शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४

*लक्षात राहिलेले शिक्षक* *कै.मधुकर दत्तात्रय जोशी मु.पो.गुडसुर ता.उदगीर* लामजना प्रशालेत राष्ट्रगीत, प्रतिज्ञेनंतर सकाळची प्रार्थना जोशी सर गात असच. "असावे घरकुल आपुले छान पुढे असावा बाग बगीचा आम्रतरुवर मधमाशांचा फुलावा पिंपळ पानोपान" या गीतातुन समोर चित्र उभे करत.सरांचे गाणे चित्रदर्शी असे. "या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार नवहिंदवी युगाचे तुम्हीचं शिल्पकार",हे गीत तर मुलांना खुप आवडे.सरांमुळे मला काव्य व साहित्य आवडु लागले.वाचनालयात जाऊन बालसाहित्याचे शेकडो पुस्तके आम्ही मुले वाचू लागलो.बालवयात साहित्याची गोडी नाही लागली तर पुढे ती लागणे खुप अशक्य वाटते.मी व माझे मित्र पाठ्यपुस्तकातील कवितेबरोबरचं किशोर व कुमार मासिकातील कविता पाठ करु लागलो.संग्रहीत करु लागलो.कवितांना विविध चाली बसवु लागलो. जोशी सरांचा आवाज अतिशय गोड व पहाडी होता.सर सात- आठशे मुलांसमोर गात असत. त्यांना माईकची गरज लागत नसे.जोशी गुरुजी प्राथमिक वर्गाला शिकवत.पांढरा सदरा व धोतर घालत.त्यांची केशरचना किशोरकुमार या गायकासारखी वाटे.अतिशय प्रेमळ असणारे जोशी सर कै.दिगंबर पाटील यांच्या नवीन घरी रहात.शाळेपासुन पाच मिनिटाच्या अंतरावर सर खोली करुन रहात.स्टोव्ह पेटवुन स्वत: स्वयंपाक करत.स्वावलंबन व स्वाभिमान या दोन गुणांची जोपासणुक बालवयात सरांमुळे झाली.कपडे स्वत: धुवुन इस्त्री करत.नीटनेटकेपणा,स्वच्छता ,वक्तशीरपणा,नम्रता,सौजन्य, मृदूता यासारख्या कित्येक गुणांचे सर चालते बोलते विद्यापीठ होते.सर हसले की मोत्यासारखे पांढरे शुभ्र दात दिसत.शाळेतील कोणताही कार्यक्रम असो सर हिरीरीने सहभागी होत.लाजाळु मुलांना धीट बनवत.मुलांना सोप्या सोप्या कृतीतुन आनंददायी शिक्षण देत.माझ्या बालवयातील शिकवणारे गुरुजन एका समृद्ध विद्यापीठासारखे होते.कोणतही मुल दुखावलं जाणार नाही याची ते काळजी घेत.मुलांना सहज घडवण्याची त्यांची कला होती.या गुरुजनांमुळे गळती व स्थगितीचं प्रमाण नगण्य होतं.शाळेचं मैदान मुलांनी सदैव फुलुन जाई.शाळा हे उपक्रमांचे मोहोळ होते. शाळेची मुलांना अवीट गोडी होती. शाळा सुटण्याच्या पाच ते दहा मिनिट अगोदर मुले एकत्र जमत. पाढे म्हणत असत.जोशी सर पुसु नका हो पुसु नका जात कोणती पुसु नका धर्म कोणता पुसु नका किंवा ध्यास एक साधका अंतरात ठेव तू जाण यत्न यत्न देव तू.हे गीत हमखास गात.सर्व मुले तालासुरात गीताचे गायन करत.मुलांना कितीतरी देशभक्तीपर गीते पाठ होती. लामजना प्रशालेला सांस्कृतिक कार्यक्रमाची थोर परंपरा आहे.यदुनाथ थत्ते यासारख्या महान लेखकांनी शाळेला भेट दिलेली आहे नंतरच्या काळात अण्णा हजारे सुद्धा येऊन गेलेले आहेत. कित्येक गाण्यातुन जोशी सरांनी मुलांवर सहज संस्कार केले.जोशी सरांचा आवाज खुप चांगला होता. त्यांच्या शेजारी श्री अरविंद शिंदे मामा यांचे दुकान होते.आज जागा बदलली.भूकंपामुळे गावाचे स्थलांतर झाले.परंतु तो दुकानदार आहे तसाचं आहे.जगण्यापुरतं कमवावं हा संस्कार त्यांनी गुरुजीकडुनचं घेतला असावा.सर कुटुंबापासुन खुप दूर होते.सरांना सांस्कृतिक कार्यक्रमाची खुप आवड होती.स्वातंत्र्य दिनादिवशी त्यांच्या डोक्यावर टोपी दिसत असे.जोशी सर खुप प्रेमळ होते.छोट्या मुलांना गोष्टी सांगत.अभिनय करुन शिकवत.मुक अभिनय करण्याची स्पर्धा घेत.उशीरा येणा-या मुलांच्या तळपायावर छडी मारत.सर संयमी,शांत,वृत्तीचे होते.प्राथमिक वर्गाला शिकवताना ते मग्न होऊन जात.जोशी सर दोन ते तीन महिन्यानंतर गावाकडे जात असत.ते कधी आजारी पडल्याचे आठवत नाही.सरांच्या खोलीवर मी कधीतरी जात असे.सर या जगात नाहीत असं ऐकलो.स्वातंत्र्य दिना दिवशी त्यांच्या चेह-यावर आनंद ओसांडुन वाहत असे.सर विद्यार्थी प्रिय, शिक्षक प्रिय ,समाजप्रिय शिक्षक होते.सर निर्व्यसनी होते,गुरुजनांच्या संस्कारामुळे बरीचं मुले निर्व्यसनी राहिलो. अध्यात्म, सुसंस्कार, शिक्षण या त्रयींचा संगम प्रशालेत होता.जसा गुरुजी असतो तशी मुले तयार होतात.मुले गुरुजींचे बारकाईने निरीक्षण करतात.त्यांच्या स्वभावात गुरुजनांमुळे कमालीचा बदल होऊ शकतो.जीवनातील सत्व व स्वत्व समजुन घेण्यासाठी गुरुजींची खुप मोठी मदत होऊ शकते.गुरुजींच्या मनात स्थान निर्माण करणे वाटते तितकं सोपं नाही.गुरुजीचं वर्गातील सर्वांना समान न्याय देऊ शकतात हाचं संस्कार मुलांना सार्वजनिक जीवन जगत असताना उपयोगी पडताे.वर्ग म्हणजे लोकशाहीचे सर्व पाठ देणारे एक ज्ञानमंदिर .जगातील सर्वात पवित्र जागा म्हणजे विद्यालय .विद्यार्थी या देवाला प्रसन्न करणारे धडपडणारे जोशी गुरुजी बालपणीच्या आठवणीत आठवतात. निर्मोही,निरागस,सालस जीवन जगुन आम्हा सर्व मुलांना संस्काराची शिदोरी देऊन सर गवताच्या पात्यावरील दवबिंदूप्रमाणे अनंतात मिसळुन गेले.दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. हे आदिमा हे अंतिमा हे पुरुषोत्तमा.....! *बालपणीच्या आठवणी* *शब्दांकन* *श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता.औसा*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा