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वत्व व सत्व कसे टिकवावे याचे पाठ सरांनी दिले. सौजन्यशिलता, मृदूपणा,विवेक,वैज्ञानिक दृष्टीकोन यांनी परिपुर्ण असलेले परिट सरांचे भारतीय संस्कृतीवर अत्यंत प्रेम होते. मुलांना मारहाण न करता सर प्रेमाने समजावुन सांगत. प्रसंगी पाठीत धपाटे घालत परंतु त्यांची ही कृती त्यात ही प्रेम दडलेले असे. मुले ही देवाघरची फुले आहेत.मुलांचे बाल मन शब्दाने अथवा कृतीने दुखावणार नाही याची सर काळजी घेत असत. शेडोळचे सुतार गुरुजी परीट सरांचे नेहमी नाव काढत असत. किल्लारीचे जिडगे सर पाचवी ते सातवीच्या वर्गाला विज्ञान विषय शिकवत असत. शाळकरी मुलांना परिट सरांनी फूलांप्रमाणे जपले. हुशार मुलांना सखोल मार्गदर्शन केले त्याचबरोबर कमजोर मुलांचे उपचारात्मक अध्ययन सरांनी पुर्ण केले. सरांनी मुलांना स्वंय-अध्ययनाची सवय लावली.त्यांना विद्यार्थ्यांविषयी प्रचंड माया व खुप जिव्हाळा वाटत असे.मुलांसोबत मूल होऊन सर रममाण होत असत. महापुरुषांच्या रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगत. कदम सर, स्वामी सर, आळंगे मॅडम, जगताप सर, नंदर्गे सर, शेख सर, वाघोलीकर मॅडम व सर ,सदाफुले सर व मॅडम, मोरखंडे सर, बिडवे सर, अंबुरे सर, सोनकांबळे सर,गाढे सर, बोधले सर, जवळपास 40 शिक्षकांची टीम म्हणजे ज्ञानियांची मांदियाळी. परिट सर साक्षात सानेगुरुजींचा वारसा घेऊन पुढे निघालेले शिक्षणपंढरीतले ज्येष्ठ वारकरी.सरांनी योग साधनेने आजारावर पण मात केली होती. सरांच्या अचानक निघुन जाण्याने एक मोठी विचार पोकळी निर्माण झालेली आहे. सरांच्या आठवणीने कित्येकांच्या डोळ्यांत अश्रु तरळले आहेत. सरांना शांती मिळो म्हणुन परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आज ही लामजना गावात परिट सरांचे ग्रामस्थ नाव घेतात.आठवणी काढतात. या सर्व गुरुजनांचे कोटी कोटी उपकार आहेत.आज लामजना गावातील कित्येक नागरिकांना सरकारी नौकरीवर जाता आले.खाजगी क्षेत्रातही लोकांनी नाव लौकिक मिळवलेला आहे. गुरुंनी दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवु हा पुढे वारसा.🌷🙏
शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४
*मार्गशीर्ष अमावस्या*
*( वेळा अमावस्या)*
आज वेळाअमावस्या हा सण होता. मराठवाडा व कर्नाटकच्या काही भागात हा सण मोठ्या आनंदानं साजरा केला गेला.आजची अमावस्या दूपारी 12:22 नंतर असल्यामुळे यावर्षी पुजा करण्यास बराचं उशीर झाला.तरीही मोठ्या आनंदाने नटुनथटून लोक घरुन निघाले होते.शहरात राहणा-या लोकांनी मिळेल त्या वाहनाने गावाकडे धाव घेतली.तर शहरातील लोकांनी कोरोनामुळे बागेत व घरीचं वनभोजन करणे पसंद केले.सकाळी लवकर उठुन सायकलीवर गेलेल्या घरातील माणसांनी कोप तयार केली.कडब्याच्या पेंड्या लावुन झोपडी तयार केली. पाच पांडव, द्रौपदी, कर्ण या देवांची प्रतिष्ठापना केली.दगडांना चुना लावुन देवाची परंपरेप्रमाणे प्रतिष्ठापना केली.परंपरेप्रमाणे ठरलेली जागा किंवा आंबा,आपटा,बोरं,या झाडाखाली जागा निवडली गेली.झाड नसेल तर उन्हातचं देव मांडले गेले.दूपारी बैलगाडीत बसुन येळवस मोठ्या थाटात शेतात पोहंचली.काही लोकांनी वाहनात बसुन हजेरी लावली.वेळ अमावस्या सणानिमित्त रात्रभर जागुन अनेक पदार्थ तयार केले जातात.फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेनुला लाजवतील असे पदार्थ याचं दिवशी फक्त तयार होतात.पांडवांची रितसर पुजा मांडुन शिवार आवाजांनी घुमु लागले.हर हर महादेव,हर भगत राजो हार बोला.व्हलगे व्हलगे सालन पलगे,या पारंपारिक घोषणांनी पांडवा भोवताली पाणी शिंपडुन देवाला हाका मारण्यात आल्या.परिसरात असलेल्या सर्व देवांना मारुती,म्हसोबा,खंडेराया,
महादेव नैवद्य दाखवण्यात आला.तोबातोबा करुन माफी मागण्यात आली.मग शेत शेजारी,घराचे शेजारी यांना बोलावुन भोजनाला सुरुवात झाली.आजच्या दिवशी बाजरी व ज्वारीचे उंडे, सर्व भाज्या मिसळुन तयार केलेली आंबट भजी,ज्वारी सडुन तयार केलेला खिचडा ( आंबट भात) साधा भात,वाग्याचं भरीत,ताकात पीठ शिजवुन तयार केलेलं अंबील( फोडणी दिलेलं आंबट ताक) ,शेंगदाण्याच्या पोळ्या,धपाटे,तांदळाची किंवा गव्हाची खीर,बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकरी,वेगवेगळ्या चटण्या,लोणचं,शेंगदाणा व तीळाचे लाडू असे कित्येक मेनु जेवणात होते.सर्वांनी हसत खेळत भोजनाचा आनंद घेतला.आजचे भोजन पचायला हलके व जीवनसत्वयुक्त होते.अंबील पिल्यानंतर काही जणांच्या डोळ्यात झोप दाटून आली.जेवणाच्या मेजवानीनंतर मग शिवार भ्रमंतीला सुरुवात झाली.शेतातील डहाळे,वाटाण्याच्या शेंगा,तुरीच्या शेंगा,बोरं याचा आस्वाद घेण्याबरोबर निसर्गाचे निरीक्षण करण्यात बाल गोपाळांचा वेळ गेला.मग त्यात विविध खेळांची भर पडली.कोणी कॅरम,बुद्धीबळ आणलेला तर कोणी लपाछपीचा खेळ सुरु केला.कोणी मोकळ्या रानात क्रिकेटचा डाव मांडला.काही जणांनी हिरवं झाड पाहुन दूपारच्या गाढ झोपेचा आनंद घेतला.मुलांच्या गोंधळामुळे कांही जणांची झोपमोड झाली. मोहोळाच्या शोधात शिवारभर फिरुन मध खाणा-यांचा रुबाब पाहण्यासारखा होता.
दूपारनंतर भोजनाचा पुनश्च आस्वाद घेता - घेता दिवेलागणीची वेळ झाली.असचं शिवार पुन्हा पिकु दे म्हणुन देवाची पुन्हा प्रार्थना करण्यात आली.बोळीत दूध व शेवाया घालून दूध ऊतू घालून कोणत्या भागात पीक अधिक पिकेल याचा अंदाज बांधण्यात आला.पांडवासमोर दिवे पाजळण्यात आले.ईडा पिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे अशी देवाला मनोमन प्रार्थना करुन येळवस मोठ्या आनंदाने घरी परतली.काही भागात रात्री हेंडगा पेटवुन शिवारभर फिरण्याची प्रथा आहे.
आपली संस्कृती आपली परंपरा थोर तर आहेचं पण जगावेगळी.धन्य-धन्य आपले पुर्वज व त्यांनी निर्माण केलेली संस्कृती
आपला
श्याम गिरी
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*माझ्या बालपणाची रंगपंचमी*
*शब्दांकन :- श्यामसुरेश गुमानगिर गिरी,लामजना ता.औसा*
मला लामजना गावातील बालपणाची रंगपंचमी खुप आठवते.रंगपंचमीच्या आदल्या दिवशी स्टेशनरी दुकानात मी जात असे.कोणकोणते रंग आलेले आहेत त्याची चौकशी करत असे.रंगांची निवड करताना या रंगांमुळे कोणाला त्रास तर होणार नाही ना? हे आग्रहाने विचारत असे.चमकीचे पॉलीश पण आलेले आहे हे दुकानदाराने सांगताचं काळजी वाटत असे.कोणी आपल्याला हे पांढरे पॉलीश लावले व डोळ्यात गेले तर काय वाईट होईल? याची चिंता वाटत असे.
भल्या सकाळी दुस-या दिवशी रंगपंचमीला मोठ्या उत्साहाने सुरुवात होई.जुने शर्ट व पँट, टी- शर्ट गाठोड्यातुन काढुन अंगावर घालुन मी सकाळी लवकरचं घराबाहेर पडत असे. 7 ते 10 वेळात लहान मुले रंगपंचमी खेळुन दमुन जात.रांजणातील थंड पाण्याने व साबणाने स्वच्छ अंघोळ करत.नंतर त्यांच्या चेह-यावर गुलाबी,हिरव्या,निळसर , पिवळ्या रंगांची छटा दिसे.मला रंगांचे हे कवडसे पहायला मौज वाटे.सकाळी दहाच्या नंतर मग रंगपंचमीला जोरदार बहर येई तरुण मुले हातात रंग कालवलेले बकेट व मग घेऊन गावातुन फिरुन सापडेल त्याच्या अंगावर रंग टाकत.त्यांना पाहुन रामजी की वानरसेना निकली असं वाटे.गर्द गुलाबी किंवा हिरव्या रंगांने रंगलेला खरा चेहरा कोणता हे ओळखणे खुपचं मुश्किल होत असे.प्रत्येक चेह-यावरचे रंगकाम पाहुन मला खुप हसु येई.एखादा शुभ्र वस्रात घराबाहेर पडलेला माणुस थोड्या वेळाने एक तर त्याची टोपी रंगलेली दिसे किंवा पांढ-या शुभ्र ढगावर एखाद्या रंगांची लकेर उमटावी तसा हा माणुस मला ढगोबा भासे.त्याच्या शर्टाची बाही किंवा समोरील भाग ताज्या गुलाबी फुलांच्या रंगासारखा गुलाबी,पिवळसर,दिसे. चमकणा-या पॉलीशने चेहरा व डोक्याचे केस माखलेला माणुस मला सर्कशीतल्या जादूगारासारखा वाटे व तो आपल्या करामती दाखवुन सर्वांना हसवत असे.युवकांप्रमाणे युवतीनीं सुद्धा कमी प्रमाणात रंगपंचमी खेळलेली आहे हे दुस-या दिवशी समजत असे. घरा-घरात रंगपंचमी रंगलेली दिसे.युवकांची रंगपंचमी संपताचं दूपारी तीन नंतर वाजत गाजत गावकरी रंगपंचमीची गावातून फेरी काढत.शाळेतले सर्वांचे लाडके मुख्याध्यापक व बैठकीतले काही खास शिक्षक आपल्या चेल्यांना सोबत घेऊन स्वारी गावातुन निघत असे.घरात लपुन बसलेल्या प्रतिष्ठित व इतर गुरुजींच्या घरी ही मंडळी पोहचत असत.रंगपंचमी नको म्हणुन व रंग कोणीतरी टाकेल? म्हणुन गुरुजी घरात बसत.रंगांपासुन घरात लपुन बसलेल्या गुरुजींना घराबाहेर बोलावुन त्यांना रंगांची अंघोळ घातल्यावरचं या टिमचे समाधान होत असे.गुरुजी फुल्ल बाहयाच्या बनियनवर घराबाहेर पडताचं त्यांच्यावर रंगांची प्रचंड उधळण होई.लुंगीने चेहरा पुसताचं परत रंग लावला जाई.कारवाँ बढ़ता रहे या म्हणीप्रमाणे त्यांना पुढील मोहिमेवर सामील करुन घेतलं जाई.रंग लावण्याचा एक अलौकिक आनंद सर्वांच्या चेह-यावर विजयोत्सवासारखा दिसे.यात काही झिंगणारी माणसे पण सामील होत.हलगी वाजवणारा जोरात हलगी वाजवुन सर्वांना तालावर नाचायला मजबुर करत असे.काही चिल्लर पैसे मिळाल्यावर त्याचा आनंद द्विगुणीत होत असे.रंगपंचमीची ही दूपार फेरी गावभर फिरुन प्रतिष्ठित व्यक्तींना रंग लावत असे.मोटार सायकल वरुन जाणारा कर्मचारी किंवा नागरिक यांच्या तावडीतुन कधीही सुटला नाही.दूपारी येणारी बस व त्याचा कर्मचारी यांनाही रंग लावण्यात येई.ते ऑन ड्युटीवर आहेत म्हणुन काही जण विरोध करत.गावातील माणसाच्या खिशातली डायरी,पैसे याचा कसलाही विचार न करता बिनधास्त रंग टाकण्यात त्यांना मजा वाटे.किराणा दुकानदार, व्यापारी यांना दुकानाच्या बाहेर बोलावुन त्यांच्या अंगावर रंग टाकण्यात येई.पराक्रमी व विजयी मुद्रेने टीम पुढे सरकत असे.रंगपंचमी दिवशी कुठेही तक्रार,भांडण झाल्याचे आठवत नाही." पैसे घ्या, पण रंग टाकु नका." म्हणणा-यांच्या अंगावर मुद्दाम रंग टाकला जाई.ते ही पैसे घेऊन हे वेगळं सांगण्याची गरज नाही.गावभर रंगपंचमीने मने व शरीर दोन्ही रंगुन जात.सर्वजण आनंदात व उल्हासीत दिसत.रस्त्यात सापडणारे कुत्रे,वासरं,गाढवं यांच्याही अंगावर रंग टाकत असतं.नंतर ही सर्व मंडळी स्व- घरी पोहचुन रंगपंचमी उतरवत असतं.रॉकेलचा, कपड्याचा साबण वापरुन रंग उतरवण्याचा कार्यक्रम दोन तीन तास चाले अर्थात रांजणातल्या किंवा हौदातल्या थंड पाण्यानेचं सर्व पार पाडलं जाई .रात्री आठ नऊ वाजता हॉटेलात,मंदिरात,दुकाना बाहेर,गांधीजीच्या पुतळ्याजवळ बसुन रंगपंचमीच्या गप्पा रंगत.मंडळी मोठमोठ्याने हसतं.चहा वाल्या हॉटेलचे भरपूर गि-हाईक होई.
दुस-या दिवशी रस्त्यावर, भींतीवर,खिडकीवर,मोटारसायकलवर, शाळेतील फरशीवर मला रंगांच्या खुणा बघण्यात खुप मौज वाटत असे.जिथं रंग जास्त पडला त्या ठिकाणी कोणा-कोणाला रंग लावला याची कल्पना करत असे.हाता-पायांच्या बोटांवर,कोप-यावर रंगांचे कवडसे दिसत. परंतु रंगपंचमीच्या रंगापेक्षा मातीवर पडलेले रंग अधिक गर्द वाटत.आभाळावर पडलेली रंगांची मुक्त उधळण बघुन मला रंगपंचमीचे खुप अप्रुप वाटे.शर्टवरील रंगांचे डाग साबणाने व कशानेही जात नाहीत याचे मला नवल वाटे.
©®
*#बालपणाच्या आठवणी*
*रात्र अभ्यासिका*
*शब्दांकन*
*श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता. औसा*
लांडगे मामांनी घड्याळात न पाहताचं टंग टंग टंग टंग घंटा वाजवली.बरोबर साडेचार वाजले होते.शाळा सुटली. घंटेच्या लयबद्द आवाजावर पोरं डान्स करत घराकडे पळत सुटली. लांडगे मामाला टोल टाकताना घड्याळाची कधीही गरज भासत नसे. शाळेत सर्व गुरुजींच्या हातात घड्याळ हायतं मी कशाला घेऊ ? हा लक्ष्मण लांडगे मामांचा " घड्याळ का विकत घेत नाहीत." या सवालावर जवाब असायचा.शाळा सुटली पाटी फुटली चला पटकन घरी.आरडाओरडा करत मुले घराकडे निघाली.
"माझा तर लई अभ्यास हाय बाबा." पोत्याची पिशवी सावरत गण्याने घराकडे धूम ठोकली.
त्याच्या पिशवीचा एक बंद तुटला होता.तुटलेला बंद तोंडात पकडुन गण्या घराकडे जाऊ लागला.सर्कशीतला जोकरासारखे तो हातवारे करु लागला.मी त्या वेळी सातवीत होतो.चौथी व सातवीला बोर्डाची परीक्षा होती.शाळेतील बोर्डाचा ( फलक) व बोर्ड परीक्षेचा काहीतरी संबंध असलाचं पाहिजे याचा मी विचार करीत असे.खाताच्या पोत्याची किंवा महाबीज बियाची पिशवी दफ्तराची पिशवी म्हणुन बरेचं जण वापरत.जीन्सची पँट कोणीचं घालत नसे.टी शर्ट तर कुणालाचं माहित नव्हता. रेडीमेड दफ्तराचा तर पत्ताचं नव्हता.प्रत्येक मुलाचं दफ्तर म्हणजे जादूगारासारख्या पिशवीसारखा असे.अनेक वस्तू त्यात लपवुन ठेवलेल्या असत.प्रत्येकाच्या दफ्तरात पकान्या गोट्या तर हमखास सापडत.
जून उजाडला की टेलरकडे मुलांची दफ्तराची पिशवी शिवण्याकरीता गर्दी होई. त्याचंबरोबर शालेय गणवेश ही शिवुन घेतला जात असे.खाकीरंगाची हाफ चड्डी व तसाच हाफ शर्ट सातवी आठवी पर्यंत मुलं घालत असत.खो-खो,कबड्डी,सुरपारंब्या,लगोरचे,कोया,गोट्या,भोवरे,चिर- घोडी असे अनेक खेळ मुले मैदानावर खेळत असत.
रस्त्याने उड्या मारत जाणारा गण्या आभाळात बगळ्यांची माळ पाहुन हरखुन गेला.संत्याने " बगळे - बगळे चुन्ना चघळे" हे गाणं गाऊन आपल्या बोटांवरील नखात बगळ्यांचे पांढरे ठिपके दाखवले.परीसरातील प्राणी,झाडे,ओढे,शेती याच्याशी मुले घट्टपणे बांधली गेली होती.शाळा हे मुलांचे सर्वात आवडते ठिकाण होते.रविवारी सुद्धा दफ्तर घेऊन झाडांच्या गर्दीत बसुन मुले अभ्यास करत असत.
दहावी बोर्ड परीक्षेला त्या काळात आजच्यापेक्षा सुद्धा खुप महत्त्व होते.दररोज रात्री आठ वाजता दहावीची मुले रात्र अभ्यासिकेला शाळेत जात.शाळेत एका खोलीत लाईटची व्यवस्था केली होती.शाळेच्या भिंतीत तयार केलेल्या एका अलमारीत ती मुले अंथरुण -पांघरुन ठेवत असत.देवु,महेबुब,आरेफ,
राजु,ओम, दहा बारा जण जेवण करुन शाळेकडे गडबडीने निघाली. वाटेत त्यांना सुधाकर भेटला दफ्तर घेऊन सर्वजण लगबगीने चालु लागले.
जुन्या पिढीतली मुले शाळेत मिळुन अभ्यास करत.मुख्याध्यापक सर रात्र अभ्यासिका चालवत असत.काही शिक्षकांची दररोजची ड्युटी त्यांनी या कामी लावली होती.मुले कधी वेळेवर कधी उशीरा पोहचत.जेवण अधिक झाल्यामुळे काही मुले अभ्यास करताना डुलकी काढत व पेंगत असत.
एकदा एक तानु नावाचा मुलगा रात्री शाळेत अभ्यासाला उशीरा गेला.त्याला काही अडचणीमुळे उशीर झाला होता.अभ्यासीकेत खुप उशीरा येणा-या मुलाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले जात असे.त्याचे मित्र स्वागताच्या तयारीत होते.एकाच्या हातात रया गेलेला फडा होता ,एकाच्या हातात उशी व एकजण हातात खपट घेऊन उभा होता.एक जण लाईटच्या बटणा जवळ थांबला होता.काही मुलांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती.सर्वजण काहीतरी मोहीम फत्ते होईल का? याचा अंदाज करत होते.मध्येचं सर आले तर सर्वांनाचं सरांकडुन चांगला मार पडणार होता.मी खिडकीजवळ उभा राहुन अभ्यास कसा करतात हे पहात होतो.तो मुलगा आला.काही कळण्याच्या आत एकाने लाईट बंद केली.सर्वजण त्या मुलावर मारण्यासाठी तुटून पडले.सापडल त्या वस्तुने त्याचा समाचार घेऊ लागले.परंतु आरडा ओरडा अजिबात नव्हता.एका मिनिटाने परत लाईट सुरु झाली.सर्वजण आपापल्या जागेवर चिडीचुप बसले.थोड्या वेळाने सर्वजण खो- खो हसु लागले.हा नवीन अभ्यास पाहुन मी अचंबित झालो.अभ्यासिकेला उशीरा येणा-यांचा मुले वेगवेगळ्या पद्धतीने समाचार घेत असत.हे प्रकार वारंवार घडत.गंमत करुन हसणे मुलांना आवडायचे.टिंगल टवाळी बरोबरचं ही मुले अभ्यासातही हुशार होती.भल्या पहाटे उठुन व्यायाम करत असत.हिंदी व मराठी विषयातील 100 निबंध या मुलांनी लिहुन काढले होते.ब-याचं मुलांचे अक्षरही अप्रतिम,वळणदार होते.शाळेतील विविध स्पर्धात ही मुले भाग घेत असत.भाषणही अप्रतिम करत असत.त्यांचे अनुकरण करुन मी भाषण करायला शिकलो.
रात्री बारा एक पर्यंत ही मुले अभ्यास करीत असत. शाळेतील दोन लाकडी बाकं एकत्र करुन मुले त्यावर झोपत असत.एके दिवशी त्याचं मुलाला बाकड्यावर झोपी गेल्याचे काही मुलांनी पाहिले. त्याचे हातपाय टारगट मुलांनी बाकड्याला सुतळीने बांधले व भूत आलय-या बाबो.असा त्यांनी गोंधळ केला.तो मुलगा खुपचं घाबरला होता.परंतु आपले मित्रांनीचं असं केलय हे लक्षात आल्यावर हसु लागला.तिघांच्या असभ्य वर्तनाबद्दल मुख्याध्यापक सरांनी त्यांच्या पेट्या, सतरंज्या डोक्यावर देऊन मैदानाला एक फेरी मारुन घरी हाकलुन देण्याची कारवाई केली होती.बाकीच्या मुलांचे धाबे दणाणुन गेले.
रात्र अभ्यासिकेला जाणारी मुले पहाटे उठुन निलगिरीच्या 150 ते 200 झाडांना पाणी घालत.मैदानाची साफसफाई करत.ही मुले पुढे खुप मोठी झाली.मला अजुनही त्यांचे निर्मळ,निरागस,हसरे,खेळकर, विनोदी चेहरे आठवतात.
दहावी वर्गातील मुलात थोडा हुडपणा असतोच.ते वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त करत असतात.आजकालची फार कमी मुलं पहाटे उठतात व जी उठतात ती व्यायाम करतील का? हे सांगता येत नाही.आधुनिक काळात पालकांच्या अपेक्षा खुप वाढल्या आहेत.खेड्यातील व शहरातील मुलांचे अभ्यासातील गांभीर्य कमी होत चाललं आहे. मुलांचे हात काही निर्माण करण्यापेक्षा फक्त लिहिण्यात गुंतलेले दिसतात.बुद्धिमत्ता आहे पण चिंतन कमी आहे. लोकसंख्या वाढीबरोबर प्रत्येकाचे तितकेच प्रॉब्लेमही वाढलेले आहेत.कौशल्य नसल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे.निखळ बालपण जाईल असे खेळ संपलेले आहेत.मोबाईल गेम यातच तरुणाईचा वेळ व्यर्थ चाललेला आहे.निरागस, आनंदी बालपण मिळणे दुर्मिळ होत चाललय तरुण मुलांनी आई वडीलांसाठी अभ्यास करावा व त्यांचे स्वप्न पुर्ण करावे.
*बालपणाच्या आठवणी*
*सतीची अग्नी परीक्षा*
आज " धाराशिव वार्ता " या साप्ताहिकाला यशस्वी 10 वर्षे पुर्ण झाली.सर्वप्रथम सर्व वाचक मंडळी तर्फे अभिनंदन करुन हार्दिक मन: पुर्वक हार्दिक शुभेच्छा देतो.धाराशिव वार्ता साप्ताहिकाचं 11 व्या वर्षात पदार्पण होतय.श्री.राजेश शेषेराव बिराजदार लामजनकर यांनी केवळ छंदापोटी वृत्तपत्र सेवा स्विकारली.दिल्ली गाठुन शासनाला हजार- हजार रुपयांचे शपथपत्र,लेखी करारनामा देऊन वृत्तपत्राची नोंदणी केली.वृत्तपत्र चालवणे हे एक आव्हान असतं.समाजातील सर्व घटकांचा विचार करुन त्यात लेखन करावं लागतं. कोणत्याही अमिषाला ,दबावाला बळी न पडता सत्य मांडण्याची कणखर भूमिका ठेवावी लागते.वैयक्तिक किंवा राजकीय दबावाला बळी न पडता सतत संतुलन ठेवावं लागतं.प्रत्येक शब्दांचे,वाक्यांचे किती अर्थ निघतात हे लक्षात सुयोग्य बदल करावे लागतात. आपल्या लेखनाने वैयक्तिक , सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक,सामाजिक,राष्ट्रीय ऐक्यास बाधा अथवा अडथळा येणार नाही ना याची काळजी घ्यावी लागते.वृत्तपत्राचे ब्रीद लक्षात घेऊन समाजप्रबोधन करावे लागते.होकायंत्रासारखे दिशादर्शक व्हावं लागतं. लेख, कविता, बातम्यांची वरचेवर गर्दी वाढत जाते.लेखनातील सर्व प्रकारांना वृतपत्रात यथायोग्य व यथावकाश स्थान द्यावे लागते.नोंद रजिस्टर जतन करावे लागते.क्रम ठरवावा लागतो.वाचकांची आवड व निवड लक्षात ठेवावी लागते. वृत्तपत्राचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे लागते.लेखनामुळे काही कायदेशीर प्रसंग येणार नाही याचे सदैव भान ठेवावे लागते.वृत्तपत्राची व्याप्ती पाहुन स्थळ व काळपरत्वे बदल करावे लागतात. प्रसंगी वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावे लागतात.अंकांची वेळेत छपाई करुन पोस्टात वेळेवर पोहचवावी लागतात. अष्टावधानी राहुन कार्य करावे लागतात.लेखणी हे एक अमोघ व अमुल्य शस्त्र आहे याचा विचार करावा लागतो.प्रेसला वारंवार भेट देऊन दैनंदिन कामाचा आढावा घ्यावा लागतो.प्रत्येक पानाची रचना, सजावट, मुद्रण, चित्रे,याकडे बारकाईने लक्ष पुरवावे लागते.शासनाने दिलेल्या सुचनांचे वेळोवेळी तंतोतंत पालन करावे लागते.अंकांची विक्री व छपाई यांचा ताळमेळ ठेवावा लागतो.प्रपंच सांभाळुन वेळ द्यावा लागतो.विविध शासकीय, निमशासकीय संस्थांना पत्रव्यवहार करुन अथवा प्रत्यक्ष भेट देऊन सूचनांची अंमलबजावणी करावी लागते.वृत्तपत्र चालवणे हा काही जोक नाही.वृत्तपत्राला जनतेच्या व शासनाच्या अग्नीपरीक्षेतुन जावे लागते.वृत्तपत्र जनतेच्या व शासनाच्या अपेक्षेला फोल ठरल्यास ती बंद करावी लागतात.
"धाराशिव वार्ता " या साप्ताहिकाची वाटचाल अतिशय यशस्वीपणे चालली आहे.गेल्या दहावर्षात या वृत्रपत्राला विविध अनुभव आलेले आहेत.वृत्तपत्राचे संपादक श्री.राजेश शेषेराव बिराजदार यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा जबरदस्त प्रभाव आहे. स्वाभिमानाने व स्वकर्तृत्वाने जीवन जगण्याची जीवनदृष्टी आहे.साधेपणा,कष्ट,जिद्द व सातत्याने समाजासाठी झटण्याची त्यांची धडपड कौतुकास्पद आहे.आपल्या वडिलांच्या आदर्शावर पाऊल ठेवुन पुर्वजांचा वसा व वारसा त्यांचे आचार- विचार ,संस्कृतीची जोपासना करणारी तत्वचिंतक मुर्ती या शब्दात त्यांचे वर्णन केल्यास शब्दही अपूरे पडणार आहेत.सत्याचा ध्यास व जनतेचा विकास ही धाराशिव वार्ता साप्ताहिकाची मूल्यदृष्टी आहे.जीवनातील अनेक संकटावर मात करुन पुढे जाण्याची जीवनदृष्टी या वृत्तपत्रामुळे वाचकास मिळाली आहे. लॉकडाऊनच्या काळातील वृत्तपत्र खंबीरपणे उभे राहिले आहे. दहा वर्षातील कोणताही अंक काढुन वाचन केल्यास ज्ञानाचा व विचारांचा अमूल्य ठेवा वाचकांना दिसतो. आपले जीवन सकारात्मक,चांगल्या विचारांनी भरलेले असावे. दूस-यासाठी काही तरी चांगलं करता येत का? थोडं आपल्यासाठी व अधिक लोकांसाठी हा वसा घेऊन सतीच्या अग्नी परीक्षेतुन वाटचाल करणा-या माझ्या लाडक्या " धाराशिव वार्ता" पत्रास दशकपुर्ती निमित्त पुनश्च खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन करतो.
*श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता.औसा जि.लातूर*
*बालपणीच्या आठवणी*
*विज्ञान विषयाचे गुरुजी*
*वसंत सिताराम टेंकाळे सर*
"सर्वजण रांगेत चला, कोणीही गडबड करणार नाही," असा आवाज कानावर पडताचं मी भानावर आलो.
आठवीची सर्व मुले रांगेत प्रयोगशाळेत गेली.सर्वांनी आपल्या पायातील वहाणा प्रयोगशाळेबाहेर रांगेत ठेवल्या.माझे लक्ष प्रयोगशाळेतील फलकाकडे गेले. त्यावर एक अत्यंत सुबक आकृती काढली होती. त्याच्या बाजुला प्रयोगाची क्रमवार कृती दिलेली होती.वायुपात्र, काचेचे भांडे,काचेच्या नलिका, स्टँड, गोल बुडाचा चंबु विविध साहित्यांना नावे दिलेली होती. अजुनही त्या फलकाचा फोटो मी डोळ्यात साठवुन ठेवला आहे. प्रयोगशाळेतील एका शास्रज्ञाचा चष्मा सरांच्या चष्म्यासारखा दिसत असे.मी मित्राच्या कानात कुजबुजलो अरे, सर आज आपणास नवीन प्रयोग दाखवणार आहेत वाटतं? तेवढ्यात कोप-यात लोंबणा-या व कडीला टांगलेल्या हाडाच्या सापळ्याकडे माझे लक्ष गेले.पुर्वी प्रयोगशाळेत खरेखुरे ओरीजनल हाडाचे सापळे असत.मुले त्याच्याकडे पाहुन चर्चा करत.टेंकाळे सर खादीचा हाफ शर्ट घालत.पुस्तक हातात न घेता सर शिकवत असत.प्रयोगशाळेत बसल्यानंतर सर कधी कधी पुस्तक वाचताना डोळ्यावर चष्मा घालत परंतु स्पष्टीकरण देताना चष्मा काढुन देत असत.संकल्पना बारकाईने समजावुन सांगत.फलकावर व्यवस्थित सुवाच्च अक्षरात लेखन करत.वक्तशीरपणा, शिस्त,संयम,शांत गंभीर तितकाचं मोकळा स्वभाव.सरांना मी एक मिनिट सुद्धा वर्गात उशीरा आल्याचं पाहिलेलं आठवत नाही.विज्ञान विषयाचा सरांना खोलवर व तपशीलवार अभ्यास होता .मी आठवीला असताना सर रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र असे तीन विषय शिकवत . सरांचे तीन विषयांचे अभ्यासक्रम संपवण्याचे संतुलन कमालीचे होते.सर वर्गात आल्यानंतर पीन ड्रॉप सायलंस असे.सरांना बहुतेक सर्व संकल्पना तोंडपाठ होत्या.जीवशास्रातील सर्व संकल्पना सांगताना काचेच्या पात्रात ठेवलेले मॉडेल्स दाखवत. तारामासा, समुद्री जीव,शॅमेलीयन सरडा,बेडूक,साप,असे विविध प्राणी काचेच्या उभ्या बरणीत ठेवलेले असत.कान व डोळा याची संरचना शिकवताना सर मॉडेल सोबत ठेवत.सर काळ्या शाईच्या पेनने लिहित.त्यांचे हस्ताक्षर अत्यंत चांगले होते. वर्गात गडबड करणा-या मुलांचा ते समाचार घेत.कृती करा ठोंब्यासारखं बसु नका अस सांगत.कधी - कधी विनोदही करत.बावळटांनो,गधडीच्यांनो,ठोंब्यानों,जिलेबीचं ताट हे शब्द ऐकुन मला खुप हसु येई.
" हे पहा मुलांनो.आज आपण प्रयोगशाळेत ऑक्सीजन वायु तयार करुन त्याच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत." पाच ते सात मिनिटात सरांनी ऑक्सीजनचा शोध कोणी लावला त्याचे विविध उपयोग व महत्त्व सांगितले. प्रयोगाचे नाव, प्रयोगास लागणारे साहित्य,प्रत्यक्ष कृती,निष्कर्ष सर्व काही फलकावर होते त्याचं सरांनी वाचन करुन घेतलं.मुलांचा सहभाग घेऊन ऑक्सीजन कसा तयार करतात हे प्रत्यक्ष कृती करुन दाखवलं. गटकार्य देऊन प्रत्येक गटाला ऑक्सीजन वायु पात्रात जमा कसा करावा? याचे प्रात्यक्षिक दाखवलं. ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो म्हणजे नेमकं काय होतं? ऑक्सीजनने भरलेल्या वायुपात्रात हुंगल्यास तरतरी का येते? निळ्या व तांबड्या लिटमसवर वायुचा काय परिणाम होतो?रंगहीन, गंधहीन, चवहीन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा घडवुन आणली. जगण्यासाठी मासे पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन घेतात.हे ही सांगत.सुक्ष्मदर्शक यंत्राचा वापर करुन स्पायरोगायरा, म्युकर ची रचना दाखवत.
प्रयोग संपल्यानंतर आम्ही सर्वजण रफ वहीत फलकावरील मजकुर लिहुन घेत असु.दुस-या दिवशी प्रयोगवहीत पुन्हा फेर लिहुन तपासण्यासाठी सर्वांच्या वह्या सरांच्या प्रयोगशाळेतील टेबलावर ठेवत असु.काय चुकले? काय बरोबर? याची तपशीलवार माहिती सर वह्या तपासुन देत.सर महिन्यातुन प्रत्येक विषयाचा गृहपाठ देत.सर्वात चांगली आकृती कोण काढतो? यासाठी आम्हा मुलांमध्ये चुरस असे.
दरवर्षी मकरसंक्रांती दिवशी सरांचे अत्यंत चांगले माहिती देणारे व्याख्यान असे.सर मकर संक्रांतीचे वैज्ञानिक महत्त्व समजावुन सांगत.सर शाळेतील मुलांमध्ये वैज्ञानिक जाणिवा निर्माण करण्यासाठी विविध परीक्षांचे आयोजन करत.सर अंनिस मध्ये काम करत.शाहु कॉलेज मध्ये नियमितपणे बैठकीला जात.डॉ. नरेंद्र दाभोळकर सर सरांशी बोलत चर्चा करत.डॉ.अनिरुद्ध जाधव,माधव बावगे तिथं दिसत.पुढे शाळा शिकुन मी महाविद्यालयात गेल्यानंतर डॉ.नरेंद्र दाभोळकर सरांना भेटावयास गेलो होतो.त्यांचे अप्रतिम व्याख्यान ऐकण्यास टेंकाळे सर सफारी ड्रेसमध्ये आले होते.त्यांचा तो आनंदी, हसरा,प्रसन्न चेहरा पाहुन खुप आनंद वाटला होता. सेवानिवृत्तीनंतर सरांच्या चेह-यावरील समाधान पाहुन खुप धन्यता वाटली.ज्ञानावर प्रचंड निष्ठा असणारे,अत्यंत तळमळीने विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे,कडक शिस्तीचे तितकेचं प्रेमळ,कालानुरुप परिवर्तनास सामोरे जाणारे व स्वत: मध्ये अगोदर बदल स्विकारणारे विवेकवादी टेंकाळे सर आज बालपणीच्या आठवणीत खुप आठवतात.
कृतज्ञ मी कृतार्थ मी.
*शब्दांकन*
*श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता.औसा*
*बालपणीच्या आठवणी*
*आठवणीतले शिक्षक*
*कै.विठ्ठल काशिनाथराव जगताप*
तिसरा टोल पडला.टंग, टंग,टंग
"सर आले रे",कोणीतरी मोठ्याने ओरडलं.मुलांचा वर्गात गलका सुरु होता.कागदी विमान वर्गात जोरात इकडुन तिकडे जात होतं.आवाज आला " ओ गावलगडदे थोडं थांबा."
"एक साथ नमस्ते"
हाफ शर्ट,उंची पाच फुट,हसरा चेहरा जगताप सर वर्गावर आले.सर डावा हात अधुनमधुन पोटावर ठेवुन बोलत.उजव्या हाताने हातवारे करत.
" सर, तुम्ही बसा म्हणायच्या आत तेवका तेनं बसलय बघा." सरांनी एकवार वर्गातून नजर फिरवली.तक्रार करणा-या मुलाकडे पाहुन सर गालातल्या गालात हसले. सर्वांना त्यांनी बसा म्हंटलं.
सरांच्या हातात दोन खडू व लाकडी डस्टर असे.त्यांनी फलकावर एक सुविचार लिहिला," बोलणे कमी,काम जास्त." सर्व मुलांना सरांनी वह्या काढण्यास सांगितले. मुले आवाज न करता फलकावरील सुविचार लिहिण्यात मग्न झाली.सर अत्यंत मितभाषी,वास्तववादी होते.बोलताना अत्यंत मोजुन नेमकं बोलत.गणितातील नेमके पणा त्यांच्या बोलण्यातही होता.फलकावर एक उदाहरण लिहित. त्याचं वाचन घेत.काय दिलेलं आहे? याची मांडणी करत. काय काढावयाचे आहे ? याबद्दल मुलात चर्चा करत. विशिष्ट पाय-या मांडुन गणित सोडवुन दाखवत.सर भूमितीतील प्रमेय अप्रतिम पद्धतीने शिकवत. पाठ करण्यास सांगत.एकचं उदाहरण शिकवत. मुलांना आव्हान देऊन बाकी उर्वरित स्वाध्याय घरुन सोडवुन आणण्यास सांगत.एकचं उदाहरण समजावुन सांगतात काही मुलांची दबक्या आवाजात तक्रार असे.सर मुलांना विचार करण्यास प्रवृत्त करत. सरांचा चष्मा अत्यंत स्वच्छ असे. बिंदू,रेषा,रेषाखंड, वर्तुळ, जीवा,त्रिज्या,व्यास परीघ,प्रतल,कोन,कोनाचे प्रकार,संलग्न कोन,व्युत्क्रम कोन,कोटी कोन,चक्रीय कोन, रेषीय जोडी,परस्पर पुरकता,समानता, भिन्नता सहज सांगत.भूमितीवर सरांचे प्रचंड प्रभुत्व होते.कंपास पेटी घेऊनचं सरांचे वर्गात आगमन होत असे.सरांनी भूमितीतील संकल्पना आम्हा मुलांना एकदाचं सांगितल्या होत्या.मुले एकाग्रतेने ऐकत.ब-याचं मुलांना व्याख्या तोंडपाठ असत.सर मुलांना श्रमाचे महत्त्व सांगत.लामजना पाटीवर पार्टनरशीपमध्ये सरांचे कापडाचे दुकान होते.त्याचे नाव " श्रमसाफल्य" असं सरांनी ठेवलं होतं.शाळा सुटल्यावर सर शेतात जात असत.स्वत: काम करत.
नंदर्गे सर जगताप सरांना प्रेमाने सावकार म्हणुन हाक मारत.जगताप सरांचा फार मोठा कालावधी प्रशाला लामजना येथे पूर्ण झाला.
मी एकदा वाचनालयात गेलो पेपर वाचल्यानंतर रजिस्टर मध्ये स्वाक्षरी केली.रजिस्टर मधील पाने चाळताना मला जगताप सरांची स्वाक्षरी दिसली .मी चौकशी केली तेंव्हा सर येथे येत नसतात कोणीतरी दुस-याच व्यक्तीने त्यांची हुबेहुब सही केली होती मी ही अचंबित झालो.√''''''''''' त्यांच्या आडनावाची सुरुवात J ह्या इंग्रजी अक्षराने होते .जगताप सरांनी गणितातील वर्गमुळाच्या चिन्हाचा व कँपिटल J अक्षराचा स्वाक्षरीमध्ये सुंदर मिलाफ घातला होता.
जगताप सर गणित व भूमिती विषय शिकवत असत.आज ही त्यांनी शिकवलेले प्रमेय लक्षात आहेत. त्यांचे विषयावरील प्रभुत्व अचाट होते.अतिशय शिस्तीत फलकावर भौमितीक आकृत्या कंपास पेटीच्या सहाय्याने काढत असत.जगताप सरांचे संकल्पना ज्ञान पक्के होते.बीजगणितातील उदाहरणे फलकावर समजावुन देऊन मुलांचा सराव सर घ्यायचे.सर मितभाषी,स्पष्ट वक्ते होते.कमी बोला व अधिक वाचा.हे सुत्र सर मुलांना वहीत लिहायला सांगत असत व त्याचे पुन्हा पुन्हा वाचन करायला सांगत. गृहपाठावर Good,very good,best मिळवण्यासाठी मुले स्पर्धा करत.एखाद्याचा सदगुण वर्गात सांगत.दहावी बोर्डात प्रथम आलेल्या मुलांबद्दल चर्चा करत.प्रोत्साहन देत. हाफ शर्ट व पँट हा त्यांचा आवडता पोशाख .सर नियमितपणे तासावर जात असत.कुणाची निंदा व टिंगल टवाळी यापासुन सर दूर रहात.सरांनी पहिले वाहन बजाज कंपनीची M - 80 ( एम.एटी)घेतली होती. सेवानिवृत्ती पुर्वी एक वर्ष अगोदर सरांनी पांढरी टाटा कार घेतली होती.सर कार चालवायला पण शिकले होते.त्यांचे गाव पाच कि.मी.अंतरावर उत्का हे होते.परंतु सर लामजन्यात रहात असत.सर म्हणत मी बालवयात केलेल्या कष्टाचं चीज झालं. तुम्ही सुद्धा या वयात कष्ट करा.असा त्यांचा कानमंत्र होता.सर सेवानिवृत्त झाले कांही महिन्यातचं त्यांचं अकाली निधन झालं.
मी प्राथमिक वर्गाचा शिक्षक झालो.तेंव्हा सरांकडे हायस्कुलचा चार्ज होता. एकदा दीपावलीचा पगारीचा चेक घेऊन कनिष्ठ सहायक पठाण सरांसोबत सरांच्या घरी गेलो होतो.सर मळ्यात गेले होते.मग आम्ही मळ्यात गेलो.सर ऊसाला पाणी देत होते.मी सरांना हाक मारली .सर ऊसाच्या शेतातुन बाहेर आले व म्हणाले " तूम्ही माझी सही केलात तर चालले असते की ,कशाला बेजार झालात? "मी हसलो व म्हणालो सर तुमची सही खुप सोपी आहे.वाचनालयातल्या रजिस्टरवर मी पाहिली आहे.सर हसु लागले.मी म्हणालो पण सर तुमची सही मी कसं काय करु? मी अवघडलो.
एकदा सर मला म्हणाले , "तुम्ही कोरे बॉंड पेपर घेऊन या व माझ्या सह्या घ्या." मी शिक्षक होतो परंतु सरांपुढे विद्यार्थ्यीचं होतो.आपल्या सरांचा विद्यार्थ्यावर खुप विश्वास होता.शाळेत सर कधी भाषण करत नसत.सर अजातशत्रु स्वभावाचे होते.सातव्या वर्गातील अभ्यास न करणारी मुले आठवी वर्गात सरांकडे दाखल झाली की सरळ अभ्यासाला लागत. स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याने सातत्य ठेवुन , जिद्दीने , चिकाटीने ,मेहनतीने अभ्यास करावा हा अनमोल संदेश आजही आठवतो.
सरांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
*बालपणीच्या आठवणी*
*शब्दांकन*
*श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता.औसा*
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)