शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४
*खरोश्याचे स्वामी सर*
*बालपणीच्या आठवणी*
जून उजाडला. शाळा सुरु झाली.मी चौथी पास होऊन पाचवीच्या वर्गात गेलो.ताज्या फुलांचा सुगंध जसा दरवळतो.हवाहवासा वाटतो.पुस्तकातील अक्षरांनी नटलेल्या शब्दरुपी फुलांना पण गंध असतो.नवीन कोरी पुस्तके उघडुन अक्षरांना चिकटलेला सुगंध मुले हुंगत होती. कोकीळेच्या कुहूकुहूने प्रसन्नता खुप वाढली.दफ्तर बगलेत मारुन मी व माझे मित्र शाळेकडे पळालो. पहिल्याचं दिवशी मैदान मुलांनी फुलुन गेले. प्रार्थना संपली.रुटीन प्रमाणे आम्ही पाचवीच्या वर्गात जाऊन बसलो. ऑफीसच्या बाजुलाचं आमचा वर्ग होता.सर्व मुले आनंदात होती.गप्पा मारण्यात मश्गुल होती.लांडगे मामांनी पहिला टोल दिला.पहिला तास संपला.मला वाटतं दूस-या किंवा तिस-या तासिकेला स्वामी सर आले.सरांनी वर्गात येताचं मुलांची चौकशी केली.पुस्तक उघडुन सर कविता गाऊ लागले.
A B C D E F G ;
Come on Meena play with me.
H I J K L M N
Count the books we have ten
O P Q R S T U
I am reading so are you.
V and W X Y X Z
Give me the books you have read.
या कवितेनं मी एका विषयाकडे अक्षरश: ओढलो गेलो. वरील कविता मला आजही तोंडपाठ आहे.2000 नंतरच्या नवीन अभ्यासक्रमात कवितेत बदल केला गेला. Meena च्या ऐवजी Sonu व playing च्या ऐवजी reading असा बदल करण्यात आला.
पाचवीच्या वर्गात इंग्रजी विषयाची सुरुवात स्वामी सरांनी कवितेनं केली हा अनुभव आम्हा विद्यार्थ्यांना अविस्मरणीय होता.मला तर ही कविता खुप खुप आवडली.इंग्रजी विषयाची गोडी या कवितेमुळेचं तर लागली.कोणत्याही विषयाची गोडी लागण्यासाठी एकदम सुरुवातीचे अनुभव खुप महत्त्वाचे असतात.मी पाचवीला आलो आणि इंग्रजी विषयाला सुरुवात झाली.चौथी वर्गापर्यंत ABCD चा सुद्धा परिचय नव्हता.सातवी वर्गापर्यंत जाईपर्यंत इंग्रजी विषयाचं चांगल्या प्रकारे वाचन करु लागलो.आठवी वर्गात गेल्यानंतर वाघोलीकर सरांचे इंग्रजी बोलणे समजु लागले.स्वामी सरांनी आम्हा मुलांचा इंग्रजी विषयाचा पाया पक्का केल्यामुळे पुढील दिशा स्पष्ट झाल्या.मला वाटतं प्राथमिक शिक्षणाकडे जेवढं जास्त लक्ष देता येईल तेवढं दिलं गेलं पाहिजे.प्राथमिक कौशल्य भाषेच्या बाबतीत वाचन, लेखन व गणिताच्या बाबतीत संख्याज्ञान व संख्येवरील क्रिया मुलांना चांगल्या प्रकारे अवगत झाल्या की त्यांना पुढे भविष्यात स्वयंअध्ययन करणे सोपे होते.
स्व. प्रा.रामकृष्ण मोरे व स्व.विलासराव देशमुख यांच्या अथक प्रयत्नांमुळे इ.स.2000 पासुन पहिलीपासुन इंग्रजी विषयाला सुरुवात झाली.स्वामी सर खरोसा गावातुन नियमितपणे सायकलवर येत असत.त्यांचा तो प्रसन्न हसरा चेहरा मुलांमध्ये उत्साह निर्माण करत असे.धोतर व नेहरु शर्ट घालणारे स्वामी सर सर्व शिक्षकांमध्ये ठळकपणे उठुन दिसत.टापटीपपणा,स्वच्छता या मुल्यांकडे सरांचे विशेष लक्ष असे.स्वामी सर प्रत्येक शिक्षकांसोबत स्नेह दाखवत असत.सौजन्याने वागत.समोरच्या माणसाचा आनंद द्विगुणीत करत. त्यांच्या बरं... बरं.... बरं....या शब्दातुन समोरचा माणुस खुप आनंदी होत असे.सरांचे अक्षर अत्यंत सुबक होते.सर मुलांना शब्दांचा अर्थ व त्यांचा वाक्यात वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करत.इंग्रजी भाषेचं व्याकरण समजावुन सांगत.छोट्या निबंधाचे लेखन करुन घेत असत.सर आम्हाला सातवीपर्यंत इंग्रजी विषय शिकवत.त्यांनी शिकवलेला सिंड्रेला हा पाठ अजुनही लक्षात आहे.सरांच्या नियमित तासिकांमुळे मी इंग्रजी चांगल्या प्रकारे वाचू लागलो.शब्दांचे पाठांतर करु लागलो.माझे लेखन सुधारु लागले.पाठ वाचल्यानंतर त्याचा अर्थही समजु लागला.इंग्रजी विषयाची पक्की दोस्ती झाली.स्वामी सरांनी आम्हा मुलांचा इंग्रजी विषयाचा पाया पक्का केला.सर इंग्रजी शब्दांचा उच्चारण सराव खुप घेत असत.मुलांना शब्दांचे व्यवस्थित उच्चारण कसे करावे याचा सातत्याने सराव नसेल तर ती मुले इंग्रजी वाचू शकत नाहीत.नियमितपणा व अभ्यास यातुनचं विद्यार्थी घडतो.
सर प्रेमाने सहज समजावुन सांगत त्यामुळे मुलांना विषय पटकन समजत असे.शाळेत कोणताही कार्यक्रम असो स्वामी सर मुलांना सोबत घेऊन सरस्वती स्तवन व स्वागत गीत गाऊन सुरुवात करत असत.सर पेटी वाजवत.आमच्या प्रशालेत महान लेखक यदुनाथ थत्ते आले होते.तेंव्हा सरांनी मुलांना सोबत घेऊन स्वागत गीत गायन केले होते.शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमातही स्वामी सर व जोशी सर खुप प्रयत्न करत.स्वामी सरांच्या व जोशी सरांच्या केशरचनेत खुपचं साम्य होतं.किशोर कुमार प्रमाणे ते केशरचना करत.साधेपणा हा त्यांचा सर्वोच्च दागिना होता. बोलण्यात नम्रता, सौम्यता, आपुलकी व सोज्वळपणा हा प्रकर्षाने दिसुन येई.स्वामी सर अगदी वेळेवर येत.माझ्या काळातील सर्व गुरुजनांकडुन मी वक्तशीरपणा शिकलो.मुल्ये शिकवल्यानंतर माणुस शिकत नसतो ती स्विकारुन आचरणात आणावी लागतात.शाळा सुटल्यानंतर सर्व मुले शाळेच्या बाहेर अगोदर जात.माझ्या काळातील गुरुजनांनी घरी जाण्याची कधी घाई केल्याचे आठवत नाही.
स्वामी सर जवळपास पंधरा कि.मी.अंतर पार करुन दररोज सायकलवर येत असत.दररोज सायकल चालवण्यामुळे सरांची प्रकृती ठणठणीत दिसे.सर कधी आजारी पडल्याचे आठवत नाही.सरांना लवंग व विलायची खाणे आवडत असे.संयम व शांतता प्रिय स्वामी सर पेपरचे वाचन नियमित करत.ते चष्मा अतिशय स्वच्छ ठेवत.लाल कव्हरमधुन चष्मा अलगद काढत. फक्त पुस्तकाचे वाचन करताना चष्मा वापरत.सर नेहमी प्रसन्न व हसतमुख रहात.स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनादिवशी सरांचा उत्साह ओसांडुन वहात असे.मु.अ.सरांना ध्वजारोहणासाठी सर मदत करत असत.शाळेत कोणताही कार्यक्रम असला की सरांचे योगदान मोठे असे.सर भाषणापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर अधिक विश्वास ठेवत.
ज्ञान,प्रेम व संस्कार या त्रयींच्या शक्तीतुन माणुस घडतो.सरांनी आम्हा मुलांना नकळत मुल्यांचे शिक्षण दिले.सर सौजन्य व आपुलकीतुन मुलांची मने जिंकत.सरांचे खरोसा हे गाव एक ऐतिहासिक गाव असुन वाकाटक, चालुक्य , राष्ट्रकुटांच्या काळातील खोदल्या गेलेल्या प्राचीन लेण्या या गावाजवळील डोंगरावर पहायला मिळतात.तेथे रेणुका देवीचे मंदीर आहे. ऐतिहासिक दर्गा आहे.प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा येथे दिसतात.सीतेची न्हाणी आहे.प्रभू राम वनवासात असताना येथे आल्याचा काही लोक उल्लेख करतात.तेथील हौदात बारा महिने पाणी असते.खरोसा गावातील स्वामी सर आम्हा मुलांना देवासमान वाटत.एकदा सर सायकलवरुन पडले.पायाला दुखापत झाली.तरी सुद्धा सर शाळेत येऊन मुलांना अध्यापनाचे काम करु लागले. त्यांचा अध्यापनाचा उत्साह सतत टिकुन रहात असे.पुढील पिढ्यांना सरांनी ज्ञानाची शिदोरी भरभरुन दिली.
*गुरुनीं दिला आम्हाला वसा*
*आम्ही पुढे चालवु हा वारसा*
सर माझ्या बालपणीच्या आठवणीत खुप आठवतात.
कृतज्ञ मी कृतार्थ मी.
*लेखन व संकलन*
*श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता.औसा जि.लातूर*
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा