शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४

*आठवणीतले शिक्षक* *कै.विठ्ठल काशिनाथराव जगताप* तिसरा टोल पडला.टंग, टंग,टंग "सर आले रे",कोणीतरी मोठ्याने ओरडलं.मुलांचा वर्गात गलका सुरु होता.कागदी विमान वर्गात जोरात इकडुन तिकडे जात होतं.आवाज आला " ओ गावलगडदे थोडं थांबा." "एक साथ नमस्ते" हाफ शर्ट,उंची पाच फुट,हसरा चेहरा जगताप सर वर्गावर आले.सर डावा हात अधुनमधुन पोटावर ठेवुन बोलत.उजव्या हाताने हातवारे करत. " सर, तुम्ही बसा म्हणायच्या आत तेवका तेनं बसलय बघा." सरांनी एकवार वर्गातून नजर फिरवली.तक्रार करणा-या मुलाकडे पाहुन सर गालातल्या गालात हसले. सर्वांना त्यांनी बसा म्हंटलं. सरांच्या हातात दोन खडू व लाकडी डस्टर असे.त्यांनी फलकावर एक सुविचार लिहिला," बोलणे कमी,काम जास्त." सर्व मुलांना सरांनी वह्या काढण्यास सांगितले. मुले आवाज न करता फलकावरील सुविचार लिहिण्यात मग्न झाली.सर अत्यंत मितभाषी,वास्तववादी होते.बोलताना अत्यंत मोजुन नेमकं बोलत.गणितातील नेमके पणा त्यांच्या बोलण्यातही होता.फलकावर एक उदाहरण लिहित. त्याचं वाचन घेत.काय दिलेलं आहे? याची मांडणी करत. काय काढावयाचे आहे ? याबद्दल मुलात चर्चा करत. विशिष्ट पाय-या मांडुन गणित सोडवुन दाखवत.सर भूमितीतील प्रमेय अप्रतिम पद्धतीने शिकवत. पाठ करण्यास सांगत.एकचं उदाहरण शिकवत. मुलांना आव्हान देऊन बाकी उर्वरित स्वाध्याय घरुन सोडवुन आणण्यास सांगत.एकचं उदाहरण समजावुन सांगतात काही मुलांची दबक्या आवाजात तक्रार असे.सर मुलांना विचार करण्यास प्रवृत्त करत. सरांचा चष्मा अत्यंत स्वच्छ असे. बिंदू,रेषा,रेषाखंड, वर्तुळ, जीवा,त्रिज्या,व्यास परीघ,प्रतल,कोन,कोनाचे प्रकार,संलग्न कोन,व्युत्क्रम कोन,कोटी कोन,चक्रीय कोन, रेषीय जोडी,परस्पर पुरकता,समानता, भिन्नता सहज सांगत.भूमितीवर सरांचे प्रचंड प्रभुत्व होते.कंपास पेटी घेऊनचं सरांचे वर्गात आगमन होत असे.सरांनी भूमितीतील संकल्पना आम्हा मुलांना एकदाचं सांगितल्या होत्या.मुले एकाग्रतेने ऐकत.ब-याचं मुलांना व्याख्या तोंडपाठ असत.सर मुलांना श्रमाचे महत्त्व सांगत.लामजना पाटीवर पार्टनरशीपमध्ये सरांचे कापडाचे दुकान होते.त्याचे नाव " श्रमसाफल्य" असं सरांनी ठेवलं होतं.शाळा सुटल्यावर सर शेतात जात असत.स्वत: काम करत. नंदर्गे सर जगताप सरांना प्रेमाने सावकार म्हणुन हाक मारत.जगताप सरांचा फार मोठा कालावधी प्रशाला लामजना येथे पूर्ण झाला. मी एकदा वाचनालयात गेलो पेपर वाचल्यानंतर रजिस्टर मध्ये स्वाक्षरी केली.रजिस्टर मधील पाने चाळताना मला जगताप सरांची स्वाक्षरी दिसली .मी चौकशी केली तेंव्हा सर येथे येत नसतात कोणीतरी दुस-याच व्यक्तीने त्यांची हुबेहुब सही केली होती मी ही अचंबित झालो.√''''''''''' त्यांच्या आडनावाची सुरुवात J ह्या इंग्रजी अक्षराने होते .जगताप सरांनी गणितातील वर्गमुळाच्या चिन्हाचा व कँपिटल J अक्षराचा स्वाक्षरीमध्ये सुंदर मिलाफ घातला होता. जगताप सर गणित व भूमिती विषय शिकवत असत.आज ही त्यांनी शिकवलेले प्रमेय लक्षात आहेत. त्यांचे विषयावरील प्रभुत्व अचाट होते.अतिशय शिस्तीत फलकावर भौमितीक आकृत्या कंपास पेटीच्या सहाय्याने काढत असत.जगताप सरांचे संकल्पना ज्ञान पक्के होते.बीजगणितातील उदाहरणे फलकावर समजावुन देऊन मुलांचा सराव सर घ्यायचे.सर मितभाषी,स्पष्ट वक्ते होते.कमी बोला व अधिक वाचा.हे सुत्र सर मुलांना वहीत लिहायला सांगत असत व त्याचे पुन्हा पुन्हा वाचन करायला सांगत. गृहपाठावर Good,very good,best मिळवण्यासाठी मुले स्पर्धा करत.एखाद्याचा सदगुण वर्गात सांगत.दहावी बोर्डात प्रथम आलेल्या मुलांबद्दल चर्चा करत.प्रोत्साहन देत. हाफ शर्ट व पँट हा त्यांचा आवडता पोशाख .सर नियमितपणे तासावर जात असत.कुणाची निंदा व टिंगल टवाळी यापासुन सर दूर रहात.सरांनी पहिले वाहन बजाज कंपनीची M - 80 ( एम.एटी)घेतली होती. सेवानिवृत्ती पुर्वी एक वर्ष अगोदर सरांनी पांढरी टाटा कार घेतली होती.सर कार चालवायला पण शिकले होते.त्यांचे गाव पाच कि.मी.अंतरावर उत्का हे होते.परंतु सर लामजन्यात रहात असत.सर म्हणत मी बालवयात केलेल्या कष्टाचं चीज झालं. तुम्ही सुद्धा या वयात कष्ट करा.असा त्यांचा कानमंत्र होता.सर सेवानिवृत्त झाले कांही महिन्यातचं त्यांचं अकाली निधन झालं. मी प्राथमिक वर्गाचा शिक्षक झालो.तेंव्हा सरांकडे हायस्कुलचा चार्ज होता. एकदा दीपावलीचा पगारीचा चेक घेऊन कनिष्ठ सहायक पठाण सरांसोबत सरांच्या घरी गेलो होतो.सर मळ्यात गेले होते.मग आम्ही मळ्यात गेलो.सर ऊसाला पाणी देत होते.मी सरांना हाक मारली .सर ऊसाच्या शेतातुन बाहेर आले व म्हणाले " तूम्ही माझी सही केलात तर चालले असते की ,कशाला बेजार झालात? "मी हसलो व म्हणालो सर तुमची सही खुप सोपी आहे.वाचनालयातल्या रजिस्टरवर मी पाहिली आहे.सर हसु लागले.मी म्हणालो पण सर तुमची सही मी कसं काय करु? मी अवघडलो. एकदा सर मला म्हणाले , "तुम्ही कोरे बॉंड पेपर घेऊन या व माझ्या सह्या घ्या." मी शिक्षक होतो परंतु सरांपुढे विद्यार्थ्यीचं होतो.आपल्या सरांचा विद्यार्थ्यावर खुप विश्वास होता.शाळेत सर कधी भाषण करत नसत.सर अजातशत्रु स्वभावाचे होते.सातव्या वर्गातील अभ्यास न करणारी मुले आठवी वर्गात सरांकडे दाखल झाली की सरळ अभ्यासाला लागत. स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याने सातत्य ठेवुन , जिद्दीने , चिकाटीने ,मेहनतीने अभ्यास करावा हा अनमोल संदेश आजही आठवतो. सरांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम. *बालपणीच्या आठवणी* *शब्दांकन* *श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता.औसा*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा