शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४

*बालपणीच्या आठवणी* *किल्लारीचे जिडगे सर* पहिला टोल पडला.जिडगे सर वर्गात आले.मुलांचा गोंधळ थांबला.एका सुरात मुले म्हणाली. एक साथ नमस्ते ! सरांनी मुलांना बसायला सांगितलं.सर आज विज्ञान विषयातील वनस्पतीचे अवयव हा एक पाठ शिकवणार होते.त्यांच्या एका हातात धोतरा या वनस्पतीचे एक रोपटे होते.काय आहे ते म्हणुन मुले पाहु लागली. सरांनी फलकावर वनस्पतीचे अवयव असं शीर्षक लिहिलं.मुलांना विविध वनस्पतींची नावे विचारली. फुले,फळे येणारी व न येणारी असं तोंडी वर्गीकरण केलं.सर एका हातात धोतरा ही परिसरात आढळणारी एक वनस्पती घेऊन चर्चा करु लागले. मूळ, खोड, पान,फूल, फळ हे वनस्पतीचे अवयव दाखवु लागले. प्रत्येक अवयवाचे कार्य ते सांगु लागले.मुले लक्षपुर्वक ऐकु लागली.पाठ संपल्यानंतर त्यांनी मुलांना प्रश्न विचारले.उत्तरे सांगण्यासाठी मुले मी सांगतो सर ...मी सांगतो सर...असा गोंधळ करु लागली.सर्वांना प्रश्नोत्तरे विचारुन, चर्चा करुन सर शंका समाधान करत होते.मुलांच्या चेह-यावर काही तरी समजल्याचा खुप मोठा आनंद दिसत होता.पाठ संपल्यानंतर सरांनी मुलांना स्वाध्याय दिला. त्यांनी उद्याच्या तासिकेचं नियोजन सांगितलं.मुलांनो उद्या मी तुम्हाला उष्णतेमुळे धातु प्रसरण पावतात हा एक प्रयोग दाखवणार आहे.मुले पुस्तकात पाठ शोधु लागली.परंतु या प्रयोगासाठी एक स्टोव्ह लागणार आहे.उद्या कोण घेऊन येतो? मुले, मी आणतो ,मी आणतो सर म्हणु लागली.शेवटी एका मुलावर स्टोव्ह आणण्याची व एकाला रॉकेल आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली .30 सप्टेंबर 1993 च्या भूकंपापूर्वी रॉकेलवर चालणारे स्टोव्ह बहुतांश नौकरदार व कामगार लोकांच्या घरा घरात होते. तुरळक लोकांच्या घरी गोबरगॅस होते.रॉकेलही मुबलक प्रमाणावर मिळत असे. प्रयोगाचे नाव काढताचं सर्व मुलांच्या चेह-यावर उत्सुकतेने आनंदाची लहर निर्माण झाली.उद्या काही तरी नवीन होणार होते.मुलांची जिज्ञासा शिगेला पोहचली. जिडगे सर खादीचा कडक इस्त्री केलेला पांढ-या रंगाचा नेहरु शर्ट घालत,तसेच स्वच्छ पांढरे धोतर नेसत,डोक्यावर गांधी टोपी घालणारे जिडगे सर पाचवी ते सातवी वर्गापर्यंत विज्ञान विषय शिकवत असत.सरांचे गाव भूकंपात उद्ध्वस्त झालेले किल्लारी . ते दररोज नियमितपणे किल्लारीहुन बसने येत असत.लातूर ते उमरगा या बसेस लामजना गावातुन फेरी मारुन मुख्य रस्त्याने जात असत.किल्लारी गावात सरांचे कापडाचे दुकान होते.भूकंपानंतर त्यांचे दूकान किल्लारी पाटीवर स्थलांतरित झाले.जिडगे सर कधी- कधी पान आवडीने खात परंतु मुलांसमोर पान खात नसत. लामजना जि.प. प्रशालेत लक्षात राहिलेले शिक्षक म्हणजे किल्लारीचे जिडगे सर.ते नियमितपणे शाळेत येत असत.सर खुप कडक शिस्तीचे पण तितकेच मायाळु होते.सर नियमितपणे अनुपस्थित व अनियमित असणा-या मुलांचा समाचार घेत असत.चुकार व टुकार मुलांना हातानेच पाठीवर व मानेवर खणकावत असत.मी पाचवीला होतो सर आम्हाला विज्ञानाचे प्रयोग करुन दाखवत असत.लामजना प्रशालेत वर्षानुवर्षे गुरुजन नौकरी करत.त्यांची सहसा बदली लवकर होत नसे. बदलीची अनौपचारिकपणे सुद्धा चर्चाही कदाचित होत नसेल.प्रशालेत 35 ते 40 गुरुजींचा स्टाफ कायम असे. शाळेत प्रयोग आहे असं समजताचं दुस-या दिवशी सर्व मुले शाळेत आली.सरांनी तो प्रयोग करुन दाखवला. सरांच्या हातात लोखंडी गोळा असलेली धातुची भिंगाच्या आकाराएवढी लोखंडी गोल कडी होती.भिंगाच्या आकाराची कडी पकडण्यासाठी लाकडी मुठ जोडलेली होती व त्या कडीला साखळीने एक गोलाकार लोखंंडी गोळा बांधलेला होता व तो लोंबकळत होता.त्या साहित्याकडे पाहुन मुले हसु लागली.सरांनी हातातील ही लोखंडाची वस्तु पहा असं सांगितलं.लोखंडी कडीतुन धातुचा गोळा सामान्य तापमानाला आरपार जातो.हे प्रात्यक्षिक करुन दाखवलं. नंतर स्टोव्ह पेटवुन त्यावर लोखंडी गोळा चिमट्याने धरला.थोड्या वेळाने गोळा तापुन लाले लाल झाला. सरांनी पुन्हा त्या लोखंडी कडीतुन गोळा जातो का हे दाखवलं?कडीतुन गोळा आरपार गेला नाही. हे असं का झालं म्हणुन प्रश्न विचारला. उष्णतेने धातु प्रसरण पावतात हे समजण्यासाठी मुलांना अधिक वेळ लागला नाही. सरांची शिकवण्याची पद्धत प्रात्यक्षिकावर आधारित होती. सर विज्ञानाचा पाठ शिकवताना चार्टचा वापर करत असत.सर टोल पडताचं वर्गात येत असत. शाळेतील त्यांचे वर्तन आदर्श होते.सर मितभाषी होते. साधेपणा, निगर्वीपणा,सौम्यता,नम्रता,स्पष्टता व कृती आधारित वैज्ञानिक दृष्टिकोन ही मुल्ये सरांकडे होती.कष्ट हाच देव.श्रम हीच पूजा ही मुल्ये सरांनी आचरणातुन मुलांना शिकवली.भूकंप झाल्यानंतर सरांचे किल्लारी हे गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.आलेल्या संकटाचा सरांनी मोठ्या धैर्याने सामना केला.किल्लारी गावात असलेले ग्रामदैवत निळकंठेश्वराचे मंदिर मात्र शाबुत राहिले.हे हेमाडपंती प्राचीन मंदिर भारतीय वास्तुशास्त्राचा अजोड, अद्भुत नमुना आहे.किल्लारी गावाचे पुनर्वसन झाले परंतु मनाचे पुनर्वसन होण्यास बराचसा कालावधी लागला.रामकथेच्या माध्यमातुन राष्ट्रसंत मोरारी बापु यांनी जनतेला धीर दिला.मुख्यमंत्री शरद पवार व स्व.बाळासाहेबांनी जनतेला आधार दिला.अमेरिकेतुन विदेशातुन भरभरुन मदत आली.भूकंपानंतर सरांची किराणा दुकानात भेट झाली.खुप आनंद वाटला. आज माझ्या बालपणीच्या आठवणीत जिडगे सरांची खुप खुप आठवण येते. *लेखन व माहिती संकलन* *श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता.औसा जि.लातूर*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा