शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४

*सतीची अग्नी परीक्षा* आज " धाराशिव वार्ता " या साप्ताहिकाला यशस्वी 10 वर्षे पुर्ण झाली.सर्वप्रथम सर्व वाचक मंडळी तर्फे अभिनंदन करुन हार्दिक मन: पुर्वक हार्दिक शुभेच्छा देतो.धाराशिव वार्ता साप्ताहिकाचं 11 व्या वर्षात पदार्पण होतय.श्री.राजेश शेषेराव बिराजदार लामजनकर यांनी केवळ छंदापोटी वृत्तपत्र सेवा स्विकारली.दिल्ली गाठुन शासनाला हजार- हजार रुपयांचे शपथपत्र,लेखी करारनामा देऊन वृत्तपत्राची नोंदणी केली.वृत्तपत्र चालवणे हे एक आव्हान असतं.समाजातील सर्व घटकांचा विचार करुन त्यात लेखन करावं लागतं. कोणत्याही अमिषाला ,दबावाला बळी न पडता सत्य मांडण्याची कणखर भूमिका ठेवावी लागते.वैयक्तिक किंवा राजकीय दबावाला बळी न पडता सतत संतुलन ठेवावं लागतं.प्रत्येक शब्दांचे,वाक्यांचे किती अर्थ निघतात हे लक्षात सुयोग्य बदल करावे लागतात. आपल्या लेखनाने वैयक्तिक , सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक,सामाजिक,राष्ट्रीय ऐक्यास बाधा अथवा अडथळा येणार नाही ना याची काळजी घ्यावी लागते.वृत्तपत्राचे ब्रीद लक्षात घेऊन समाजप्रबोधन करावे लागते.होकायंत्रासारखे दिशादर्शक व्हावं लागतं. लेख, कविता, बातम्यांची वरचेवर गर्दी वाढत जाते.लेखनातील सर्व प्रकारांना वृतपत्रात यथायोग्य व यथावकाश स्थान द्यावे लागते.नोंद रजिस्टर जतन करावे लागते.क्रम ठरवावा लागतो.वाचकांची आवड व निवड लक्षात ठेवावी लागते. वृत्तपत्राचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे लागते.लेखनामुळे काही कायदेशीर प्रसंग येणार नाही याचे सदैव भान ठेवावे लागते.वृत्तपत्राची व्याप्ती पाहुन स्थळ व काळपरत्वे बदल करावे लागतात. प्रसंगी वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावे लागतात.अंकांची वेळेत छपाई करुन पोस्टात वेळेवर पोहचवावी लागतात. अष्टावधानी राहुन कार्य करावे लागतात.लेखणी हे एक अमोघ व अमुल्य शस्त्र आहे याचा विचार करावा लागतो.प्रेसला वारंवार भेट देऊन दैनंदिन कामाचा आढावा घ्यावा लागतो.प्रत्येक पानाची रचना, सजावट, मुद्रण, चित्रे,याकडे बारकाईने लक्ष पुरवावे लागते.शासनाने दिलेल्या सुचनांचे वेळोवेळी तंतोतंत पालन करावे लागते.अंकांची विक्री व छपाई यांचा ताळमेळ ठेवावा लागतो.प्रपंच सांभाळुन वेळ द्यावा लागतो.विविध शासकीय, निमशासकीय संस्थांना पत्रव्यवहार करुन अथवा प्रत्यक्ष भेट देऊन सूचनांची अंमलबजावणी करावी लागते.वृत्तपत्र चालवणे हा काही जोक नाही.वृत्तपत्राला जनतेच्या व शासनाच्या अग्नीपरीक्षेतुन जावे लागते.वृत्तपत्र जनतेच्या व शासनाच्या अपेक्षेला फोल ठरल्यास ती बंद करावी लागतात. "धाराशिव वार्ता " या साप्ताहिकाची वाटचाल अतिशय यशस्वीपणे चालली आहे.गेल्या दहावर्षात या वृत्रपत्राला विविध अनुभव आलेले आहेत.वृत्तपत्राचे संपादक श्री.राजेश शेषेराव बिराजदार यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा जबरदस्त प्रभाव आहे. स्वाभिमानाने व स्वकर्तृत्वाने जीवन जगण्याची जीवनदृष्टी आहे.साधेपणा,कष्ट,जिद्द व सातत्याने समाजासाठी झटण्याची त्यांची धडपड कौतुकास्पद आहे.आपल्या वडिलांच्या आदर्शावर पाऊल ठेवुन पुर्वजांचा वसा व वारसा त्यांचे आचार- विचार ,संस्कृतीची जोपासना करणारी तत्वचिंतक मुर्ती या शब्दात त्यांचे वर्णन केल्यास शब्दही अपूरे पडणार आहेत.सत्याचा ध्यास व जनतेचा विकास ही धाराशिव वार्ता साप्ताहिकाची मूल्यदृष्टी आहे.जीवनातील अनेक संकटावर मात करुन पुढे जाण्याची जीवनदृष्टी या वृत्तपत्रामुळे वाचकास मिळाली आहे. लॉकडाऊनच्या काळातील वृत्तपत्र खंबीरपणे उभे राहिले आहे. दहा वर्षातील कोणताही अंक काढुन वाचन केल्यास ज्ञानाचा व विचारांचा अमूल्य ठेवा वाचकांना दिसतो. आपले जीवन सकारात्मक,चांगल्या विचारांनी भरलेले असावे. दूस-यासाठी काही तरी चांगलं करता येत का? थोडं आपल्यासाठी व अधिक लोकांसाठी हा वसा घेऊन सतीच्या अग्नी परीक्षेतुन वाटचाल करणा-या माझ्या लाडक्या " धाराशिव वार्ता" पत्रास दशकपुर्ती निमित्त पुनश्च खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन करतो. *श्यामसुरेश गुमानगिर गिरी मु.पो.लामजना ता.औसा जि.लातूर*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा